भावार्थ दासबोध – भाग २४

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक दुसरे समास ९ वा विरक्ताची लक्षणे
आता विरक्ताची लक्षणे ऐका. कोणत्या गुणांमुळे विरक्ताच्या अंगामध्ये योग्यांचे सामर्थ्य निर्माण होते ते पाहू या. ज्यामुळे सतत कीर्ती वाढते, जीवन सार्थक होते, महिमा वाढतो, ज्यामुळे परमार्थ वाढतो, आनंद निर्माण होतो ज्यामुळे विरक्ती वाढते, विवेक देखील उत्पन्न होतो. विरक्तीमुळे सुख उचंबळते. चांगली विद्या वाढते. मोक्षश्रीसह भाग्य प्रबळ होते. विरक्तीमुळे मनोरथ पूर्ण होतात, सगळ्या इच्छा तृप्त होतात. मुखामध्ये सरस्वती राहते,

बोलणे मधुर असते. ही लक्षणे ऐका आणि धारण करा म्हणजे या भूमंडळावर विख्यात व्हाल! विरक्त माणसाने विवेकी असावे, त्याने अध्यात्म वाढवावे, इंद्रियांचे दमन करण्याचा धीर दाखवावा. विरक्त माणसाने नेहमी साधन करावे, नेहमी भजन करावे, विशेषकरून ब्रह्मज्ञान प्रगट करावे. विरक्त माणसाने भक्ती वाढवावी. शांती दाखवावी, प्रयत्नपूर्वक विरक्ती राखावी. सत्क्रिया करावी, निवृत्तीचा विस्तार करावा. उदासीनता धरावी. धर्माची स्थापना करावी, नीती अवलंबन करावी, एखाद्याची चूक झाल्यास आदराने क्षमा ककरावी, परमार्थ उजळावा, विचाराचा शोध घ्यावा, सन्मार्ग व सत्वगुण जवळ करावा. विरक्त व्यक्तीने भाविकांचा सांभाळ करावा,

प्रेमाने सगळ्यांना शांत करावे, शरणागत आलेल्या भोळ्याभाबड्या भाविकांची उपेक्षा करू नये. विरक्ताने अत्यंत दक्ष असावे. त्याने मनाचे ऐकावे. परमार्थाचा कैवार घ्यावा. विरक्ताने अभ्यास करावा, विविध प्रश्नांची उत्तरे शोधावीत. विरक्ताने मोडकळीस आलेला परमार्थ वक्तृत्वाद्वारे जोपासावा. त्याने विमल ज्ञान बोलावे, विरक्ताने वैराग्याचे स्तवन करीत जावे. निश्चयाचे समाधान करावे. विरक्त माणसाने मोठे उत्सव साजरे करावेत भक्तांना भोजन द्यावे, खटपट करून उपासनामार्ग चालवावा.

विरक्ताने हरिकीर्तने करावी, निरूपण करावी, भक्तिमार्ग वाढवून निंदक आणि दुर्जनांना लाजवावे. अनेक जणांवर उपकार करावे, भलेपणाचा जीर्णोद्धार करावा, पुण्य मार्गाचा विस्तार प्रयत्नपूर्वक करावा. स्नानसंध्या, जपजाप्य, ध्यान, तीर्थयात्रा, भगवदभजन, नित्यनियम, पवित्रपण मन शुद्ध राखणे करावे. दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, आपल्या संगतीने विश्वजन उद्धरावा. विरक्ताने धैर्यवान असावे, उदार राहावे. विरक्ताने निरूपणाविषयी तत्पर असावे. विरक्ताने सावध असावे, शुद्ध मार्गाने जावे, स्वतः भिजून चांगली कीर्ती मागे उरवावी. विरक्ताने अन्य विर्क्तांचा शोध घ्यावा, साधू ओळखावे,

संत योगी सज्जन यांना मित्र करावे. विरक्ताने पुरुश्चरणे करावी, तीर्थाटणे फिरावी, नाना रमणीय स्थाने हिंडावे, विरक्ताने भरपूर प्रयत्न करावे तरीदेखील उदासीन वृत्ती सोडू नये, कोणा एकाविषयी वाईट इच्छा धरू नये. विरक्ताने स्वतःशी एकनिष्ठ असावे. विरक्ताने पराधीन होऊन क्रियाभ्रष्ट होऊ नये. विरक्ताने समय जाणावा, विरक्ताने प्रसंग ओळखावा, विरक्त सर्वप्रकारे चतुर असावा. विरक्ताने एकाच देशात राहू नये, सर्व अभ्यासावे, विरक्ताने आहे तसे सर्व जाणावे. हरिकथा निरूपण, सगुणभजन, पिंडज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे. कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग हे सर्व जाणावे.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.