‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या रिलीज डेटमध्ये बदल होणार?
२० नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होण्याबाबत संभ्रम;दिग्दर्शक स्वरूप सावंत यांचा मोठा खुलासा!

मुंबई,दि.१५ नोव्हेंबर २०२६ :(Maharashtra Epstein Files Release) नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आता नवा पेच निर्माण झाला आहे.येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन असले,तरी सेन्सॉर प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे जाण्याची शक्यता दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी एका दूरचित्रवाणीला मुलाखत देताना म्हंटले आहे .त्यामुळे बहुचर्चित चित्रपट २० नोव्हेंबरलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार की त्याची रिलीज डेट बदलणार,याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या प्रक्रियेमुळे प्रदर्शन लांबणार?
दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या म्हणण्यानुसार,तांत्रिक कारणांमुळे चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे सादर करण्यास उशीर झाला आहे.अद्याप चित्रपटाचे स्क्रीनिंग झालेले नसून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नियोजित तारखेला म्हणजेच २० नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
रुपाली चाकणकरांच्या आक्षेपामुळे वादाला नवे वळण!
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटातील व्यक्तिरेखेवरून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या नावाचा, फोटोचा आणि वैयक्तिक ओळखीचा परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि ट्रेडमार्कच्या मुद्द्यावरून हा वाद अधिक चर्चेत आला आहे.
‘चित्रपट पूर्णपणे काल्पनिक’;दिग्दर्शक स्वरूप सावंत यांची भूमिका
दरम्यान, चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असून तो कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर आधारित नसल्याचे त्यांनी सांगितले. समाजात महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात जनजागृती करणे आणि सामाजिक प्रबोधन घडवणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
२५ कोटींच्या नोटिशीचा दावा; दिग्दर्शकांचा दबावाचा आरोप
चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द काढून टाकण्यासाठी विविध स्तरांवरून दबाव येत असल्याचा आरोपही स्वरूप सावंत यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांच्या नाव आणि फोटोच्या ट्रेडमार्क नोंदणीचा मुद्दा उपस्थित झाल्याने चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच २५ कोटी रुपयांच्या कायदेशीर नोटिशीसह विविध माध्यमांतून दबाव टाकला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मात्र, आपली कायदेशीर टीम सक्षम असून कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समाजात ६० ते ७० टक्के सकारात्मक परिवर्तन घडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आता २० नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार की तारीख बदलणार? (Maharashtra Epstein Files Release)
एकीकडे चित्रपटाच्या नावावरून आणि व्यक्तिरेखांवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या प्रदर्शनाबाबत अनिश्चितता कायम आहे. २० नोव्हेंबर ही नियोजित तारीख कायम राहणार की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.चित्रपटाची नवीन रिलीज डेट कधी जाहीर होणार, याबाबत दिग्दर्शकांकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.