नाशिक ,दि, ९ एप्रिल २०२५ – मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला, मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कित्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.
१६ फेब्रुवारी १९८० साली कोकण सुपुत्र मच्छिंद्र कांबळी यांनी “वस्त्रहरण” या नाटकाचा पहिला प्रयोग केला. आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडला. ‘ १००% देशी फार्स ‘ या शब्दात ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी ‘ वस्त्रहरण ‘ चे कौतुक केले. “वस्त्रहरण” ची आता ५५५५ व्या प्रयोगाकडे घोडदौड सुरू आहे.
हाच वारसा पुढे चालवत स्व. मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र प्रसाद कांबळी यांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी भद्रकालीची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती “संगीत देवबाभळी” ची निर्मिती केली. दिग्गजांनी गौरविलेले, समीक्षकांनी वाखाणलेले, आणि सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘ संगीत देवबाभळी ‘ ने मराठी रंगभूमीवर अढळ स्थान निर्माण करून हे माईलस्टोन नाटक ठरले.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी तर ‘ १००% मराठी मातीतलं नाटक’ या शब्दात गौरव केला. फोर्ब्स इंडिया या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतलेल्या या नाटकाचा आता ५५० प्रयोग रविवार १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे संपन्न होत आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, संगीतकार आनंद ओक, प्रकाशयोजनाकार प्रफुल्ल दीक्षित, (आवली) शुभांगी सदावर्ते या नाशिकच्या रंगकर्मींनी या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. तसेच नेपथ्य व दृश्य संकल्पना प्रदीप मुळ्ये आणि (लखुबाई) मानसी जोशी यांनी साकारली असून सोबत ‘भद्रकाली ‘ ची यशस्वी टीम आहे. नाशिक येथील प्रयोग फ्रेंड्स सर्कल चे जयप्रकाश जातेगांवकर यांच्या सहकार्यातून होत आहे.