शिक्षणाचा नवा आयाम : खेळ, संगीत आणि व्यायाम – भाग १
बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३४ -लेखिका -आदिती मोराणकर
संत्री लिंबू पैशा पैशाला
शाळेतल्या मुली आल्या बघायला
बघता बघता खोकला आला
खो, खो, खो
हाताची कमान करून लहानपणीचा हा खेळ सगळ्यांना आठवतो का? काय काय शिकलो आपण यातून? एका रांगेत त्या कमानी खालून जाण्याची शिस्त, संत्री लिंबू विकत घेण्यासाठी पैसे लागतात ही गोष्ट आणि जास्त संत्री लिंबू खाल्ले तर खोकला आपल्याला जखडतो ही शिकवण आपल्याला या खेळातून मिळाली. विचार करा ही शिकवण देण्यासाठी जर पाठ्यपुस्तकात चार पानी धडा असता तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहिलं असतं का?
शाळा सुटल्यानंतर सोहमची आई त्याला घ्यायला आली होती. दोन शब्द माझ्याशी बोलायला म्हणून त्या माझ्याजवळ थांबल्या आणि तेवढ्यात बाहेर जाऊन सोहम दोन्ही हातात छोटे छोटे दगड गोळा करून घेऊन आला. त्याच्या हातात मातकटलेले दगड बघून त्याची आई जोरात त्याच्या अंगावर ओरडली “बावळट, फेक ते आधी…कुठलाही कचरा गोळा करून आणतो आणि खेळत बसतो.” त्याच वेळेला पाणावलेल्या डोळ्यांनी सोहमने माझ्याकडे पाहिलं. मला समजलं की हे मोठ्या कष्टाने गोळा करून आणलेले दगड असेच फेकून देणे त्याच्या जीवावर आले आहे. मग मी माझे दोन्ही हात पुढे केले आणि त्याला एक एक दगड माझ्या हातात टाकून मोजायला सांगितले. पाणवलेल्या डोळ्यात अचानक वेगळीच चमक आली आणि माझ्या हातात एक एक दगडा बरोबर ज्ञानाचे दान पडू लागले.
आपली मुलं दगड गोळा करतात, काठ्या गोळा करतात, पाने गोळा करतात, पालापाचोळा उचलून आणतात, मातीवर चढतात, पडतात, उड्या मारतात, पावसाळ्यात चिखलात उड्या मारतात, पाण्यात नाव सोडतात, याबद्दल काही बालकांना अतिशय राग येत असतो. कुणी मुलांना ‘कपडे खराब करू नका’ म्हणून सांगतात कुणी मुलांना ‘हात घाण होतील, कचऱ्यात घालू नका’ म्हणून बजावतात तर कोणी मुलांना ‘मातीत जाऊ नका, चिखलात खेळू नका’ असं सांगून घरात डांबून ठेवतात. कालांतराने हेच पालक ‘आमचं मूल अजिबात सोशल नाही’, ‘एकलकोंडा झाला आहे’, ‘सतत मोबाईल बघतो’ अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे आल्यानंतर मला अजिबात नवल वाटत नाही.
दुर्दैवाने “शिक्षण”चा अर्थ आपण फक्त पुस्तकांपुरताच मर्यादित ठेवला आहे. पुस्तक उघडलं की अभ्यास चालू होतो आणि पुस्तक बंद केलं की अभ्यास संपतो अशा कुठल्याशा मानसिकतेमध्ये आपण मुलांनाही अडकवायला बघतो. लहान मुलांचं शिक्षण हे मेंदू आधारित असतं हे आता शास्त्राने सिद्ध झालेलं आहे. त्यातही बाल शिक्षणाचे वय हे शून्य ते आठ वर्ष समजले गेले आहे. आठव्या वर्षापर्यंत सुमारे 80 टक्के मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते आणि शून्य ते आठ या वयात मेंदूच्या वाढीची गती प्रचंड असते. मुलाला जग समजून घेण्याचा उत्साह असतो, उत्कंठा असते आणि म्हणूनच मूल जे काही दिसत आहे ते बघण्याची, हाताळण्याची संधी शोधत असतं. आपण मात्र त्याला यातून वाईट सवयी लागतील म्हणून सतत अडवत असतो.
खरंतर प्रत्येक गोष्टीतून, हालचालीतून, आजूबाजूच्या वातावरणातून सतत काहीतरी शोधण्याचा आणि त्यातून शिकण्याचा मुलांचा प्रयत्न चालू असतो. त्या गोष्टींचा त्यांना अनुभव हवा असतो. त्या अनुभवाला कृतीची जोड मिळाल्यानंतर जे शिक्षण होते ते कायमस्वरूपी टिकते; पण नेमकं हेच पालकांसाठी भयंकर डोकेदुखीचे ठरतं. शिक्षणाचा नवा आयाम, खेळ संगीत आणि व्यायाम असे जेव्हा मी म्हणते, तेव्हा ‘खेळ हे आता मुलांच्या शिक्षणाचं अविभाज्य अंग आहे हे पालक म्हणून आपण मान्य करायला हवं’ याविषयी मी आग्रही असते. वेगवेगळ्या गोष्टींना हाताळणं, त्यांच्याशी खेळणं, त्यातून काही नवीन आकृत्या बनवणं, वस्तू मोजणं, त्यांचा रंग ओळखणं, त्यांच्या जोड्या लावणं, हे दिसताना तुम्हाला खेळणं दिसत असलं तरीही त्यातून आपलं मूल शिकत आहे आणि आनंदाने शिकत आहे हे मान्य करायला हवं.
हे करताना त्यांच्यावर निर्बंध घालणं म्हणजे त्यांच्या विकासाला बाधा ठरतं. सतत ‘नाही, नको’ अशी नकार घंटा जर वाजवत राहिलात तर मुलांमध्ये “न” प्रेरित गुण जसं नाकारतेपणा, निष्क्रियता, निरसता, वाढीला लागतील. बुद्धिमत्ता म्हणजे केवळ लिहिणे, वाचणे, मोजणे किंवा बोलणे नव्हे. प्रत्येक मुलाचे बुद्धिमत्तेचे स्वरूप वेगवेगळे असते.हॉवर्ड गार्डनरच्या “मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीचा” जर अभ्यास केला तर लक्षात येईल की बुद्धिमत्ता आठ प्रकारच्या असतात आणि प्रत्येकाचा बुद्धिमत्ता पट वेगळा असतो. मुलाची जी बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असते त्या अनुषंगाने ते मुल अनुभव घेण्यासाठी आतुर असतं. स्वतःला शिकण्यासाठी नवीन संधी शोधत असतं आणि ही संधी देणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य असतं. मेंदूला शिकणं किंवा शिक्षण घेणं हा अनुभव जर सुखद वाटला तरच मुलं आनंदाने शिक्षण घेतात. त्यांची वाढ निकोप आणि निर्दोष होते आणि पुढच्या जीवनात अशी मुलं समाधानी प्रसन्न, आनंद निर्माण करणारी बनतात.
वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये इंटरव्यू देण्यासाठी जेव्हा उमेदवार जातात तेव्हा त्यांना विशिष्ट प्रकारचे गेम खेळायला देतात. गंमत वाटली असेल वाचून पण त्या मागचे उद्दिष्ट जर समजून घेतलं तर तुम्हाला बाल शिक्षणातील खेळाचे महत्व लक्षात येईल. जेव्हा मुलाखती ऐवजी चार पाच तास उमेदवाराकडून गेम खेळून घेतले जातात तेव्हा त्यांच्यावर अनेक कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवली जाते. याला ‘स्क्रीन इन इंटरव्यू’ म्हणतात. तिथे बसलेली निवड अधिकारी समिती तुमची गेम खेळण्याची पद्धत, तो गेम खेळताना तुमच्या वागणुकीत झालेले बदल, तुमची गेम सॉल्व्ह करण्याची क्षमता आणि एखादं काम तुम्हाला दिल्यानंतर सलगपणे ते करण्याची हातोटी या सगळ्याचं निरीक्षण करत असतात. या समितीमध्ये मानसोपचार तज्ञ देखील असतात. हे गेम खेळताना जर तुमची वागणूक नकारात्मक वाटली तर इंटरव्यूच्या आधीच तुम्ही बाद होता कारण दहा-पंधरा मिनिटांच्या इंटरव्यूमध्ये जो मूळ स्वभाव कळत नाही, त्या मूळ स्वभावाची ओळख गेम खेळता खेळता होत असते.
शिक्षणाचा नवा आयाम म्हणून खेळायला स्वीकारताना खेळाकडे बघण्याचा आपणा पालकांचा दृष्टिकोन आता विस्तृत व्हायला हवा. लहानपणी खेळल्या जाणाऱ्या खेळांकडे आपण फार गांभीर्याने बघतच नाही, उलट कोणी मूर्खपणा करत असेल तर त्याला आपण “पोरखेळा”ची उपमा देतो पण खरं पाहिलं तर खेळाला आपला असा एक खास अर्थ असतो. क्वचित प्रसंगी आपण मुलांच्या खेळाला प्रोत्साहन दिलं तर आपण त्याला केवळ दोन मोजमापातच बांधून ठेवतो. जिंकणं किंवा हरणं यात जेव्हा खेळ बांधला जातो तेव्हा त्या खेळातला आनंद संपलेला असतो. खेळाचे दोन प्रकार आहेत स्पर्धा आधारीत हा एक प्रकार तर मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी उपयुक्त असणारे स्पर्धा विरहित खेळ हा दुसरा प्रकार!
खरंतर या दोन्ही प्रकारच्या खेळात आणि त्यांच्या अर्थांमध्ये गुणात्मकदृष्ट्या खूप फरक आहेत. पहिल्या प्रकारच्या खेळात स्पर्धेत सहभागी होणं, ती स्पर्धा जिंकणं, तूच जिंकला पाहिजे या भावनेला प्राधान्य देणे याचा समावेश होतो. तर दुसऱ्या प्रकारच्या खेळात स्पर्धाच नसल्यामुळे मूल सहजपणे, नैसर्गिकपणे त्या खेळात रममाण होतं आणि कृतीशील अनुभवातून एक नवा अविष्कार जन्म घेतो.. इथे स्पर्धाच नसल्यामुळे कुठलेही आखीव रेखीव नियम नसतात. खेळाचे नियम मुलं स्वतःच ठरवतात. कधी एकट्याने खेळतात, कधी गटात खेळता आणि जिंकण्या हरण्याचा तर प्रश्नच नसतो.
“लहान मुल जेव्हा स्वतःशी खेळत असतं आणि आजूबाजूचे घटक त्याच्या खेळण्याला प्रतिसाद देत असतात, त्यावेळेला त्याच खेळाचा आधार घेऊन, त्याच्या डोक्यातल्या कल्पनेला पुढे नेऊन, अमूर्त कल्पनांना मूर्त रूप देण्याची किमया ते बालक घडवू शकतं” असा सिद्धांत बाल शिक्षणतज्ञ वायगॉटस्कीने मांडला आहे. जर हा विषय एवढा खोल असेल तर आपणही तो नीट समजून घेतला पाहिजे कारण सर्जनशीलता आणि खेळ यांचा घनिष्ठ संबंध असल्याचं आता शास्त्राने सिद्ध झालेलं आहे.
‘लकडी की काठी, काठी पे घोडा’ हे गाणं आपणही आपल्या लहानपणापासून ऐकलं आहे. आपली मुलंही या गाण्यावर ठेका धरून, झाडूवर-काठीवर बसून घरभर फिरतात तेव्हा त्या काठीला ,त्या झाडूला घोडा मानण्याचं स्वातंत्र्य आपण मुलांना दिलेलं असतं. त्यांच्या त्या कृतीचं आपण कौतुक करतो कारण कधीकाळी आपणही ही गोष्ट लहानपणी केलेली असते. या पलीकडे जाऊन मुलांनी दुसरा एखादा खेळ खेळला की मग मात्र आपण त्यावर मोठी फुली मारतो, का? तर आपण ते कधीच केलेलं नसतं ना! आपण केलं नाही म्हणून त्यांनीही ते करूनही असा दुराग्रह सोडायला हवा. मुल जेव्हा स्वतः खेळत असतं किंवा इतर मुलांबरोबर खेळताना स्वतः नियम बनवत असतं तेव्हा त्याच्या मोकळ्या विचारातून सर्जनशीलता जन्म घेत असते. तिथे आपले पूर्वग्रह त्यांच्या विकासात बाधा ठरतात. दुर्दैवाने मुल जेव्हा खेळत असतं तेव्हा आजूबाजूची मोठी माणसं, शिक्षक, पालक यांच्यामुळेच त्याच्या खेळाचे नुकसान होतं असा अनुभव आहे, म्हणून यापुढे तुमचं मुल जेव्हा तुम्हाला आनंदाने एखादा खेळ खेळताना दिसेल तेव्हा त्यांचे निरीक्षण करा. जमल्यास त्याच्या नोंदी ठेवा. त्यांच्या खेळण्यातले बारकावे लक्षात घ्या. ज्यातून त्यांच्या विचारांची दिशा तुम्हाला समजेल आणि तुमचं मुल तुम्हाला नव्या अर्थाने उमगेल. खोटं वाटतंय? इथे सुद्धा तुम्हाला सत्याचा आधार देते. पियाजे सारख्या दिग्गज मानसशास्त्रज्ञाला जी कीर्ती प्राप्त झाली, जे यश मिळालं, त्याची सुरुवात त्याने स्वतःच्या मुलांच्या केलेल्या निरीक्षणाच्या नोंदीतून झालेली होती. पियाजेला जे जमलं त्यातलं थोडं फार आपल्याला जमेलच ना? मुलांच्या खेळाच्या तपशीलवार नोंदी तुमच्याकडे असतील तर त्यातून तुम्हाला मुलाची आवड, त्याची सर्जनशीलता, त्याच्या स्वभावाचे गुणविशेष समजायला अतिशय मदत होते.
गिजुभाई बधेका हे बालशिक्षणातलं खूप मोठा नाव आहे. त्यांना “मुछाली माँ” अर्थात ‘मिशीवाली आई’ अशी पदवीच पालकांनी दिली होती. त्यांच्या शाळेत एक मोकळी खोली होती. विविध प्रकारचं खेळाचे साहित्य घेऊन ते मुलांना खोलीत पाठवायचे. खोलीत एकही शिक्षक नसायचा. मात्र त्या खोलीच्या दाराला त्यांनी भोक करून ठेवली होती. शिक्षकांचं काम काय? तर बंद दरवाजा बाहेरून त्या भोकामधून शिक्षकांनी मुलांचे निरीक्षण करायचं आणि त्याच्या नोंदी ठेवायच्या. त्या नोंदींमधून मुलांच्या वाढीचा, विकासाचा अंदाज घेऊन मग पुढचा अभ्यासक्रम ठरवायचा आणि त्यांच्यासाठी नवीन साहित्य निर्मिती करायची हा हेतू यामागे होता.
आपल्या दुर्दैवाने “खेळ या शब्दाची जागा गेम्स”ने घेतली आहे आणि गेम्स हे स्क्रीन पुरतेच मर्यादित राहिले आहेत. आपणही मुलांना स्क्रीनवर शैक्षणिक गेम्स खेळायला देतच असाल . माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, सतत वन टू थ्री फोर, एबीसीडी, जॉनी जॉनी, जॅक अँड जिल, अ आ इ ई, याचा भडीमार करणारे खेळ, यु ट्यूब व्हिडिओ दाखवून मुलांचं शिक्षण होणार नाही. त्याऐवजी चार वेगवेगळ्या तुकड्यांवर अ आ इ ई लिहुन त्याला समर्पक चित्र मुलांना शोधायला लावा, कॅपिटल ए आणि स्मॉल एची फरशीवर जोडी लावायला द्या, सोहम सारखे दगड, गोट्या, मणी, काबुली चणे मोजुन वन टू थ्री फोर शिकवा, मुलांना खेळताना शारीरिक हालचाल करू द्या, हातांचा, डोळ्यांचा, शारीरिक हालचालींचा, मेंदूचा समन्वय साधू द्या. यातून जे शिक्षण होईल तेच मुलांना येणाऱ्या भविष्यासाठी तयार करणार आहे याची खात्री बाळगा.
आपण शिक्षणाच्या माध्यमातून माहिती मुलांच्या डोक्यामध्ये कोंबण्याचा जो भगीरथ प्रयत्न करत असतो त्यातून मुलं काही टक्के माहिती कदाचित लक्षात ठेवतात, पुन्हा सांगतात आणि परीक्षेमध्ये लिहिल्याबरोबर विसरूनही जातात. कारण या औपचारिक माहितीला अनौपचारिक खेळांमधून मुलांनी अनुभवलेलं नसतं. त्यांच्याकडे स्वतःच्या अनुभवाचा पाया तयारच होत नाही. तेवढा अवकाश आपण त्यांना देतच नाही. जगातली स्पर्धा वाढते आहे म्हणून अगदी लहानपणापासून खेळू न देता फक्त अभ्यास म्हणजे शिक्षण या मानसिकतेला थांबवायला हवं. ही वृत्ती मुलांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. खेळांमधून अनौपचारिकपणे मुलांचं अनुभव विश्व विस्तारू द्या. त्यातूनच जगाच्या स्पर्धेला तोंड द्यायला आपली मुलं सक्षम होणार आहेत याचा विश्वास बाळगा!
“शिक्षणाचा नवीन आयाम- ‘खेळ, संगीत आणि व्यायाम’ यापैकी या लेखात “खेळ” आपण समजून घेतला. पुढील लेखात संगीतावर लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. ही लेखमाला तुम्हाला कशी वाटते आहे ? तुम्हाला याचा काही उपयोग होतो आहे का? हे मला नक्की कळवा. भेटूया पुढील रविवारी, धन्यवाद!
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन व डे केअर सेंटर.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
No. One
पुन्हा एकदा एक उत्तम विषय आणि उत्तम मांडणी