नाचरी अक्षरे !

लेखिका :आदिती मोराणकर ;लेबलिंग ते एनेबलिंग : प्रवास आणि प्रयास -भाग ३

0

बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३८

जितकी डोकी तितकी मते ,
जितकी शिते तितकी भुतेकोणी लठ्ठ कोणी मठ्ठ ,
कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के ,
सब घोडे बारा टक्के
(साभार विंदा करंदीकर)
परमेश्वराने आपल्याला आपल्या मुलांच्या रूपात एक सुंदर दान दिले आहे. त्या बाळाकडे बघतांना आपण ‘आपलीच नजर’ वापरली पाहिजे. दुसऱ्यांच्या चष्म्यातून आपल्या मुलांचं मूल्यमापन केलं तर पालक म्हणून आपलं कधीही समाधान होणार नाही. दुर्दैवाने आपलं मूल ‘अध्ययन अक्षमता’ घेऊन आलं असेल तर आपण त्यांची तुलना वर सांगितलेल्या विंदांच्या कवितेनुसार ‘सब घोडेबारा टक्के’ अशी करता कामा नये. लहानपणी ‘टक्के टोणपे’ हा शब्द बऱ्याच वेळा कानावरून गेला होता पण काहींच्या आयुष्यात त्या शब्दाला अपार महत्त्व आहे, हे थोडं मोठं झाल्यावर समजायला लागलं. त्यांच्या मुलांचे टक्के आणि त्यावरून त्यांना मिळणाऱ्या ठेचा, त्यांना मिळणारी वागणूक ठरवली जाते हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपले पालक या पठडीतले नाहीत याचा मनोमन आनंद झाला होता. खरंतर कुठलंही मूल हे जाणीवपूर्वक अपयश निवडत नाही पण काही दुर्दैवी मुलांच्या बाबतीत आटोकाट प्रयत्न करून देखील यश हुलकावणी देऊन जातं, तेव्हा त्या मुलाला दोष न देता, त्या मुलाचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. वरवर साधारण दिसणाऱ्या या मुलांमध्ये ‘अध्ययन अक्षमता’ आहे का? हे तपासून बघायला हवं.

एप्रिलमध्ये काही प्री स्कूलचे निकाल लागले आणि सोशल मीडियावर, व्हाट्सअप स्टेटसवर त्यांच्या मुलांचे प्रगती पुस्तक झळकले. “ती स्वतःच्या हाताने खाते”,  “ती उड्या मारते”, “तिला एक वाक्य सलग बोलता येते” याचा कुठेही उल्लेख न करता “तिला इंग्लिश मध्ये अमुक ग्रेड, mathsमध्ये तमुक ग्रेड” याचं पालकांनी तोंड भरून कौतुक केलं होतं. पालकांच्या या मानसिकतेला काय म्हणावं? बालवाडी पासूनच जर पालकांचे विचार असे असतील तर मुलांच्या पदवी शिक्षणापर्यंत मुलांना काय काय सहन करायला लागणार याची कल्पनाच केलेली बरी! परवा बाजारात फिरत होते तर दोन बायका एकमेकींशी बोलत होत्या. आपल्या मुलाला मागच्या शैक्षणिक वर्षात किती ‘गोल्ड मेडल’ मिळाले हे सांगण्याची स्पर्धाच दोघींमध्ये लागली होती. मुलं तर इतकी लहान होती की त्यांना कदाचित त्यांचं नाक ही धड पुसता येत नसेल. या वयामध्ये ‘माझ्या मुलाला या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं, त्या स्पर्धेत त्याचा पहिला नंबर आला’ अशा त्या आयांच्या गप्पा ऐकून माझ्या अंगावर काटा आला. शाळांनी सुद्धा यश इतक सोप्प करून टाकलं की दर आठवड्याला ‘स्टुडन्ट ऑफ द क्लास’, दर पंधरवड्याला ‘सिन्सिअर स्टूडेंट ऑफ द क्लास’ अशा गोंडस नावाखाली प्रत्येक पालकाला खुश करायचं आणि त्यांच्या व्हाट्सअप किंवा सोशल मीडियासाठी स्टेटस खाद्य पुरवायचं हा चंगच शाळांनी बांधलेला दिसतो.

या सगळ्या प्रकारात ज्यांच्या मुलांना दर आठवड्याला, पंधरवड्याला, महिनाभरात एकही सर्टिफिकेट मिळत नाही किंवा सो कॉल्ड अचीवमेंट होत नाही, त्या मुलांना मात्र कायम शाब्दिक आणि शारीरिक माराचंच धनी व्हावं लागतं हे लक्षात घ्यायला हवं. त्या मुलांना “तुम्ही काहीच करू शकत नाहीत,

सतत इतरांच्या मागेच राहतात, तुमच्यामुळे पालकांच्या माना खाली जातात”, या प्रकारची वाक्य सतत ऐकावी लागतात. “आपल्याला कमी गुण मिळाले आहेत याचाच अर्थ आपण मठ्ठ आहोत, आपली जगण्याची लायकी नाही, आपला कोणालाच उपयोग नाही” असे नैराश्यपूर्ण विचार मुलांच्या मनात येत असतात. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या मुलांशी बोलत असताना, विशेषतः त्यांना रागवत असतांना मुलांच्या हातांचे चाळे चालू होतात, पायाची बोटं आकसून घेतात, अंगठ्याच्या नखाने जमीन कुरतडत राहतात, आपण कितीही बोललो तरी नजर वर करून आपलं मूल काहीच बोलत नाही तेव्हा समजून घ्या की तुमचं मूल मनातून भयंकर अस्वस्थ झालेल आहे. सगळ्या सुविधा पुरवून देखील कमी टक्के आणलेल्या मुलांना तर कैद्यांपेक्षाही विचित्र वागणूक मिळते; पण सगळ्या सुविधा दिल्यानंतरही आपलं मूल नक्की कुठे कमी पडत आहे ? याचा सुशिक्षित पालक जराही विचार करत नाही.

‘आपलं मूल इतर मुलांच्या तुलनेत कमी पडत आहे’ याची सुशिक्षित पालकांना लाज वाटते हेच त्या मुलाचं दुर्दैव! त्याचं वेगळेपण, त्याच्या वेगळ्या सवयी समाजापासून लपवल्या जातात, कानामागे टाकल्या जातात आणि आमचंही मूल साधारणच आहे हे दाखवण्याचा एक वेगळाच आटापिटा पालकांचा चाललेला असतो. आपल्या या लपाछपीच्या नादात मुलांची आई वडिलांशी असलेली नात्याची वीण कधीच घट्ट होत नाही. त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, जो नंतर कितीही प्रयत्न करून भरून काढता येत नाही. जसं मी मागच्या एका लेखात म्हटले होते की तुम्हाला जसं मुल मिळाल आहे, त्याला तसंच स्वीकारा आणि पुढे त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा. तर मी असं म्हणत होते की, जरा निरीक्षण केलं तर आपल्या मुलाची अध्ययन अक्षमता नक्की कुठल्या प्रकारची आहे? हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आज यातीलच एका प्रकारा वर थोडं बोलते आहे. “वाचन दोष अक्षमता अर्थात डिस्लेक्सिया!”

इथे तुम्हाला ‘तारे जमीन पर’च्या ईशान अवस्थीची केस लक्षात घ्यावी लागेल. त्याला डोळ्यासमोर आणलं की तुम्हाला डिस्लेक्सिया म्हणजे काय? याची पूर्ण कल्पना येईल. डिस्लेक्सिया असणारी मुले योग्य गतीने व अचूक बोलू शकत नाहीत. वाचन करत असताना ते अनेकदा अडखळतात. काही विशिष्ट अक्षरे त्यांना त्रास देतात आणि शब्दांची ओळखच नसल्याने वाचन दोष (डिस्लेक्सिया) असणारी मुले थोडी उशिरानेच बोलतात. खरंतर मूल शाळेत गेल्यानंतरच त्याला वाचन दोष आहे हे लक्षात येते आणि त्यावर उपाययोजना करण्याची गरज भासते. शाळेत जेव्हा शिकवायला सुरुवात होते तेव्हा या मुलांची अक्षरे आणि उच्चार, शिकण्याची गती कमी असते. शब्दांमधले ध्वनी ते वेगवेगळे करू शकत नाहीत आणि म्हणूनच शब्द समजताना, आकलन करताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात. एखादा शब्द ‘समूह’ म्हणून वाचायचा असेल तरीही तो प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र वाचन करतो. कित्येकदा पहिलं अक्षर दुर्लक्षित करून दुसर अक्षर वाचणे, शब्दात बदल करून वाचणे, विशेषतः इंग्रजी शब्द वाचताना पहिलं अक्षर तिसऱ्या ठिकाणी आणि तिसरं अक्षर पहिल्या ठिकाणी टाकून वाचन केले जाते उदाहरणार्थ bat च्या ऐवजी tab, tip च्या ऐवजी pit, kit च्या ऐवजी tik वगैरे. वाचन दोष असणाऱ्या मुलांना सारख्या दिसणाऱ्या अक्षरांचे वाचन करतानाही अडचण येते जसं च आणि ज , य आणि थ, र आणि स, m आणि w, u आणि n, p आणि q! आपल्या मुलांमध्ये वाचन दोष आहे हे तुमच्या लक्षात आल्यानंतर घाबरून जाऊ नका आणि त्याबद्दल मुलाला दोषही देऊ नका. उलट आता नक्की कमतरता काय आहे हे लक्षात आल्याने त्यावर उपाययोजना सुरू करा.

वाचन दोष अर्थात डिस्लेक्सिया वर मात करणाऱ्या काही व्यक्तींची नावे जर तुम्हाला सांगितली तर आपलंही मुल आयुष्यात, करिअरमध्ये खूप पुढे जाणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. विश्वविख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन, भारतीय बॉक्सर मोहम्मद अली, बॉलीवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन, ह्रितिक रोशन यांना डिस्लेक्सिया होता. ‘शार्क टॅंक सेलिब्रिटी गुंतवणूकदार’ बार्बरा कॉर्पोरं या देखील डिस्लेक्सियामुळे शालेय आयुष्यात फार उत्तम कामगिरी करू शकत नव्हत्या. ‘आपल्याला डिस्लेक्सिया आहे’ हे त्यांच्या तेव्हा लक्षातही आले नव्हते. त्यांच्या मुलाला जेव्हा तसाच प्रॉब्लेम शालेय शिक्षणात आला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांनाही डिस्लेक्सियाच होता. सुप्रसिद्ध लेखिका अगाथा ख्रिस्ती यांना डिस्लेक्सिया होता, मात्र त्यांच्या गुप्तहेर कथा अजरामर ठरल्या आहेत, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बेला थॉर्न, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग्लस मेरील,सुप्रसिद्ध रेडिओलॉजी तज्ञ बेरील बेनासेरेफ, प्रख्यात शेफ ओमारी मॅक्वीन या सगळ्यांनी डिस्लेक्सियाचा सामना केला आहे, मात्र ती उणीव आपल्यातल्या इतर गुणांनी भरून काढली आहे. हो, गुणच! मुलांना वाचन दोष अर्थात डिस्लेक्सिया आहे म्हणून त्यांच्यात इतर कुठलेच गुण नाहीत असा विचार करून चालणार नाही.

डिस्लेक्सिया असणाऱ्या मुलांमध्ये इतर अनेक क्षमता असतात. ज्यांना वाचता येत नाही अशी मुले गोष्टी “ऐकून” लक्षात ठेवतात ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अतिशय उत्तम काम करते. एखादा मुलगा पुस्तकात वाचून गोष्ट सांगत असेल, तर डिस्लेक्सिया असणारा मुलगा केवळ आपल्या स्मरणशक्तीने ती गोष्ट तशीच्या तशी सांगू शकतो. शब्द वाचायला अडचण असणारी ही मुलं कोडी सोडवण्यात मात्र तरबेज असतात. यांच्यासाठी जिगसॉ पझल्स, चित्रकोडी हे उत्तम पर्याय असतात.

शब्दांच्या किंवा शब्दरचनेच्या बाबतीत गडबड करणारी ही मुलं, चित्रांच्या बाबतीत मात्र हुशार असतात. बघून गोष्टी स्मरणात ठेवणे यांना उत्तम प्रकारे जमते म्हणूनच इंजीनियरिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात या मुलांचे करिअर चांगले होऊ शकते.

पुस्तक वाचण्यामध्ये अडथळे येणाऱ्या या मुलांना समोरच्या व्यक्तीशी संभाषण करताना समोरच्या व्यक्तीला वाचण्याची सवय असते म्हणूनच ते एक उत्तम “कानसेन” असतात. समोरच्याचे म्हणणे ऐकून त्यावर कधीतरी ते उपाय देखील सांगू शकतात.

शालेय शिक्षणात स्वतःच खूप अडचणींचा सामना केल्यामुळे यांना इतरांबद्दल एक सहानुभूती असते, जे त्यांच्या स्वभावाचं एक गुणवैशिष्ट्यंच म्हटलं पाहिजे.लिखित शब्दांमध्ये अडकत नसल्याने शब्दांच्या पलीकडची सृजनात्मकता या मुलांमध्ये असते. यांचे विचार चारचौघांपेक्षा वेगळे असतात. स्वतः अनेक अडचणींना तोंड देत असल्यामुळे ‘क्रिटिकल थिंकिंग’ उत्तम असते. इतके सगळे गुण घेऊन जन्माला आलेलं हे मूल फक्त त्याला डिस्लेक्सिया आहे म्हणून मागे पडलं तर ते दुर्दैवीच!

या लेखात मी तुम्हाला वाचन दोष अर्थात डिस्लेक्सिया ओळख करून दिली. त्याचबरोबर त्या मुलांमधल्या क्षमतांची देखील माहिती दिली. आता पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला कुठेही कमी न लेखता एक चांगली दिशा द्याल या खात्रीसह लेखाला विराम देते.पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद!

(विशेष सूचना : या लेखात मी जे काही लिहिलं आहे ते वाचून लगेचच आपल्या मुलांना ही डिस्लेक्सिया आहे अशी फुटपट्टी लावू नका , पुरेसे निरीक्षण करा आणि मगच निष्कर्षावर या !) 

आदिती मोराणकर (स्पेशल एज्युकेटर व शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन व डे केअर सेंटर.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.