अति सर्वत्र वर्जयेत

3

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आपली मुलं कित्येक तास मोबाईलवर अनेक लोकांशी संपर्कात असतात पण आपण मात्र त्यांच्या नेटवर्कमध्ये येण्याची फक्त धडपड करत असतो. बाहेरच्या वर्च्युअल जगाला “अव्हेलेबल” असणारी आपली मुलं आपल्यासाठीच “आऊट ऑफ कव्हरेज” असतात!
 
इंग्लिश मधले काही शब्द खूपच इंटरेस्टिंग आहेत. इम्पॉसिबल, इंटरनेट या शब्दांना वेगळ्या दृष्टिकोनातून बघता तेव्हा त्या शब्दांचे अर्थ शब्दश: बदललेले दिसतात. “इम्पॉसिबल” या शब्दाच्या स्पेलिंगची फोड केली तर इम्पॉसिबल शब्द स्वतःलाच “आय एम पॉसिबल” (I M Possible) असं सांगताना दिसतो तर दुसरीकडे इंटरनेट या साध्या शब्दातून “खोल-खोल जाळ्यात अडकल्याची भावना व्यक्त होते” आणि आज-काल ही भावनाच बराचश्या पालकांची चिंता बनली आहे. मोबाईल आपल्या हातात आला या आनंदात आपण मोबाईलच्या हातात कधी गेलो हेच आपल्याला समजलं नाही. मग आपल्या हातात सतत दिसणारा मोबाईल आपल्या मुलांसाठी उत्सुकतेचा विषय बनला. 
 
इंटरनेट या शब्दांमधील नेटचा अर्थ अगदी सहजरित्या “जाळं” असा आपण घेऊ शकतो आणि “इंटर” या शब्दाचा अर्थ तपासला असता ‘इंटर’ या शब्दाचे अनेक अर्थ सापडले.  त्यातलाच एक “प्रेताचे दफन करणे” हाही होता! खरंच इंटरनेटच्या जाळ्यात सापडून माणसा-माणसांमधील नाती संपुष्टात येत आहेत, शब्दशः मरत आहेत, असं लिहितांनाही खूप वाईट वाटत आहे.  (“इंटर” या शब्दाचा अर्थ शोधायला परत इंटरनेटची मदत घ्यावी लागली यावर हसावं का रडावं? )
 
 
गुन्हेगारीवर आधारित टीव्हीवरील काही मालिका अतिशय गाजल्या होत्या. या मालिकांमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे आणि त्या गुन्ह्यांच्या तपासाची प्रक्रिया रंजक पद्धतीने दाखवली जायची. अनेक वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या वयोगटातील गुन्ह्यांचा त्यात समावेश असलेला दिसायचा, आता मात्र गुन्हेगारी जगताचा वेध घेणाऱ्या मालिकांमध्ये 80 टक्के गुन्हे हे किशोरवयीन मुलांच्या बाबतीत किंवा किशोरवयीन मुलांनी केलेले आढळतात. त्यातही गुन्हा करण्यामागचे कारण हे 90 टक्के सोशल मीडिया, त्यावरुन झालेली मैत्री, त्यातून निर्माण झालेले प्रसंग आणि त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी घडलेले गुन्हे हेच दाखवत आहेत.
 
मला वाटतं ही आपल्या सगळ्याच पालकांसाठी नुसतीच धोक्याची घंटा नसून समाजात या चाललेल्या नाटकाची तिसरी घंटा असावी. आतातरी या तिसऱ्या घंटेनंतर तुमच्या डोळ्यांवर असलेला पडदा बाजूला करा आणि आपल्या घरातली, आपली मुलं या मोबाईलच्या, इंटरनेटच्या जाळ्यातून कसे बाहेर पडतील याचा नीट विचार करा.
 
अनेकदा आपल्याला वाटतं की मी कुठे जास्त वेळ मोबाईल बघतोय? आत्ताच तर घेतला होता! “सकाळपासून बघितलाच नव्हता एवढं बघते आणि ठेवून देते” या वाक्यांबरोबर हातात उचललेला मोबाईल परत खाली ठेवला जात नाही आणि आपण तासन-तास मोबाईल मधल्या आभासी प्रतिमा, सोशल मीडियावर आलेल्या मीम्स, पोस्ट यामध्ये हरवून जातो. 
आपल्या घरात या मोबाईलची इंट्री जेव्हा झाली तेव्हा आत्ता चाळिशीत असलेली आपली पिढी नुकतीच कॉलेजला जाण्याच्या मार्गावर होती आणि तेव्हा आपल्या हातात आलेले मोबाईल हे फक्त एकमेकांशी संवाद साधण्याचं माध्यम होते. आलेला फोन उचलणे किंवा हातातल्या मोबाईलवरील बटनांनी नंबर दाबून फोन लावणे, प्रसंगी एखादा संदेश पाठवणे एवढाच उपयोग मोबाईलचा होता. हळूहळू मोबाईल स्मार्ट होत गेला. अनेक नवीन ॲप आले जे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हवेहवेसे वाटू लागले. मोबाईल अपडेट करण्याच्या गोंडस नावाखाली आपला मोबाईल प्रत्येक वेळेला एक नवीन भस्मासुर बनत होता आणि आपल्या एकेक क्षणाचा घास घेत होता. मोबाईल आपल्या हातात आला या आनंदात आपण मोबाईलच्या हातात कधी गेलो हेच आपल्याला समजलं नाही. मग आपल्या हातात सतत दिसणारा मोबाईल आपल्या मुलांसाठी उत्सुकतेचा विषय बनला. 
 
अर्थातच आपल्याला एखाद्या गोष्टीची वाईट बाजू अनुभवातून समजते. एव्हाना मोबाईलची काळी बाजू पालक म्हणून आपल्या लक्षात आली आहे आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांना “जास्त वेळ मोबाईल घेऊ नका, बाहेर खेळा, काहीतरी नवीन गोष्टी बनवा, काही नाही तर वाचन करा” या गोष्टी सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण आपण जेवढे नाही म्हणतो तेवढेच ही मुलं हट्टाने मोबाईल घेऊन बसतात. 
 
काल रात्री झोपताना एका मालिकेत सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून जीव गमावलेल्या सतरा वर्षाच्या मुलाची गोष्ट पाहिली आणि सहाजिकच उठल्यापासून तोच विचार मनात येतो आहे. माझ्या घरात किशोरवयीन मुलगी आहे तसंच तुमच्या घरात मुलं आहेत आणि म्हणूनच तुम्ही माझा लेख वाचत आहात. खरोखर खूप गंभीर होऊन या विषयाकडे बघण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आपली मुलं कित्येक तास मोबाईलवर अनेक लोकांशी संपर्कात असतात पण आपण मात्र त्यांच्या नेटवर्कमध्ये येण्याची फक्त धडपड करत असतो बाहेरच्या वर्च्युअल जगाला असणारी आपली मुलं आपल्यासाठीच आऊट ऑफ कव्हरेज असतात. संवाद होत नाहीत. मोबाईलच्या विषयावरून काही बोलायला गेलं तर फक्त वाद होतात. अगदी टोकाचे वाद झालेले सुद्धा माझ्या ऐकिवात आहेत. एखादी गोष्ट आपण मुलांना त्यांची सोय म्हणून देतो, तीच गोष्ट त्यांच्यात आणि आपल्यात वादाचा विषय व्हावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. 
 
मोबाईल देताना एक जबाबदारी मुलांवर वाढत असते आणि ती म्हणजे तो मोबाईल योग्य वेळेला, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. मुलं मात्र मोबाईल मिळाल्यानंतर आई, वडील, घर सगळं विसरून त्यातच रमतात आणि मग त्यातूनच अनेक अनोळखी व्यक्तींचा प्रवेश आपल्या नुकत्याच उमलू पहाणाऱ्या मुलांच्या आयुष्यात होतो. प्रत्येक वेळी या व्यक्ती अयोग्य किंवा चुकीचे असतील असं माझं म्हणणं नाही पण सध्याचे एकंदरीत चित्र बघता या अनोळखी व्यक्ती प्रसंगी आपल्या मुलाच्या आयुष्याला धोका ठरू शकतात, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जोपर्यंत मुलं आई-वडिलांचं बोट धरून चालत असतात तोपर्यंत त्यांनी कुणाशी बोलावं, कोणाच्या घरी जावं, कुठे मुक्कामी राहावं हे सगळं आपण ठरवतो आणि मुलंही ते मान्य करतात, पण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा हळूहळू पुसली जाते आणि आई-वडिलांनी घेतलेला कुठलाही निर्णय मुलांना मान्य नसतो. आई-वडील जबरदस्तीने आपल्यावर काही गोष्टी लादत आहेत अशी भावना मुलांच्या मनात निर्माण व्हायला लागते. आपण त्यांना मोबाईल दिल्याचा आनंद तर केव्हाच मावळलेला असतो आणि ‘मोबाईल घेऊन दिला पण वापरू देत नाही’ अशी एक नवीन तक्रार मुलांकडे तयार असते. ही परिस्थिती जवळपास सगळ्याच घरी बघायला मिळते. 
 
मुलांना मोबाईलची ओळख आपणच करून देतो. माझ्या पाळणाघरात काही मुलं येतात आणि त्यांचा डबा न खाता जेव्हा घरी परत जातो तेव्हा त्यांची आई मला सहज सूचना देते की ‘मॅडम त्यांना मोबाईल दाखवा व्यवस्थित जेवतात’, जेव्हा एखाद मुल रडायचं थांबत नसतं आणि त्यांची आई दहा-पंधरा मिनिटं खाली उभी असते तेव्हा आमचे त्या मुलाला रमवण्याचे आटोकाट प्रयत्न थांबवत ‘मॅडम पाच मिनिट मोबाईल दाखवता का त्याला? तो लगेच शांत बसेल.’ असा सल्ला देऊन जाते. याला काय म्हणायचं? पाळणा घराच्या चार पाच तासानंतर जेव्हा ही मुलं घरी जात असतील आणि त्यांचे आई-वडील व्यस्त असतील तर तिथेही मुलांच्या हातात मोबाईल घेऊन त्यांना रमवलं जातं आणि इथूनच त्यांना मोबाईलची सवय लागते. अत्यंत कमी वयात लागलेली ही सवय सुटायची शक्यता नगण्य असते. अनेकदा जेव्हा घरी कोणीच नसतं तेव्हा ही मुलं मोबाईलचाच आधार घेतात. 
 
मुलांना खरंतर पालकांचा सहवास हवा असतो. त्यांचा भावनिक आधार पाहिजे असतो आणि जेव्हा ही मुलं घरात एकटी असतात तेव्हा इंटरनेटच्या जाळ्यात अलगद सापडतात. अनेक कुटुंबांमध्ये आई-वडिलां व्यतिरिक्त इतर मंडळी असतात पण आई-वडिलांशी जे नातं, जी नाळ जोडलेली असते, ती घरातल्या इतर व्यक्तींशी असेलच असं नाही. मग घरात दिवसभर चाललेला संवाद-विसंवाद, चिडचिड यातून मार्ग काढण्यासाठी मुलं मोबाईलचा पर्याय निवडतात. कानात हेडफोन घालून आपल्या आजूबाजूचा आवाज दाबला जातोय का याचा प्रयत्न करतात. मात्र या सगळ्यांमध्ये मुलांचा भावनिक विकास थांबतो. ती मुलं आजूबाजूला चाललेल्या किंवा घडत असलेल्या प्रसंगांमधून स्वतःला “आयसोलेट” करायला शिकतात.
मग एकाकी राहण्याकडे त्यांचा कल वाढतो. घरात घडणाऱ्या प्रसंगांमध्ये त्यांची काहीच भूमिका नसते. त्यांचं काहीच म्हणणं नसतं. म्हणजेच एका अर्थाने ते स्वतःला एकट करून घ्यायला समर्थ झालेले असतात, हे खूप गंभीर आहे. घरात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांचा सहभाग असावा, त्यांनाही त्या गोष्टींचा आनंद घेता यायला हवा, एखादी वाईट गोष्ट घडली तर त्यांच्या ही डोळ्यात पाणी यायला हवं, एखादी वेदनादायक परिस्थिती आली तर त्यांनाही त्याचा त्रास व्हायला हवा आणि तो त्रास त्यांनी व्यक्त करायला हवा, तर आणि तरच ही मुलं नॉर्मल आहेत असं समजता येईल!
 
तुमच्या मुलांना मोबाईलची सवय लागली आहे का? हे समजून घेण्यासाठी काही गोष्टी तपासून बघा.
 
@ जेवायला खूप वेळा हाक मारल्या नंतर ही हातातला मोबाईल ठेवून यायला मुलं कंटाळा करतात का?
 
@ अभ्यासाच्या नावाखाली सतत मोबाईल घेऊन बसतात आणि एवढे करूनही त्या दिवशीचा अभ्यास बाकीच असतो?
 
@ कोणीही बाहेर खेळायला बोलवलं तरी मोबाईल ठेवून बाहेर जात नाहीत का?
 
@ मोबाईल हातात असल्यावर आई-वडिलांच ऐकत नाहीत का?
 
@ मोबाईल घेतलेला असताना एकच काम चारदा सांगितल्यानंतरही ते काम बाकी असते का?
 
@ रात्री उशिरापर्यंत मोबाईल हाताळत असतात का?
 
@ मोबाईल हातात नसेल तेव्हा चिडचिड करतात का?
 
या प्रश्नांचे उत्तर “हो” असेल तर आत्ताच लक्ष द्या, कारण तुमच्या मुलांच्या आत्मघाताला कुणी बाहेरची व्यक्ती नाही, मोबाईल आणि इंटरनेटच व्यसनच कारणीभूत ठरेल. आत्ता जर त्यांना आवरले नाही तर याच्यापुढे टप्पे सुरू होतील. म्हणजेच सेल्फी, नको त्या अवस्थेतील फोटो, कुणीतरी चॅलेंज दिलं म्हणून आपलं धाडस दाखवण्यासाठी काढलेले कमी कपड्यातले फोटो, गाडी चालवताना केलेले स्टँट या अशा अनेक गोष्टी आपल्या मुला-मुलींच आयुष्य दावणीला बांधतील आणि आपण मात्र ‘तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं हो, पण शेवटी व्हायचं तेच झालं’ हा टिपीकल डायलॉग मारत बसू! 
 
मुलांच्या बिघडत चाललेल्या सवयी आणि यातून त्यांचं घडू पाहणाऱ भविष्य या सगळ्यांचा त्रास पालकांनाही होतो. पालकांच्या कामामध्ये त्यांचे लक्ष लागत नाही. गुणवत्तेवर परिणाम होतो. प्रसंगी काही प्रमोशन थांबतात. याचं दुःख, याची चिंता आणि त्यात मानसिक आजारांची भर या सगळ्याचा परिणाम शेवटी शारीरिक आजारांमध्ये होतो, म्हणूनच योग्य वेळी समस्येच्या मुळापर्यंत जायला हवं. आपल्या मुलांशी बोलून शक्य तितक्या शांतपणे त्यांना ‘मोबाईल ही तुमची सोय आहे हक्क नाही’ हे समजावून सांगायला हवं. 
 
टीव्ही, मोबाइल येण्याच्या आधी देखील जग अस्तित्वात होतं, तेव्हाही मुलं जन्माला येत होती आणि वाढत होती, कर्तृत्व गाजवत होती, त्यामुळेच टीव्ही मोबाईल असला काय अन नसला काय याने काहीही फरक पडत नाही. आपल्याला जर पालक म्हणून आपली जबाबदारी माहित असेल तर बालकांना त्यांच्या जबाबदारीचे भान आपण नक्कीच देऊ शकतो.
पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात आपण पारंगत नसतोच पण ते एक शास्त्र आणि कला यांचा संगम असतं. आपल्यामध्ये आणि आपल्या मुलांमध्ये दरी निर्माण होते, ती दरी अनेकदा आपण मुलांशी बोलण्यासाठी वापरत असलेली भाषा आणि आपली देहबोली यातून वाढत जाते. आपल्या बोलण्याचा सूर हा सामंजस्याचा आणि आपली देहबोली ही मुलांच्या चुका सकारात्मकतेने स्वीकारायची असेल तर मुलांना आपल्याशी बोलताना भीती वाटत नाही. मुलांना समजून घेण्यासाठी त्यांचं शांतपणे ऐकलं पाहिजे. त्यांच्या कोणत्याही अनुभवाला विचाराला फालतू म्हणून सोडून न देता ‘हा विचार ते का करत आहेत’ हे जाणून घ्यायला पाहिजे. 
 
मुलांचा आनंद कशात आहे ते शोधून त्या गोष्टी मुलांबरोबर आवर्जून करायला हव्यात. तुमचा सततचा उपदेश मुलं हळूहळू झुगारायला लागतात, केवळ उपदेश देण्याऐवजी काही गोष्टी मुलांना कृतीतून शिकवा. त्यांची क्षमता ओळखून आपल्या इच्छा, आकांक्षा त्यांच्या कानावर घाला पण त्याबाबत आग्रही राहू नका. पालक म्हणून काही गोष्टी सांगणं हे आपलं कर्तव्य आहेच पण काही गोष्टींचा अनुभव मुलांना घेऊ देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. दम दिला, रागावून बोललं की मुलं ऐकतात हा आपला गैरसमज आहे. आपण रागावून सांगितलेल्या गोष्टी मुलं मनाविरुद्ध करतात. त्यातून त्यांना अजिबात आनंद मिळत नाही.
मुलांना बऱ्या-वाईटाची जाणीव करून देताना रागावणे, दम देणे या पद्धती चुकीच्या आहेत. टीव्ही बघू नको असं न सांगता टीव्हीवर काय बघायचं, काय नाही बघायचं यावर मुलांसोबत चर्चा करा. त्यांतल्या बर्यायवाईट गोष्टींची माहिती मुलांना करून द्या. त्यांना त्यांची बाजू मांडू द्या. त्यांची जिज्ञासा, त्यांचं कुतूहल जाग होईल असे प्रश्न विचारायला मुलांना प्रवृत्त करा. नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी मुलांच्या मनात गोडी निर्माण करा आणि जेव्हा या नवीन गोष्टी करून बघण्याची इच्छा त्यांना होईल त्यावेळेला आपोआपच हातातला मोबाईल बाजूला ठेवला जाईल आणि काहीतरी नवीन गोष्टी करण्यामधला आनंद ती जागा घेईल.
डॉक्टर हाईम गीनॉट हे जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे “पालकत्व म्हणजे खरं तर घरामध्ये रोज घडणारे छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणाऱ्या घटनांवरील प्रतिसाद यांची एक न संपणारी मालिका असते. या सगळ्या प्रतिसादांचे काही ना काही परिणाम मुलांवर होत असतात. याचा परिणाम म्हणून मुलांचं बरं-वाईट अस्तित्व घडत असतं,
मुलांचे व्यक्तिमत्व घडत असतं. सर्वांनाच आपलं मूल संवेदनशील, जबाबदार आणि ध्येय प्रेरित असावं असं वाटतं. त्यासाठी फक्त प्रेम, कॉमन सेन्स आणि भान उपयोगी नाही तर चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्यांची!” हे कौशल्य आपल्या अंगी बाळगण्यासाठी प्रयत्नशील असणारे पालक आपल्या मुलांना योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात.
 
आपल्याकडे अजूनही वेळ आहे जन्मापासून सात वर्षांपर्यंत आपण मुलांना जे संस्कार देतो तेच संस्कार पुढे जाऊन त्यांचा स्वभाव बनतो. आपण जर मुलांना लहानपणापासूनच टीव्ही मोबाइल याची सवय न लावता त्यांच्याशी सुसंवाद वाढला त्यांच्या भावनिक विकासाकडे लक्ष दिलं तर ही मुलं उत्तम नागरिक बनतील. गरज आहे ती फक्त आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवून आपला मोकळा हात तितक्याच मोकळ्या मनाने मुलाच्या हातात द्यायची आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना खऱ्या अर्थानं “स्मार्ट” बनविण्याची!
 
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
 
Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

3 Comments
  1. मधुकर चांदवडे says

    खूप छान लेख आहे आजच्या परिस्थिती ला अनुसरून हा लेख जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे.

  2. Ajai says

    खूप सुंदर लेख…
    घरो घरी मातीच्या चुली….
    मुल मोबाईल मुळे खरच एक कल्ली होत आहेत.
    आणि त्यात भर म्हणून हा कोरोना, मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करतोय….
    मोबाईल हाच त्यांचा मित्र, त्यांचा भाऊ…त्याचा सखा झालाय….

    त्यात भर म्हणून हे ब्ल्यु व्हेल…पबजी…फ्री फायर…या सारखे गेम.

    प्रत्येक पालकांना खुप समज़ुन वागावं लागणार.

    धन्यवाद लेखिका व जनस्थान…
    🙏🏻

    1. Aaditi Tushar Morankar says

      तुम्ही सकारात्मकतेने हा लेख वाचलात आणि तुमचे विचार प्रतिक्रिया देऊन व्यक्त केलीत त्याबद्दल आभार अजयजी!

कॉपी करू नका.