शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

0

सोलापूर – शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे आज (शुक्रवारी)रात्री नऊच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.तब्बल ५० वर्ष त्यांनी विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली होती.त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर ते तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. ते  ५० वर्षांहून अधिक काळ विधानसभेचे सदस्य राहिले होते .याच  काळात त्यांनी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला.

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ काळाच्या पडद्याआड – छगन भुजबळ
सांगोला मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने चार पिढ्यांतील सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडलेला ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ आणि एक जेष्ट मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्या असल्याच्या शोक भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 
मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, साधी राहणी व स्वच्छ प्रतिमेमुळे गणपतराव हे राजकारणातील आदर्श दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते.त्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विक्रम रचला होता.दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी हा विक्रम देखील मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावला होता.
 
 
कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे गणपतरावांचे अथक प्रयत्न, चिकाटीने काम करण्याची जिद्द होती. साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनानंतर राजकारणाचा बाज हा पक्षाची ध्येयधोरणे व वैचारिक पायावर आधारित आहे. मार्क्सवादी विचारांना प्रमाण मानणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. वैयक्तिक स्वार्थ व लाभ मिळविणे हा आमदारांचा एकमेव उद्देश कदापि असू शकत नाही, हे त्यांनी साडेपाच दशकांच्या ध्येयवादी राजकारणातून दाखवून दिले.

विधेयकांच्या चर्चेत सहभागी होऊन अभ्यासू संसदपटूची ओळख निर्माण करत सभागृहात त्यांनी आदर्श निर्माण केला होता.त्यांच्या निधनाने एक अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं आहे. मी व माझे कुटुंबीय देशमुख कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात शेवटी म्हटलेले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.