Child Psychology
बालपणाला शिस्तीच्या बेडीत अडकवणार का?
गेल्या रविवारी मुंबईमध्ये एका कॉन्व्हेंट शाळेजवळ टॅक्सी थांबवली. पण उतरण्यासाठी जागाच मिळेना. गेटसमोर पालकांची गर्दी, मुलांची लगबग, आणि या सगळ्यात एक प्रश्न मनात घर करून गेला — रविवारीसुद्धा ही मुलं शाळेत काय करत आहेत?
टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, “शाळेने जी.आर. काढला आहे. रविवारी खेळ अनिवार्य केलंय!”
माझं विचारांचं मीटर जोरात धावू लागलं. सोमवार ते शनिवार अभ्यासाचा ताण, आणि रविवारी खेळाचा ‘बॅकलॉग’! हे खरंच विकास आहे का? की भावनिक दुर्लक्षाचं दुसरं रूप?
श्रावणातल्या रंगपंचमीपासून दूर असलेली मुलं…(Child Psychology)
श्रावण महिना आला की हिरवाई, उत्सव, मंगलाचरण यांची लयलूट सुरू होते. पण आपल्या घरातील शालेय मुलांना या सणांचा गंधसुद्धा लागत नाही. आई मंगळागौरला, आजी पोथी वाचायला, बाबा उपासाला – पण मुलं? शाळा, क्लास, ट्युशन, आणि वर छंद वर्ग.
आपण ‘पालकत्वाचं व्रत’ घेतलं आहे, पण त्या व्रताची जबाबदारी मात्र पूर्णपणे मुलांवर टाकली जाते. प्रत्येकाला श्रावण बाळ, शिवाजी महाराज, झाशीची राणी हवी, पण ती मुलं घडवताना पालकांची तितकीच बांधिलकी हवी ना?
“आम्ही सगळं देतो…” या वाक्याचा पुनर्विचार
“आम्ही त्यांना सगळं देतो, आता त्यांनी शिकावं” हे वाक्य पालक सहजपणे वापरतात. पण समजा, एखाद्या अनोळखी गावात तुम्हाला सर्व सोयीसुविधांसह नेऊन ठेवलं, आणि “इथे तुला हवं ते कर” असं सांगितलं, तर तुम्ही किती रमणार?
मुलांच्याही बाबतीत तेच होतं. अभ्यासाच्या नावाखाली त्यांना धावतं ठेवलं जातं. पण हे ‘त्यांचं’ स्वप्न आहे की ‘आपलं’ – हे आधी तपासा.
रोजचा प्रश्न — “शाळेत काय केलं?”(Child Psychology)
मुलं शाळेतून घरी आली की पालकांचा ठरलेला प्रश्न — “आज शाळेत काय केलं?”
पण रोज रोज हा प्रश्न विचारला तर मुलं त्याचं उत्तर देणं टाळतात.
विचार करा, तुम्ही ऑफिसहून घरी आलात आणि तुमची मावशी दररोज “काय केलं ऑफिसमध्ये?” विचारू लागली, तर सुरुवातीला उत्तर द्याल, पण काही दिवसांनी कंटाळा येईल की नाही?
मुलांचंही तसंच होतं.
पालकांनी संवादाचा मार्ग बदलावा
शाळेतल्या पालक-शिक्षक मिटिंगमध्ये हमखास एक तक्रार ऐकू येते — “माझं बाळ शाळेचं काही सांगत नाही.”
पालकांच्या पिढ्या बदलल्या, पण तक्रारींचा साचा मात्र तसाच आहे.
ही तक्रार मुलांची नाही, तर संवाद पद्धतीची आहे. मुलांशी संवाद साधताना त्यांचं मन समजून घेणं महत्त्वाचं. त्यांच्या शब्दांत, त्यांच्या भाषेत, त्यांच्या गोंधळात उतरून तुम्हाला संवाद साधावा लागेल.
दोष पद्धतीचा – आई किंवा बाबांचा नव्हे
मुलगा अभ्यासात मागे पडतो, घरात चिडचिड करतो, संवाद टाळतो, तेव्हा बोट एकमेकांकडे जातं –
“तुझ्या लाडाने बिघडलाय!”
“तुमचं लक्ष नाही म्हणून झालं असं!”
पण खरंतर दोष कुणाचाही नाही. चुकतेय ती पद्धत. आपण त्यांच्या गरजा, त्यांच्या आवडी स्वतः ठरवतोय आणि मग मुलं त्यावर आनंदी प्रतिक्रिया देत नाहीत म्हणून रागवतोय. हे कुठे योग्य आहे?
‘खेळ’ सुद्धा ठरवलेला?
रविवारी सक्तीचं मैदानात यायचं – म्हणजे ‘खेळ’ सुद्धा आज्ञाधारकपणे पार पाडायचं?
खेळ म्हणजे मोकळा श्वास. तो जर शिस्तीच्या चौकटीत अडकवला, तर बालपण कुठे उरतं?
एक हृदयद्रावक घटना
अलीकडेच एका १९ वर्षीय मुलीची बातमी डोळ्यात पाणी आणणारी होती. “मला डान्स क्लास का लावला नाही?” हे तिचं शेवटचं वाक्य होतं.
हे सांगतांना मन सुन्न होतं. तिच्या पालकांना ती संधी देणं शक्य होतं, पण ती वेळ निघून गेली. पालकांनी वेळोवेळी अनेक गोष्टी दिल्या असतील, पण तिचं ‘मन’ समजून घेणं राहून गेलं.
१९ वय म्हणजे जगण्याचं वय आहे, संपवण्याचं नव्हे.
पालकहो, वेळ आहे सावध होण्याची
मुलांना फक्त पोटभरणं, शिक्षण, कपडे, फोन पुरवणं हेच पुरेसं नाही. त्यांचं मन, भावना, इच्छा, दबलेली स्वप्न, आणि त्यांची ओळख – या सगळ्यांचा विचार हवा.
आजची मुलं बोलत नाहीत, कारण त्यांना ऐकणारे कुणीच नाही.
तुमचं प्रेम, तुमचं लक्ष, आणि तुमची जागरूकता हीच त्यांच्यासाठी खरी सुरक्षा आहे.
शेवटी…
बालपण म्हणजे आनंद, प्रयोग, स्वप्नं आणि चुका करण्याची मुभा.
मुलांना आपलं म्हणणं बोलायला द्या. त्यांच्या वाटचालीचा रस्ता तुम्ही तयार करू शकता, पण चालायचं त्यांना आहे – त्यांच्या गतीनं, त्यांच्या तालात.
पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी, आणखी एका विचारप्रवृत्त करणाऱ्या विषयासह.
#पॅरेंटिंगफंडेऑनसंडे
डॉ. आदिती तुषार मोराणकर
चाइल्ड सायकोलॉजिस्ट | स्पेशल एज्युकेटर, नाशिक
📞 83299 32017 / 93265 36524
