नाशिक – रचना ट्रस्ट प्रायोजित आणि अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी, कलानंद कथक नृत्य संस्था, किर्ती कला मंदिर आयोजित दिवाळी पहाट २०२१ या उत्सव नर्तनाने झाली. कोरोनाची मरगळ टाकून नाशिककर रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व दिवाळीचा आरंभ केला.
कार्यक्रमाची सुरवात भक्ती देशपांडे व विद्यार्थिनींनी कौशिकी चक्रवर्तींच्या ‘दिप की ज्योत जले’ या गीतावरील दिप नृत्याने केली. सुमुखी अथनी ने सुरेश वाडकरांनी गायलेल्या अजय चक्रवर्तींच्या रचनेवरील संत तुलसीदासांची दुर्गा स्तुती तर अदिती पानसे ने शौनक अभिषेकींनी गायलेली राम स्तुती सादर केली. कलानंदच्या विद्यार्थिनींनी संजीव अभ्यकरांनी गायिलेली देवकी पंडितांची गणेश स्तुती व लता मंगेशकरांनी गायिलेले ‘श्रीराम चंद्र कृपालू भज मन’ हे राम भजन सादर केले. तर किर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी रुद्राष्टक व कुमुदताई अभ्यंकरांनी स्वरबध्द केलेले कृष्णाष्टक सादर केले. अभिजातच्या विद्यार्थिनींनी स्री जागराला नवी दिशा देणारे विवेक गरुड यांनी लिहिलेले व सुनील देशपांडे यांनी स्वरबध्द केलेले ‘मिळून साऱ्याजणी’ हे गीत पारंपारिक नृत्यखेळांच्या सहाय्याने सादर केले. विद्याहरी देशपांडे यांनी गोरक्षनाथांचे ‘गुरुजी मैं तो एक निरंजन ध्यांऊजी’ हे कुमार गंधर्वांचे निर्गुणी भजन नृत्यरुपात सादर केले. तसेच कुमार गंधर्वांनी स्वरबध्द केलेली होरी ही त्यांनी विद्यार्थिनीं सोबत सादर केली. कार्यक्रमाची सांगता तीन ही संस्थांच्या एकत्रित भैरवी ने झाली. यात रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी ही सहभागी झाल्या.
आजच्या कार्यक्रमास ध्वनी व्यवस्था राम नवले व प्रकाश योजना आदित्य रहाणे यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन प्रेषिता पाठक पंडित यांनी केले.