मुंबई – झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मधील देशमुख कुटुंबीय हे प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. बाहेरून कडक पण मनात सगळ्यांसाठी प्रचंड प्रेम असलेली रत्ना अक्का हि आपल्या कुटुंबात देखील हवी असं प्रेक्षकांना मालिका बघताना प्रकर्षाने जाणवतं.
रत्ना अक्काची भूमिका अभिनेत्री अपर्णा क्षेमकल्याणी अगदी चोख बजावत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती आणि मालिकेबद्दल बोलताना अपर्णाजी म्हणाल्या, “नात्यांना बहरण्यासाठी प्रेम खूप महत्वाचं असतं आणि ते प्रेम फक्त २ लोकांमध्ये किंवा जोडप्यामध्ये नसून संपूर्ण कुटुंबामध्ये असलं पाहिजे. कुटुंबाला सोबत घेऊन आयुष्याची वाटचाल करत असताना नात्यांची भावनिक गुंतवणूक होत असते आणि नाती बहरात असतात. कुटुंब म्हणजे आपला आधार असतो. तुमच्या पाठीमागे नेहमी कोणीतरी आहे, तुमच्या सुखदुःखात तुमचे कुटुंबीय सहभागी असतात. एक तीळ सात लोकांनी वाटून खाल्ला कि त्यातील प्रेम, आनंद, जिव्हाळा वाढतो तसाच या मालिकेत सगळ्या कुटुंबियांसोबत आनंद वाढत असतो.
एक साखळी कड्या जोडून जशी मजबूत होते तशीच मजबूती तुमच्या नात्यात येते जेव्हा तुमची आपली माणसं जवळ असतील जी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. सध्या सगळे विभक्त कुटुंबात राहतात त्यामुळे काही प्रसंगी एकाकीपणा घेरून येतो तो एकत्र कुटुंबात जाणवत नाही. व्यावहारिकदृष्ट्या सध्या एकत्र एका घरात इतक्या माणसांना राहणं शक्य नाही होत पण नाती सांधण, मनाने जवळ राहणं हे आपल्या हातात असतं त्यामुळे वेळप्रसंगी एका हाकेवर आपल्या जवळची माणसं आपल्या मदतीसाठी सज्ज होतील अशा प्रकारे आपण नात्यांची जपणूक केली पाहिजे. असा बोध या मालिकेतून मिळतो.”