बँकांनी कर्ज वसुली करतांना कायदा व कर्जदार यांचा समन्वय साधावा – श्रीकांत जाधव

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे कार्यशाळा संपन्न  

0

नाशिक – बँकांनी कर्जवितरण करतांना कागदपत्रे आणि त्या अनुषंगाने कायद्याचा आधार घऊन सुरक्षित कर्जवाटप करावे. कायद्यातील प्रभावी तरतुदीचा अभ्यास करुन, कर्जदार, जामिनदार यांचे अधिकार यांचा मेळ घालून कर्जवसुली नियोजनबद्ध, शिस्तशीपणे करावी व कर्जदार व बँकेचे नाते दृढ करावे. उत्पन्न, संकल्पना, संपत्तीचे वर्गीकरण तरतुदी या तीन घटकांचा समन्वय साधावा, असे प्रतिपादन महेश सहकारी बँक, पुणेचे सरव्यवस्थापक श्री. श्रीकांत जाधव यांनी केले.

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्या., नाशिकच्या सभासद सहकारी बँकांसाठी ‘‘बँका व वित्तीय संस्थांचा कर्ज वसुली कायदा सिक्युरिटायझेशन अधिनियम २००२ आणि नियम २००२(द सरफेसी अ‍ॅक्ट २००२)’’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री.श्रीकांत जाधव हे बोलत होते. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विश्वास जयदेव ठाकूर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेमध्ये बँका व वित्तीय संस्थांचा कर्ज वसुली कायदा सिक्युरिटायझेशन अधिनियम २००२ आणि नियम २००२ (द सरफेसी अ‍ॅक्ट २००२) या विषयावर तसेच कलम ४९ व सरफेसी कायदयातील प्रभावी तरतुदी, कर्जदार/जामीनदार अधिकार आणि अपील अधिकार, सरफेसी कायद्यांतर्गत मागणी नोटीस ते विक्री पर्यंत संपर्ण प्रक्रिया, कायद्यातील महत्त्वाचे आणि आवश्यक नमुने, प्राधिकृत अधिकार्‍यांची कामे, सरफेसी कायद्यासंबंधीत इतर कायद्यातील तरतुदी, मालमत्ता ताबा व लिलाव प्रक्रिया, सरफेसी कायद्यासंबंधीत परिपत्रके व राजपत्र, सहकारी बँका आणि सरफेसी कायदा, शासकीय देणे हक्कांपेक्षा, बँकेस प्राधान्य इतरही महत्त्वाच्या विषयावर श्री. श्रीकांत जाधव उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी वसुलीचे कामकाज करतांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन असोसिएशनचे कार्याध्यक्ष मा.श्री. राजेंद्र सुर्यवंशी तसेच असोसिएशनच्या जेष्ठ संचालिका डॉ. शशीताई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेमध्ये मनोगत व्यक्त करतांना असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले की, बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांना बँकांमध्ये थकबाकी वसुली कामकाज करतांना कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच प्रमाणे थकीत कर्जाची वसुली करतांना कोण कोणत्याप्रकारची काळजी घेतली पाहिजे. या विषयीचे मार्गदर्शन मिळणेसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

असोसिएशनच्या जेष्ठ संचालिका डॉ. शशीताई अहिरे म्हणाल्या की, बँकिंग क्षेत्रातील बदलत्या आव्हांनाचा सामना करण्यासाठी आधुनिक ज्ञानाचा स्विकार करण्याची गरज आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण बँकिंग देता येईल.समारोपप्रसंगी श्री समर्थ सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री. राधाकृष्ण नाईकवाडे म्हणाले की, कर्ज वसुली हा बँकेच्या आर्थिकस्थितीचा महत्त्वाचा भाग असतो. त्याबाबतीत कर्मचारी व अधिकार्‍यांनी कायम जागरुक असलेच पाहिजे. त्यासाठी अशा कार्यशाळेंचा उपयोग होईल.

या कार्यशाळेसाठी नाशिक जिल्ह्यातील ३३ सहकारी बँकांचे एकूण ४७ अधिकारी/कर्मचारी उपस्थिती होते. कार्यशाळेच्या समारोपप्रंसगी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र सुर्यवंशी, श्री. राधाकृष्ण नाईकवाडे व श्री. श्रीकांत जाधव यांच्या हस्ते कार्यशाळेस उपस्थित प्रतिनिधींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रास्तविक व आभार प्रदर्शन असोसिएशनचे व्यवस्थापक श्री.रामलाल सानप यांनी केले व सूत्रसंचलन मनिषा पगारे यांनी केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.