नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक अनंता सूर्यवंशी यांचे आज (दि.१४) हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले.ते ४९ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,भाऊ दोन बहिणी,असा परिवार आहे.
आज सकाळी ओझर येथे सकाळी एका तरणतलावात पोहण्यासाठी गेले असताना त्यांना त्याठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात येत होते परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आज सायंकाळच्या सुमारास पंचवटीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनंता सूर्यवंशी यांना काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला जावं लागल्यानंतर गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या सभेसाठी नाशिक व उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या कार्यकर्त्याच्या नियोजनाची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे सोपवून त्यांचा अनुभव पक्षात घेता त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांना नव्याने मोठी जबाबदारी देण्याचाही मानस वरिष्ठांचा होता.
नगरसेवक काळात त्यांनी अनेक विकास कामांच्या माध्यमातून तसेच पक्षीय राजकारणातही आपल्या कार्यशैलीने आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. असा एका उदयोन्मुख पदाधिकारी अकाली गेल्याने मनसेसह राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
श्रद्धांजली
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ही मनाला चटका लावणारी आणि अतिशय दुःखद घटना आहे.त्यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,अगदी आमच्या संकट काळात सुद्धा ते आमच्या सोबत होते.मितभाषी आणि सहृदय व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित होते.नाशिक महानगरपालिकेत पंचवटी प्रभागातून त्यांनी नगरसेवक म्हणून देखील काम केलं. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने सूर्यवंशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय सुर्यवंशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,
मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा