अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत महापालिकाच्या निवडणुकां जाहीर

१५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल ; मतदान आणि निकालाचे वेळापत्रक पहा

2

मुंबई | दि. १५ डिसेंबर २०२५ Municipal Corporation Election Maharashtra गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अखेर अधिकृत बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेसोबतच आजपासून संबंधित सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकाच टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

५ ते ७ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली (Municipal Corporation Election Maharashtra)

ओबीसी आरक्षणासंदर्भातील कायदेशीर पेचप्रसंगामुळे या महापालिका निवडणुका गेल्या ५ ते ७ वर्षांपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर आणि राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणुका घेण्याची मुदत ठरवून दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने वेगाने हालचाली केल्या.या आधी २ डिसेंबर २०२५ रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, आता राज्यातील सर्वांत महत्त्वाच्या महानगरपालिकांचा टप्पा सुरू झाला आहे.

मतदान आणि निकालाचे वेळापत्रक

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याचा कालावधी : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५,अर्ज छाननी : ३१ डिसेंबर २०२५,उमेदवारी माघार : २ जानेवारी २०२६,अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६,मतदान : १५ जानेवारी २०२६,मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६,मतदारसंख्या आणि मतदान केंद्रांची माहिती,या महापालिका निवडणुकांमध्ये एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यभरात ३९,१४७ मतदान केंद्रे उभारली जाणार असून, यापैकी एकट्या मुंबईत १०,१११ मतदान केंद्रे असतील.,निवडणूक प्रक्रियेसाठी ११,३४९ कंट्रोल युनिट आणि सुमारे २२,००० बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.

१ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य

या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी अंतिम आणि ग्राह्य धरण्यात आली आहे. ही यादी भारत निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याने, त्यामध्ये नावे वगळणे किंवा बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.,मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख पटवण्यात आली असून, अशा मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह असणार आहे. त्यांच्याबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन शंका निरसन करण्यात आले आहे.

दुबार मतदारांबाबत महत्त्वाची माहिती

आयोगाच्या माहितीनुसार, दुबार मतदारांचे प्रमाण महानगरपालिका निहाय ५ ते २० टक्के दरम्यान आहे.,मुंबईत सुमारे ७ टक्के दुबार मतदार आढळले आहेत.,या मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याची नोंद घेण्यात आली आहे.

जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील निर्णय

ज्या उमेदवारांकडे सध्या जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity) उपलब्ध नाही, अशा उमेदवारांना निवडून आल्यानंतर ६ महिन्यांच्या आत ते सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, विहित कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित सदस्याचे सदस्यत्व रद्द होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत एक सदस्यीय वॉर्ड, इतर ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग

मुंबई महानगरपालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत लागू असेल. त्यामुळे मतदाराला एकच मत देता येईल.,तर उर्वरित २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (१ ते ५ सदस्य) लागू राहणार असून, मतदारांना त्यानुसार मतदान करावे लागेल.

एकूण जागा आणि आरक्षण

या २९ महापालिकांमध्ये एकूण २,८६९ जागा आहेत. त्यापैकी

महिला आरक्षण : १,४४२

अनुसूचित जाती : ३४१

अनुसूचित जमाती : ७७

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) : ७५९

नागपूर महानगरपालिकेत ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेणे बंधनकारक असल्याने त्या देखील पार पडतील. मात्र, या निवडणुका न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील.

२९ महापालिका कोणत्या?

MMR विभाग

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, मिरा-भाईंदर, उल्हासनगर

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना

विदर्भ

नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, या निवडणुकीत […]

  2. […] उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. नाशिक महानगरपालिकेतील सर्वांत तरुण उमेदवारांपैकी एक […]

Don`t copy text!