प्रगतिशील नाशिकची नवीन ओळख -||अष्टोप्रहर स्वरहोत्र ||

ज्येष्ठ व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, कथक गुरु डॉ. सुमुखी अथणी,ज्येष्ठ तबलावादक नितीन कमलाकर वारे यांचे विशेष लेख 

0

आज पर्यंत माझ्या पिढीने नाशिकमध्ये अग्निहोत्र काही ठराविक ब्रह्मविद्यावाच्य कुटुंबाकडून स्वीकारलेले ऐकले आणि पाहिलेले होते. दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तटी वसलेले आमचे नाशिक हे पुण्यक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र ही ….. येथे देश विदेशातुन पर्यटक येत असतात. अशा या तीर्थक्षेत्री स्वरांचा अहोरात्र जागर करीत स्वरहोत्र जागृत केले गेले ……

निमित्त होतं नववर्ष २०२३ चा प्रथम दिन ….. नाशिक मधील काही जेष्ठ संस्कृती जोपासक मंडळींनी कल्पना केली आणि ती कल्पनेच्या पलीकडे नेऊन अतिशय रेखीव नेटके आयोजन करून प्रत्यक्षात उतरवली. मुंबई आणि पुण्याच्या पाठोपाठ नाशिकही आपली नवीन ओळख निर्माण करू पहात आहे. ही ओळख निर्माण करण्यामध्ये नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्र अग्रणी आहे हे सांगणे नलगे. कारण मुंबई आणि पुणे सांस्कृतिक दृष्ट्या कितीही विकसित झालेले असले तरीही त्याला व्यावसायिकतेची एक परी सीमा त्यांनी स्वतःच घालून घेतल्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण व कलेच्या पूर्णानंदाचा तिथे बऱ्याचदा अभाव जाणवतो. म्हणून मला असे वाटते की नाशिकची सांस्कृतिक चळवळ नेमकी हीच उणीव भरून काढत आपली एक वेगळी ओळख निर्माण करु पहात आहे.

आमचे नाशिक शहर हे पुण्यक्षेत्राच्या बरोबरच सांस्कृतिकतेने संपन्न असे कलाक्षेत्र म्हणूनही विकसित झालेले आहे. ह्या पुण्यभूमीने भारतीय सांस्कृतिक क्षेत्राला मोठमोठी रत्ने दिलीत नाशिकच्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर,चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज थोर नाटककार वसंतराव कानेटकर आणि अनेक दिग्गज कलाकारांनी देशपातळीवर आपला नावलौकिक उमटवला.  अशा या नाशिक शहरी कलाकारांच्या मांदियाळी चे नियोजन करून त्यास दिवसाच्या आठ प्रहरांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताच्या समयचक्रानूरुप गायल्या वाजवल्या जाणाऱ्या विविध राग संगीतात गुंफुन नवीन वर्षाची पहिली सकाळ ते नवीन वर्षाची पहिली रात्र समस्त नाशिक करांकरता स्वरमयी करून त्यांना याद्वारे आनंद देण्याचा उपक्रम म्हणजेच स्वरहोत्र होय.

आम्हा नाशिककरांची नववर्षाची सुरुवात श्रीरामरायाच्या दर्शनाशिवाय पूर्ण कशी होणार ? म्हणूनच स्वरहोत्र सारख्या अतिशय उत्तम कल्पना असलेल्या उपक्रमाला श्री काळामंदिर संस्थान तर्फे पुढाकार घेऊन मंदिराचे पवित्रतेने भारलेले प्रांगण उपलब्ध करून दिले गेले. ह्या उपक्रमाला मिळालेला हा आशीर्वाद आणि शुभसंकेतच असे मी मानतो कारण श्री काळाराम मंदिर देवस्थान मध्ये सुरुवात झालेला हा उपक्रम दर वर्षी नवनवीन कलाकारांच्या सादरीकरणाने अधिकाधिक संपन्न होत जाणार हे नक्की.स्वरहोत्रच्या पहिल्या उपक्रमात नाशिक मधील अनेक ज्येष्ठ आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या कलाकारांनी आपली सेवा रुजू करून नववर्षाच्या पुढील कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त शुभारंभ केला या उपक्रमात धृपद गायनापासून ख्याल व बंदिश असे भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध प्रकार सादर केले गेले. शास्त्रीय रागसंगीताच्या बरोबरच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी वै ही त्या बरोबर सादर करण्यात आले. त्यामुळे स्वरहोत्र हा एक आगळावेगळा उपक्रम संपूर्ण भारतात आपला वेगळा ठसा उमटवत आहे हे निश्चित.

स्वरहोत्र उपक्रम उत्तरोत्तर एक मोठी उंची गाठेल यात शंकाच नाही. ह्या उपक्रमात नाशिक बाहेरूनही अनेक कलाकार सहभागी होतील आणि आमच्या नाशिक चा हा उपक्रम देशपातळीवर एक मानाचा आणि मैलाचा दगड ठरो त्याकरता सर्व आयोजकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!
अनिल दैठणकर
व्हायोलिन वादक
स्वरालिन व्हायोलिन अकादमी

_____________________________

अष्टौप्रहर निबध्ध संगीत ही भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरेची आहे. दिवसाच्या प्रत्येक प्रहराला सुयोग्य अश्या स्वर रचना – राग संगीत नेमून दिले आहे. प्रातःकालीन राग, सायंकालीन राग, मध्यान्ह राग अशी रागांची ओळख आहे. त्या त्या समयाला आठवलेले राग अतिशय प्रभावी ठरतात. अश्या आपल्या प्राचीन परंपरांना जपत व लोकाभिमुख करत अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यापैकीच एक म्हणजे या वर्षारंभाचा कार्यक्रम ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ होय.

नाशिकचा मानबिंदू श्री काळाराम मंदिर संस्थानाच्या सुंदर प्राचीन परिसरात आठ प्रहर अभिजात शास्त्रीय संगीताचे स्वर आळवले गेले. ध्रुपद गायक श्री सचिन चंद्रात्रे यांच्या बरोबर प्रथम प्रहराच्या स्वरधारेत मी सहभागी कलाकार होते पहाटे ६ ‌वाजता नाशिककर रसिक मंदिरात उपस्थित होते. भगव्या रंगाने पहिला प्रहर रंगलेला होता. पावित्र्य, उत्सुकता, रसिकता यामुळे सारे वातावरण भारलेले होते. पहाटेचा अंधूक प्रकाश आणि  रामनामाने सुरू झालेली आळवणी खरोखर अतिशय अविस्मरणीय अशी मैफल रंगत गेली. स्वरहोत्रचा पहिला प्रहर अर्थातच श्रीरामाच्या स्तवनाने सुरू झाला. श्री रामरक्षा स्तोत्र , श्रीराम भजन व रामनामाचा गजर या सादरीकरणाने दिवस कधी उगवला ते रसिकांना सुद्धा कळले नाही.

संतश्रेष्ठ तुलसीदासांची श्रीराम भजन ही रचना मी नेहमीच रंगमंचावर सादर करत आले आहे पण त्या दिवशी हनुमान मंडपात श्री रामराया सन्मुख नाचतांना जी अनुभूती मिळली ती मर्मबंधातली ठेव म्हणता येइल. अगणित श्रोत्यां- समोर जरी होते तरी श्रीराम प्रत्यक्ष आशीर्वादाला उभे आहेत ही भावना मन भारून टाकणारी होती. नवीन वर्षाची सुरुवात राम रायाच्या आशीर्वादाने!
स्वरहोत्र ने कलाकारांना तर आनंद दिलाच पण नाशिककर रसिकांनाही एक वेगळीच अनुभूती दिली. शास्त्रीय संगीताची एक जबरदस्त बैठक या निमित्त सादर झाली. दिवसभर कलाकारांची मांदियाळी होती. एक सुंदर समृद्ध अनुभव.
डॉ.सुमुखी अथणी

_________________________

|| अष्टोप्रहर स्वरहोत्र || अभिजात संगीताची अनोखी स्वरयात्रा………
‘अष्टोप्रहर’ संगीतावर प्रेम करणाऱ्या ‘चारचौघांनी’ मागीलवर्षी नाशिकचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामचंद्रांच्या पावन मंदिरात संकल्प केला, भारतीय शास्त्रीय संगीतातील राग समय चक्राचे तंतोतंत पालन करून दिवसाच्या आठही प्रहारांमधील राग वेगवेगळ्या गायक/गायिका यांचेकडून सादर करायचे, कागदोपत्री कल्पक आणि वेगळा वाटणारा हा संकल्प सिद्धीस नेणे हे तितकेसे सोपे नव्हते. परंतु तमाम नाशिकमधील शास्त्रीय, सुगम, गायक, नृत्य कलाकार तबलावादक व्हायोलीन, सितार, सारंगी, संवादिनी वादक, तानपुरा वादक अशा सर्व कलाकारांनी ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणण्यास कुठलाही हेतू कुठलीही अपेक्षा मनात न धरता सहभागी झाले. त्या संकल्पनेचे मूर्त रूप साकार झाले. दर्दी नाशिककर रसिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि ‘अष्टोप्रहरची’ संकल्पना यशस्वी झाली.

नाशिकचा गेल्या काळातील सांगीतिक इतिहास बघता अशी अनेक ठिकाणे होती आणि आहेत की जिथे सातत्याने संगीत सेवेचा शिरस्ता चालू होता आणि आहे. मेन रोडवरील डोंगरेंच्या गणपती मंदिरात देखील १२० वर्षांपासून दर गुरुवारी संगीत सेवा अविरत सुरू आहे. कापड पेठेतील बालाजी मंदिरात सुद्धा संगीत सेवा सुरू आहे.

तबलावादक क्षेत्रात नाशिक मधील ‘भाविक’ म्हणजेच कै. पंडित भानुदासजी पवार, कै. पंडित विजूकाका हिंगणे व पंडित कमलाकर वारे यांच्या नावाच्या अद्याक्षरांवरून ‘भाविक’ असे नाव पडले या तिघांनी नाशिकमध्ये तबल्याचे रोपटे लावले आज त्याचा वटवृक्ष होताना दिसतोच. आज नाशिकमध्ये ६००० च्या वर तबला वादक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नाशिकमध्ये अस्तित्वात असलेल्या 16 इंटरनॅशनल स्कूल्समध्ये संगीता बरोबरच तबल्याचा स्वतंत्र विभाग आहे. १०० च्या वर तबल्याचे क्लास नाशिक मध्ये अस्तित्वात आहेत. नाशिकमध्ये गायन, वादन, नृत्य क्षेत्रात काम करणारे आणि व्यवसायिक असलेले शेकडो कलाकार आहेत. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे अनेक कलाकार नाशिकचे आहेत.

बालाजी मंदिर कापड पेठ, बालाजी मंदिर गंगापूर, काळाराम मंदिर, पंचवटी नववर्ष स्वागत समिती, नाशिक यासारख्या संस्था कायम संगीत आणि संगीतकारांच्या, कलाकारांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. त्यातूनच ‘अंतर्नाद’, अनुभूती, परिक्रमा ह्या सारख्या हजारो विद्यार्थ्यांना एकत्र आणून कार्यक्रम सादर करण्याऱ्या संकल्पना साकार झाल्या आहेत.

नाशिकची समृद्ध संगीत परंपरा अष्टोप्रहारच्या निमित्ताने अजूनच सुदृढ होण्यास मदत होत आहे. उगवत्या कलाकारापासून बुजुर्ग कलाकारांचा हा मेळा, कलाकारांना आणि श्रोत्यांना पंढरपूरच्या वारीत होणाऱ्या आनंदाचा अनुभव करीत असतो. या द्वारे आपल्या संगीतातील अभिजात अशा समयचक्राचे, त्यातील थाटांचे त्यातून उत्पन्न होणाऱ्या रागांचे अनुभव त्या त्या वेळेला अनुभवास येणे ही नाशिककर श्रोत्यांसाठी सांगितिक शिक्षणाबरोबर आनंदाची अनुभूती असते.

येणाऱ्या वर्षात हा कार्यक्रम 14 जानेवारी 2024 रोजी बालाजी मंदिर, गंगापूर रोड येथे होत असून त्यात नव्यानेच नाशिककर तबला वादक विद्यार्थी, गुरु, शिक्षकआपला सहभाग नोंदवणार आहेत. तबला साथसंगती बरोबरच स्वतंत्र/समूह तबलावादनातून देखील त्या त्या प्रहरांची उत्कटता आपल्या नादातून ते साकार करतील यात शंका नाही. वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केलेल्या आणि अल्पावधीतच भारतभर लोकप्रिय झालेल्या ह्या कार्यक्रमास, या संकल्पनेस साकार करणाऱ्या सर्व आयोजकांना/संयोजकांना/कलाकारांना/ साथीदारांना/रसिकांना विनम्र अभिवादन आणि ही अष्टोप्रहर स्वरहोत्रची स्वर-ताल-नाद यात्रा उत्तरोत्तर बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद !
अष्टोप्रहरचा नादयात्री 
नितीन कमलाकर वारे
तबलावादक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.