सूर तेच छेडीता (अंतिम भाग)

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)



राग आणि ताल ह्या संगीतातील प्राथमिक संकल्पना मानवी आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत. राग आला की ताल सुटतो आणि ताल सुटला की राग अनावर होतो.मानवी भावभावनांचे रागाचे आणि तालाचे गणित असेच असते.

मला आठवतंय, मी कॉलेजमध्ये असतांना एक शाब्दिक कोटी नेहमी करायचे. माझा स्वभाव मस्तीखोर असल्याने माझ्या मस्तीमुळे बऱ्याचदा मित्रमैत्रिणी माझ्यावर रागवायचे, ते लक्षात आल्यावर मी आस्थेने त्यांना विचारायचे कि, ” काय झालं? राग आला का?”  समोरच्याने जर “हो” असं उत्तर दिलं तर मी पटकन म्हणायचे,”राग आलाय तर गाऊन टाक ना!” यावर हमखास समोरच्या व्यक्तीला हसु यायचं. असेच राग , रुसवे नात्यातही अधेमधे डोकावत असतात. त्यांना हद्दपार करुन जिवनगाणं सुरेल करण्यासाठी आपण मागील दोन लेखांमध्ये नात्यांमधील सात सुरांचं विश्लेषण करीत आहोत.

सा सामंजस्याचा


रे रेक्गनीशन व रेडीनेसचा


ग गमतीजमतीचा


म मनाच्या मोठेपणाचा


प पारदर्शकतेचा


ध धमक ,धनाच्या नियोजनाचा


आता पाहुया पुढचा सुर ‘नि‘ काय म्हणतो ते!

नि निरागसतेचा निस्वार्थतेचा

आपली मुलं खूप निरागस असतात. ओव्हन मध्ये जसा एखादा पदार्थ हळू हळू  शिजत असतो तशी आपल्या मुलांची मानसिकता आजूबाजूच्या गोष्टी बघुन हळूहळू बदलत असते. मुलांची निरागसता जपायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांच्या निरागस प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन त्यांची जिज्ञासा भागवायला हवी कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर आपण दिली नाही तर ती उत्तरं शोधण्याकरिता ते दुसरा एखादा पर्याय शोधतात आणि त्यांनी शोधलेले पर्याय आपल्याला कळू नये यासाठी ते भामटेपणा करायला शिकतात. इथूनच त्यांच्या निरागसतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. मुलांचा हा भोळेपणा, हि निरागसता अनेकदा आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवते. मुलांच्या निरागसतेचा एक किस्सा सांगते.माझ्या शाळेत येणाऱ्या आदित्यला छोटी बहीण झाली.

काही दिवस आधी बाळाच्या आगमनाच्या विचारांनी उत्साहात असलेला आदित्य नाराज दिसायला लागला. मला कारण समजावं म्हणून मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. “आदित्य, कसं आहे तुमचं बाळ? तुझ्याशी खेळत का रे बाळ?” जरासा हिरमुसला होऊन आदित्य म्हणाला,”खूप बोर आहे. ते नुसतंच रडतं.” मला हसुच आलं १० दिवसांच्या बाळाने अजुन काय करायचं असतं मग?

मी म्हणाले, “अरे, दिदी थोडी मोठी झाल्यावर खेळेल तुझ्याशी!” (बरेच कुटुंबांमध्ये बहिणीला दीदी म्हणतात) त्यावर आदित्य म्हणाला, “टीचर ,मला क्रिकेट खेळायला भाऊ हवा होता. दीदी माझ्याशी काहीच खेळणार नाही. मी नाही तिच्याशी बाहुली-बाहुली खेळणार ! मी काय ‘गर्ल’ आहे का?”मग मी मजेत त्याला म्हटलं,”मग आईला सांग दवाखान्यातून एक्सचेंज करून आण बाळ! मुलगी देऊन मुलगा घेऊन ये.” त्यावरही त्याचे उत्तर तयार होतं. तो म्हणाला,”टीचर बाळाला घरी आणून दहा दिवस झाले. आता दहा दिवस वापरलेलं बाळ कोणी बदलून देईल का?”  त्याची ही निरागसता मला प्रचंड भावली. काय काय विचार करतात ना मुलं! तुम्ही एखादा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला तर त्यांच्याकडे त्याच्या पलीकडचंही उत्तर तयार असतं. मुलांमधली निरागसता आपण जपायला हवी. त्याचबरोबर निस्वार्थताही मुलांना शिकवायला हवी. आपल्या मातृभूमीला निस्वार्थ त्यागाचा आशीर्वाद आहे.

अनेक थोर व्यक्तींनी निस्वार्थ भावनेने त्यांच्या सर्वस्वाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आपल्या ओटीत टाकले आहे ‌ त्यांचा हाच गुण आपल्या पुढच्या पिढीत उतरला तरच भारत माता सुरक्षित राहणार आहे. मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता एखादी गोष्ट करायला शिकणं हे फार अवघड आहे. साधं उदाहरण सांगायचं तर आपणच मुलाला अभ्यास करायला बसला तरी काही ना काही लाच देण्याची भाषा करतो. ‘तू एवढे स्पेलिंग लिहीलेस की मी तुला चॉकलेट देईल,  तुझा अभ्यास पूर्ण झाला की मी तुला पेस्ट्री देईल, पेरेंट्स मीटिंग झाल्यानंतर जर तुझ्या टीचरनी तुझी काही कम्प्लेंट केली नसेल तर मी तुला कॅडबरी देईल’ असे कित्येक लोभाचे प्रसंग रोजच घडत असतात आणि यातुनच  मुले देखील आपल्याला काही मिळणार असेल तरच आपण काहीतरी केलं पाहिजे असा विचार करायला लागतात.

‘मी अमुक एक गोष्ट करेल त्यात माझा स्वार्थ नसेल पण त्या गोष्टीने दुसऱ्या कोणाचा तरी भलं होणार असेल तर ती गोष्ट मी नक्कीच करायला हवी, निस्वार्थपणे करायला हवी’ हा विचार मुलांच्या मनात रुजवायला हवा. थोर क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल गोरखपुर तुरुंगात होते. त्यांचे आई-वडील त्यांना शेवटचे भेटायला आले होते कारण चारच दिवसांनी रामप्रसाद यांना फाशीची शिक्षा दिली जाणार होती. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हा वीर हसत हसत फासावर जायला निघाला होता. त्यांची आई त्यांना म्हणाली,” राम, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तू फाशी जातो आहेस, मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे.” आईचं बोलणं ऐकून रामप्रसाद यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. ते पाहताच त्यांची आई रागावली,” हे काय राम? मला वाटलं तू भारत भूमीचा पुत्र आहेस. तिच्यासाठी फाशी जाताना तू  हसत जाशील पण तू मात्र रडतो आहेस?”  राम प्रसाद बिस्मिल म्हणाले,”आई, हे  आनंदाश्रू आहेत. मला मिळालेल्या जन्माचं सार्थक होत आहे. माझ्या प्राण्यांच्या आहुतीने स्वातंत्र्याचा जो यज्ञ पेटणार आहे त्याचा विचार करून माझं ऊर अभिमानाने भरून येत आहे. आई, माझ्या बरोबरीचे मित्र अनेकदा मला वेडा म्हणायचे. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे ? असा प्रश्न विचारायचे पण आज मी छातीठोकपणे सांगतो

कि देशासाठी निस्वार्थपणे बलिदान देण्यासारखा आनंद दुसऱ्या कशातच नाही आई!” हाच निस्वार्थभाव आपल्या पुढच्या पिढीत देखील यायला हवा आणि त्यासाठी आपणच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत काही गोष्टी जाणून बुजून मुलांसमोर निस्वार्थ भावनेने करायला हव्यात कारण आपली मुलं “लर्निंग बाय डुइंग” या पद्धतीने शिकतात. जे आपण करू ते बघूनच त्यांच्यासमोर आदर्श उभे राहणार आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही. मुलांचा आयुष्य खरंच सुंदर करायचं असेल तर त्यांच्या जीवन संगीतातला सातवा सूर “नि हा निरागसतेचा आणि निस्वार्थतेचा असायला हवा.”

शेवटचा सां आहे सांगतेचा……

नात्यातील सात सुरांचे अर्थ आपण मनापासून वाचले, यावर आपल्या अनमोल प्रतिक्रियादेखील मला पाठवल्या. हे नुसतं वाचुन सोडुन न देता एका जरी कुटुंबातील वातावरण याने बदललं तरी माझा लेखनप्रपंच सफल झाला असं मी समजेन. या सप्तसुरांच्या मैफिलीची ‘सां’ ने सांगता करते आहे.

सुर तेच छेडिता हे गाणं तुम्हीपण ऐकलं असेल. त्याची पुढची ओळ आहे ‘गीत उमटले नवे’ ! हेच मला या लेखात सांगायचे आहे.

आपल्या रोजच्या वागण्यातल्या काही गोष्टींचा ‘सुर’ बदलला तर त्यातुन असं एक नविन  गाणं आकार घेऊ शकतं जे तुमच्या आयुष्यातील सुरावट बदलून टाकेल. आपल्या रोजच्या सुरांना या नविन अर्थांच्या बंदिशीत बांधुन जिवनगाण्याची सुरेल महफिल सजवुन पहा, मला खात्री आहे तुम्ही स्वतःच म्हणाल, “सुर तेच छेडिता, गीत उमटले नवे!”
समाप्त.

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.