भावार्थ दासबोध -भाग ६

निरुपण: पद्माकर देशपांडे

0

मात्र हे श्रोते गुणग्राहक आहेत त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता सांगत आहे, ते ऐकत आहेत हे भाग्यच आहे. नेहमी दिव्य अन्न सेवन करणारे कधी साधे जेवतात त्याप्रमाणे आज माझी प्राकृत वचने ऐकत आहेत. आपल्या शक्तीनुसार भावानुसार परमेश्वराची पूजा करावी, मात्र पूजा करू नये हा विचार कुठेच नाही. त्याप्रमाणे मी मुखदुर्बळ आहे, श्रोते म्हणजे केवळ परमेश्वरच आहेत, त्यांची पूजा मी फार बोलणारा करीत आहे. मला व्युत्पत्त्तीचे ज्ञान नाही, चातुर्य नाही, व्यवस्थितपणा नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही वाचनात माधुर्य नाही. असा माझा वाग्विलास आहे पण जगदीश भावाचा भोक्ता आहे, म्हणून सावकाश बोलत आहे.

श्रोतेहो तुम्ही जगदिशाची मूर्ती आहात तरीही मी अल्पमती, बुद्धिहीन, व्युत्पत्ती न जाणणारा आपली सलगी करीत आहे. समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी त्याच्या अंगी सामर्थ्य असते त्याप्रमाणे तुम्हा संतांची जवळीक आहे म्हणून हे धाडस करीत आहे. वाघ, सिंह भयानक असतात मात्र त्यांची पिल्ले त्यांच्यासमोर निशंकपणे खेळतात, त्याप्रमाणे संतांचा अंकित असलेला मी तुमच्या समोर बोलत आहे, माझी चिंता तुमचे चित्त वाहीलच की! आपले बोलणे वावगे असले की त्यात सुधारणा करावी लागते,

परंतु न्यून पूर्ण करा असे मला सांगावे लागत नाही. तुम्ही संतसज्जन विश्वाचे मायबाप आहात, प्रेमाने माझ्यासाठी हे कराल असा विश्वास वाटतो. माझ्या म्हणण्याचा आशय जाणून उचित ते करावे, पुढील कथेकडे लक्ष द्यावे अशी विनंती हा दासानुदास करीत आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवन नामे समास षष्ठ समाप्त.

समास १ दशक ७
आता शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदावतारी कवीश्वराना वंदन करू या. कवी हे सरस्वतीचे निजस्थान, नाना कलांचे जीवन आणि नाना शब्दांचे जणू भुवनच आहेत. पुरुषार्थाचे वैभव, जगातील ईश्वराचे महत्व, सत्कीर्ती यांचे स्नेहाने वर्णन करण्यासाठी कवी निर्माण झाले आहेत. शब्द रत्नांचे सागर, मुक्तांचे मुक्त सरोवर, वैराग्यवान, बुद्धिमान असे कवी आहेत. कवी म्हणजे अध्यात्मरत्नांची खाण, बोलके चिंतामणी,किंवा श्रोत्यांसाठी जणू कामधेनूच आहेत.

कल्पनेचे कल्पतरू, मोक्षाचे नावाडी, सायुज्य मुक्तीचे विस्तारित स्वरूप आहेत. कवी म्हणजे परलोकींचा स्वार्थ, योग्यांचा गुप्त पंथ, विविध ज्ञान्यांचा रुपास आलेला परमार्थ होत. निरांजनाची खुण, निर्गुण स्वरुपाची ओळख, मायातीत स्वरूपाचे लक्षण म्हणजे कवी. किंवा वेदांचा सारांश, प्रत्यक्ष परमेश्वराचा अलभ्य लाभ, किंवा सुलभ असा निजबोध म्हणजे कवी. कवी म्हणजे मुमुक्शुंचे अंजन, कवी म्हणजे साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चितपणे आहेत.

स्वधर्माचा आश्रय, मनाचा मनोजय,धर्मिकांचा विनय म्हणजे कवी. वैराग्याचे संरक्षण,भक्तांचे भूषण,नानाप्रकारे स्वधर्माचे रक्षण कवी करतात. कवी म्हणजे प्रेमळांची प्रेमळ स्थिती,
कवी म्हणजे ध्यानस्थांची ध्यान मूर्ती, कवी म्हणजे उपासकांची विस्तारलेली वाढती कीर्ती आहेत. कवी नाना साधनांचे मूळ आहेत, नाना प्रयत्नांचे फळ आहेत, केवळ त्यांच्या प्रसादामुळेच कार्यसिद्धी होते. कवीचा वाग्विलास झाल्याशिवाय श्रवणात भरपूर रस निर्माण होत नाही. कवीमुळेच बुद्धीत प्रकाश पडून काव्य निर्मिती होते. व्युत्पन्न व्यक्तीची योग्यता, सामर्थ्यवन्ताची सत्ता, विचक्षण व्यक्तीचे विविध प्रकारचे कौशल्य म्हणजे कवी. काव्याची निर्मिती, नाना धाटणीचे छंद, मुद्रा, गद्य, पद्य भेदाभेद उमजणारे कवीच असतात.(क्रमशः)

निरुपण: पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!