राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द 

निवडणूक आयोगाच्या ‘या’ निर्णयामुळे काय फटका बसणार ?

0

नवी दिल्ली ,दि. १० एप्रिल २०२३ –  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस (TMC) आणि सीपीय (CPI) अर्थात भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय या तीनही पक्षांसाठी मोठा धक्का मानला जातोय.

देशात आतापर्यंत आठ राजकीय पक्षांना केंद्रीय दर्जा देण्यात आलेला होता. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांचा समावेश होता. आधी निवडणूक आयोग दर ५ वर्षांनी राष्ट्रीय दर्जा देण्याबाबतचा निर्णय घ्यायचं. पण २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाने यामध्ये बदल केला. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दर दहा वर्षांनी देण्याचं निश्चित केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता पुढचे दहा वर्ष राष्ट्रीय दर्जा मिळणार नाही, अशी शक्यता आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या राजकीय पक्षांचे चिन्ह हे राखीव असतं. त्यांच्या चिन्हाचा वापर देशभरात कुणीही करु शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने आता त्यांचं घड्याळ चिन्ह इतर राज्यांमध्ये इतर कुणालाही मिळू शकतो. याशिवाय इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवायची असल्यास राष्ट्रवादीला आता वेगवेगळे चिन्हं घ्यावे लागण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षांना निवडणुकीच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीवर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते.राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी पक्षाने लोकसभेच्या चार जागांवर विजय मिळवणं आवश्यक

असतं. याशिवाय चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मते मिळवणे आवश्यक असतं. तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा जिंकणं बंधनकारक असतं किंवा चार राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्षाचा किंवा राज्य पक्षाचा दर्जा मिळणं आवश्यक असतं. या निकषांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बसत नसल्याने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते 
१. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ४
जागा मिळाल्या पाहिजेत.
२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी २% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी ३ राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत.
३. पक्षाला कमीत कमी ४ राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी खालील निकषांपैकी एक निकष पूर्ण करावी लागते
१. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी ६% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी २ जागा मिळाल्या पाहिजेत किंवा
२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी ६% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी १ जागा मिळाली पाहिजे किंवा
३. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी ३% जागा किंवा कमीत कमी ३ जागा मिळाल्या पाहिजेत किंवा
४. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील २५ जागांमागे १ जागा मिळाली पाहिजे किंवा
५. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी ८% मते मिळाली पाहिजेत.

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे
१) राखीव निवडणूक चिन्ह मिळते
२) पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन मिळते.
३) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर मोफत प्रक्षेपण होते.
४) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!