भावार्थ दासबोध – भाग १५

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

अल्पधनाने माजू नये. हरिभक्ती करण्यास लाजू नये. पवित्र लोकांच्या सहवासात मर्यादा बाळगाव्या. मुर्खांच्या संपर्कात राहू नये. अंधारात कुठेही हात घालू नये. विसराळूपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये. स्नानसंध्या सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. आळसाने अनाचार करू नये. हरिकथा सोडू नये. निरूपणात कसूर करू नये. प्रपंचाच्या कारणाने परमार्थात मोडता घालू नये. देवाचा नवस बुडवू नये. आपल्या धर्माची थट्टा करू नये. विचार न करता भलते मनात घेऊ नये. निष्ठूरपणा धरू नये. जीवहत्या करू नये. अवकाळी किंवा पाऊस असेल तर जाऊ नये. सभा पाहून आपले धैर्य गळू देऊ नये. वेळप्रसंगी उत्तर देणे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य धारिष्ट कायम ठेवावे. गुरु विरहित असू नये. नीच गुरु करू नये. वैभव असलेतरी ते शाश्वत आहे असे मानू नये. सत्य मार्ग सोडू नये. असत्य पंथाला जाऊ नये. असत्याचा अभिमान कधीही बाळगू नये. अपकीर्ती सोडावी, सत्किर्ती वाढवावी!  विवेकाद्वारे सत्याची वाट धरावी. हे उत्तम गुण न घेतल्यास ते माणसाचे अवलक्षण होय. त्याचे वर्णन पुढील समामध्ये ऐका.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तम लक्षण नाम समास दितीय समाप्त.

दशक दुसरे समास तिसरा कुविद्येची लक्षणे 
आता अत्यंत हीन अशी कुविद्येची लक्षणे ऐका. त्यांचा त्याग करायचा आहे. कुविद्येमुळे जन्माला येऊन माणसाची हानी झाली आहे हे ही लक्षणे पाहून ओळखता येईल. कुविद्या असलेल्या माणसाला हे निरूपण ऐकून त्रास होईल कारण त्यामुळे अवगुण वाढतात.

काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, असूया, अविद्या, लोकेशणा,  वित्तेशण्णा, दारेषणा या तीन प्रकारच्या ईशणा, वासना, अतृप्ती, इच्छा वांछा, चिकित्सा, निंदा, अनिती, गावगुंडी, मस्ती, समजूनही न ऐकणे, विपत्ति, संकट, वाईट वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि चटपट तर्‍हेवाईकपणा, झटपट आणि वटवट, सदा खटखट आणि लटपट, परमव्यथा, कुविद्या, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशय आळशी आणि खादाड, मूर्ख आणि उर्मट, लबाड, अतिशय मूर्ख आणि तापट, वेडे आणि वाचाळ, अतिशय खोटारडे आणि तोंडाळ, समजत नाही आणि ऐकत नाही,  येत नाही आणि शिकत नाही, करत नाही आणि पाहत नाही,

अभ्यासाची दृष्टी नाही, अज्ञान आणि अविश्वास असलेले,  छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तांना पाहू न शकणारा, पापी आणि नींदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, हीन आणि नक्कल करणारा, रोगी आणि वाईट कर्म करणारा, कंजूष आणि वासनेमध्ये रमणारा,  हीन देह आणि ताठा असलेला, विश्वास न ठेवणारा आणि फाटे फोडणारा, बाष्कळ आणि करंटा, दुसऱ्याला शिकवणारा, उन्मत्त, निकामी डोलणारा, भ्याड आणि पराक्रम बोलणारा, कनिष्ठ आणि गर्विष्ठ, विषयासक्त आणि  द्वेष करणारा, भ्रष्ट, अतिशय अभिमानी आणि निर्लज्ज, संकटात सापडलेला आणि अतिशय दुष्ट दांभिक,  खोटारडा, लंपट आणि भिकारी,  खोटा आणि अनुपकार करणारा, अवलक्षणी आणि प्राणीमात्रांचा धिक्कार करणारा, अल्पमती आणि दीनरूप, भेद करणारा, किरकोळ गोष्टीचा त्रास वाटून घेणारा, कुशब्द बोलणारा, कठीणवचनी, कर्कश्यवचनी, मनात कपट ठेवून बोलणारा, संशय ठेवून बोलणारा, दुखवणारा, तीव्र शब्दात बोलणारा, क्रूर, निष्ठुर, दुरात्मा, दुसऱ्याचे न्युन सांगणारा, वेडसरपणे बोलणारा, अशुभ बोलणारा, बेभरवशाचे बोलणारा, द्वेष बाळगून बोलणारा, बाष्कळपणे बोलणारा, द्वेष करणारा,  धिक्कार करणारा, कपटी, कुटील, आतल्या गाठीचा हा मूर्ख होय. (क्रमशः) 

निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.