आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
पिढीजात सोन्याचे दागिने परंपरेने पुढच्या पिढीकडे जातात पण पुढची पिढी ते जुन्या डिझाइनचे दागिने न वापरता त्याच सोन्यातुन नवीन दागिने घडवून नव्या डिझाइनचे दागिने वापरते. ही मुभा आपल्याला शिक्षणामध्ये नाही ! आपली आजी शिकली तेच आपली आई शिकली, तेच आपली मोठी बहीण शिकली आणि आता तेच आपणही शिकतो ! हे “जुन्या डिझाइनचं” शिक्षण आपल्याला कसं चालतं ?
आराध्या तीन वर्षाची झाली म्हणून तिच्यासाठी शाळा शोधण्याची लगबग चालली होती. वडिलांचं म्हणणं होतं कि तीला इंग्लिश मीडियम मध्ये टाकावं तर आईला वाटत होतं सेमी मिडीयम मध्ये टाकलं तर जरा बरं होईल, आजी-आजोबांचा वेगळा सुर होता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठी मीडियमला टाकलेलं जास्त योग्य असेल. माझ्याकडे आल्यानंतर या विषयावर आमची बरीच चर्चा झाली आणि त्या चर्चेतून काही गोष्टी माझ्याही लक्षात आल्या म्हणूनच आजचा हा लेखन-प्रपंच!
तसं बघायला गेलं तर तुमच्या मुलांची प्रवेश प्रक्रिया एव्हाना पूर्ण झालेली असेल. हा लेख लिहायला कदाचित ही योग्य वेळ नसेल पण एकंदरीतच मला भेटलेले आणि भेटत असलेले पालक यांच्या बोलण्यातून ज्या काही गोष्टी मला जाणवल्या त्या या लेखातून मांडते आहे.
खरंच आज काल शिक्षणाच्या वाटा निवडणं खूप अवघड होत चाललंय. पूर्वी आपल्याला शाळेत जायचं असेल तेव्हा एसएससी पॅटर्नच्या इंग्रजी किंवा मराठी या दोन पर्यायांमधून निवड करावी लागायची. त्यातही मराठी मिडीयमला जास्त पसंती मिळायची. आता मात्र शाळा शोधतांना सगळ्यात पहिले “पॅटर्न” ठरवला जातो मग त्या पॅटर्नची कुठली शाळा आपल्या घराजवळ आहे ते शोधलं जातं आणि एडमिशनसाठी फॉर्म मिळाला की धन्य वाटतं. नुसता फॉर्म भरून चालत नाही त्यापाठोपाठ ऍडमिशन इंटरव्यूचं दिव्य पार पाडावं लागतं. ऍडमिशन इंटरव्यूसाठी मुलांना तासन् तास मोबाईलवरच एबीसीडी, वन टू टेन, नर्सरी राइम्सचे धडे गिरवले जातात.(तेव्हा आपल्याला स्क्रीन टाईम ची चिंता अजिबात वाटत नाही) एकदाची ऍडमिशन झाली की मुलांची शाळा सुरु होते आणि मग खरी कसरत सुरू होते ती आई-वडिलांची!
शाळेचे दोन-तीन महिने झाले की आई-वडिलांचा स्वर बदलायला लागतो. शाळेतून सांगितल्या जाणाऱ्या ॲक्टिविटी, त्यासाठी होणारी धावपळ, त्याच्यामागे खर्च होणारा वेळ आणि पैसा या सगळ्याचं गणित जेव्हा चुकायला लागतं तेव्हा “आमच्या वेळी असं नव्हतं बाबा काही” ह्या एका वाक्यामध्ये पालक त्यांचा शाळा निवडताना घेतलेला आणि हमखास चुकलेला निर्णय गुंडाळायला बघतात.
शेजारच्यांनी, नातेवाईकांनी किंवा बिल्डींग मधल्या मुलांनी CBSE किंवा ICSE ला ऍडमिशन घेतली म्हणून आमच्या आराध्याला सुद्धा आम्ही त्याच पॅटर्नला टाकणार हा अट्टाहास दोन-तीन महिन्यातच तिच्या पालकांच्या अंगाशी यायला लागला. आपले विचार, आपल्या कुटुंबातील नितीमुल्य, आपल्या घरातील संस्कार यांची जेव्हा शिक्षणाशी सांगड बसत नाही तेव्हा आपण परत दुसरी शाळा शोधायला सुरुवात करतो. हा शोध थांबणार कधी? मला विचाराल तर कधीच नाही ! कारण आपल्याला नेमकं काय हवंय? हे पालक म्हणून आपल्यालाच माहीत नसतं. आपण कायम आपल्या आजूबाजूचे पालक काय करतायेत ते बघून आपल्याला काय करायचं ठरवतो आणि म्हणूनच आजूबाजूचे पालक बदलले तर आपल्या विचारांची दिशा सुद्धा बदलते.
माझ्या ओळखीत एक कुटुंब आहे. दोन गोंडस मुली असलेलं चौकोनी कुटुंब ! त्यातली मोठी मुलगी सीबीएससी पॅटर्न च्या शाळेत आहे आणि धाकटी ‘होम स्कूलिंग’ करते आहे. सहाजिकच नातेवाईकांपासून सगळ्यांनाच “दोन्ही मुलींना सारखंच शिक्षण द्यायला हवं होतं, यांनी असं का केले असेल ?” हा प्रश्न पडला. अनेकांनी स्पष्टपणे किंवा आडून आडून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या लोकांना त्यांनी दिलेलं उत्तर मला अगदी समर्पक वाटतं. जरी त्या दोघी त्यांच्याच मुली असल्या तरी त्या दोघींच्या व्यक्तीमत्वात, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेमध्ये फरक आहे. मग दोघींना सारखंच शिक्षण देऊन कसं चालेल ? धाकट्या मुलीला जर घडवायचं असेल तर मुक्तपणे खेळू देणाऱ्या शैक्षणिक संकल्पनेची गरज होती कारण तिचा पिंड खेळता-खेळता शिक्षण घेण्याचा होता.
अशा वेळेला सरधोपट पद्धतीने तिला कुठल्यातरी शाळेत टाकायचं आणि इतर मुलांपेक्षा ती मागे पडली म्हणून कायम चिंता करायची यापेक्षा ‘होम स्कूलिंग’ करून तिला हसत खेळत शिक्षण कसं देता येईल याचा विचार झाला आणि पूर्ण विचारांती त्या मुलीला ‘होम स्कूलिंग’ करु देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीची काही वर्ष ती मुलगी शाळेत जात होती पण होम स्कूलिंग सुरू केल्यापासून तिची झालेली प्रगती अतिशय उत्तम आहे आणि हीच त्यांचा निर्णय योग्य असल्याची पोचपावती आहे. आपल्यापैकी किती पालक असा निर्णय घ्यायला धजावतात ? चौकट मोडून चौकटीबाहेरचं शिक्षण द्यायला किती पालक तयार असतात? अगदी बोटावर मोजण्याइतके पालक हिम्मत करतात आणि बाकीचे शिक्षणासाठी सतत वेगवेगळी शाळा शोधत असतात.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये तीन वर्ग येतात. बालक, पालक आणि संस्थाचालक ! कुठे शाळा छान आहे म्हणून बालक खुश असतात, फी कमी आहे म्हणून पालकही खूष असतात पण इतक्या कमी फीमध्ये शिक्षण देणं परवडत नाही म्हणून संस्थाचालक नाखूष असतात, तर कुठे मोठी शाळा म्हणून बालक खुश असतात, भक्कम फी आकारून संस्थाचालक खुश असतात पण जास्त फी परवडत नाही म्हणून पालक नाखूष असतात, कुठे भक्कम फी आकारून संस्थाचालक खूश असतात, एवढी फी भरण्याची तयारी असल्याने पालकही खूष असतात पण शिक्षणाच्या ओझ्याने तिथले बालक नाखूष असतात! या सगळ्या पसाऱ्यात खरंच चांगलं शिक्षण, योग्य शुल्क भरून, उत्तम संस्थेमध्ये कसं मिळेल हा एक शोधाचा विषय आहे.
आपण मुलांसाठी शाळा निवडतांना नक्की काय बघतो? केवळ आजूबाजूची मुलं किंवा नातेवाईकांची मुलं अमुक एका पॅटर्न मध्ये शिकत आहे म्हणून आपणही त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो का? आपल्या मित्रांची मुलं स्टेटस सिम्बॉल म्हणून अमुक एका मोठ्या ब्रँडच्या शाळेत जात आहेत म्हणून आपणही आपली मुलं तिथेच पाठवायचा अट्टाहास करतो आहे का? चकचकित भिंती असलेली काचेची शाळा, वातानुकूलित वर्ग हे खरंच तुमच्या मुलाला शाळेतून बाहेर पडल्या नंतरच्या आयुष्यासाठी तयार करत असतात का ? मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्या इमारतीच्या बांधणीचा खर्च, त्या वातानुकुलित वातावरण साठी लागणारे विजेचे बिल याचे पैसे तुमच्या वार्षिक फी मध्ये आकारले जातात, ते तुम्ही प्रामाणिकपणे भरता पण दहावी नंतर तुमची मुलं फक्त त्या वर्गात शिकवलेले ज्ञान घेऊन बाहेर पडतात, तिथल्या हवेतला गारवा किंवा चकाकणाऱ्या वर्गांची चमक घेऊन ते बाहेर पडत नसतात! मग जर शिक्षणच घ्यायचं तर ते मूल नक्की कुठे चांगलं शिकेल याचा कुटुंबाने पूर्ण विचार करायला हवा.
आजही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस, आय.पी.एस या परीक्षांमध्ये खेडे गावातली मुलं-मुली उत्तम यश मिळवतांना दिसतात, कित्येकदा वर्तमानपत्रात “ऊसतोड कामगाराची मुलगी आयपीएस” झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. या मुलांना कुठे मिळतं चकचकित भिंतींमध्ये शिक्षण? उघड्यावरच्या शाळेतून यांना मिळालेलं ज्ञानच त्यांना जगात टिकण्यासाठी बळ देतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी कुठल्या शाळेत शिक्षण घेतलं याचा जरा तपास केला तर तुमच्या लक्षात येईल की माळरानावर गुरं चारतांना हाताशी मिळेल ते पुस्तक वाचून अब्राहम लिंकन यांनी स्वतःचे शिक्षण स्वतः केलं होतं. “माझ्या वाचनात न आलेले पुस्तक देणारा माणूस माझा खरा मित्र आहे कारण त्यांनी दिलेल्या पुस्तकातून मला आत्तापर्यंत माहिती नसलेले ज्ञान मिळतं”, असं म्हणणारे अब्राहम लिंकन तुम्हाला सगळ्यांना ऐकून तरी माहिती असतीलच. एखादा मुलगा शाळेत न जाता अमेरिकेसारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होतो. त्यांचे शिक्षण त्यांनी कुठल्या ब्रॅण्डेड शाळेतून घेतलं ?
खरंतर शिक्षणासाठी वर्गांची, पुस्तकांची किंवा मोठमोठ्या शाळांची गरज असते असं मला वाटत नाही. शिक्षण हे आपल्या आजूबाजूला सगळीकडेच असतं आणि ते जेवढ मोकळं, जेवढं सहज साध्य असतं ते तितक्या सहजतेने मुलांनी घ्यायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे. शिक्षण जेव्हा तुम्ही एखाद्या पुस्तकात बंद करता तेव्हा ते पुस्तक उघडल्याशिवाय मुलांचे शिक्षण चालू होत नाही, ते शिक्षण जेव्हा तुम्ही एखाद्या वर्गात बंद करता तेव्हा त्या वर्गात जाऊन बसेपर्यंत त्यांच्या शिक्षण चालू होत नाही पण हेच शिक्षण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये जेव्हा ते घ्यायला लागतात तेव्हा त्यांचा एक मिनिट काय एक सेकंदही शिकल्यावाचून राहत नाही. मग आपल्या मुलांना आपण वर्गात पाठवून शिक्षण द्यायचं का त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमधून त्यांनी सहज शिक्षण घ्यायचं याचा योग्य निर्णय पालक म्हणून तुम्ही घ्या.अहो, पिढीजात सोन्याचे दागिने परंपरेने पुढच्या पिढीकडे जातात पण पुढची पिढी ते जुन्या डिझाइनचे दागिने न वापरता त्याच सोन्यातून नवीन दागिने घडवून नव्या डिझाइनचे दागिने वापरते. जर सोन्याची किंमत माहिती असूनही ते सोनं आपण मोडायला लावतो, त्यातून नवीन दागिने घडवून आपण ते वापरतो , मग आपली आजी शिकली तेच आपली आई शिकली, तेच आपली मोठी बहीण शिकली आणि आता तेच आपणही शिकतो हे “जुन्या डिझाइनच” शिक्षण आपल्याला कसं चालतं? त्या शिक्षणामध्ये काही बदल व्हावेत, आपण ते बदल करून आपल्या मुलांना शिकवावे असे आपल्याला वाटत नाही का ?
मी या लेखात होम स्कूलिंगबद्दल बोलले. कित्येकदा पालक म्हणून आपण आपली जबाबदारी नाकारतो आणि म्हणून आपण होम स्कूलिंग हा पर्याय आपल्या मुलांसाठी स्वीकारत नाही, आपण आपल्या मुलांना होम स्कूलिंगचा पर्याय दिला तर आपल्याला आपला व्यवसाय, आपली नोकरी सोडून मुलांच्या मागे लक्ष द्यावे लागेल, मुलांसाठी वेळ द्यावा लागेल, हे करण्याची आपली तयारी नसते. शाळेची वर्षभराची फी भरली की शाळावाल्यांनी आता यांचं शिक्षण करून घ्यावं, यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा असा आपण आग्रह धरतो, पन्नास मुलांचा अभ्यास करून घेताना थोडासा अभ्यासक्रम बाकी राहिला तर आपण आक्षेप घेतो पण तेच जेव्हा पालक म्हणून आपल्याला करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याकडनं एक मुल सांभाळलं जात नाही ? जसे तुम्ही पालक असतांना एक माणूस असतात तसेच ते शिक्षकही शिक्षक असले तरी माणूसच आहेत ना? तुम्हाला तुमच्या एका मुलाचं करून घेता येत नाही तिथे ते 50 मुलांचं करून घेत असतांना आपण त्यांना शाबासकी द्यायला हवी !
शिक्षण व्यवस्था, शिक्षक यावर बोट ठेवणं, त्यातल्या त्रुटी, कमतरता दाखवून देणं हे अगदी सोप्पं आहे .
आपल्या मुलांना वेळ देऊन त्यांना घडवणं ही आपली जबाबदारी स्वीकारायला आपण अजूनही कचरतो. ही जबाबदारी जर आपण योग्य पद्धतीने स्वीकारली तर काय चमत्कार होऊ शकतात हे मी स्वतः अनुभवलं आहे.
माझ्या ओळखीत असलेला एक चार वर्षाचा मुलगा एका नामांकित शाळेत जातो. त्याची आई मला आजही त्याचे अनेक व्हिडिओ पाठवत असते. तो चार वर्षाचा मुलगा काय नाही करत ? तो संस्कृतमध्ये पक्षांची नावं सांगतो, संस्कृतमध्ये फळांची नावं सांगतो, विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करून त्याचे यूट्यूब व्हिडिओज बनवतो. हे त्याला त्याच्या शाळेतून शिकवलं नाही. ही त्याच्या पालकांची मेहनत आहे. आपल्या मुलाची योग्यता ओळखून, आपलं मूल काय काय करू शकतो हे अगदी समजून घेऊन त्याची आई त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेते. संस्कृतचे नवीन शब्द शिकण्याची क्षमता त्या मुलाची आहे. आज तो मुलगा मराठी वर्तमानपत्र वाचतो, इंग्लिश टायपिंग करतो, या सगळ्यामध्ये कोरोनामुळे ऑनलाइन चालू असलेल्या शाळेचं काहीही योगदान नाही. ही फक्त आणि फक्त त्यांच्या पालकांची मेहनत आहे. मी कायम त्या पालकांना शाब्बासकी देते. त्यांनी काहीही नवीन केलं की त्यांचं कौतुक करते कारण ते पालक फक्त शाळेतून मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून नाहीत, त्या पलीकडे जाऊन ते त्यांच्या मुलाला काहीतरी नवीन शिकवीत आहेत.
शिक्षण पद्धतीवर ते सुद्धा खुश नाहीत पण त्या शिक्षण पद्धती व्यतिरिक्त आपण आपल्या घरामध्ये, आपल्या मुलाला जो वेळ देतो, त्याच्यामध्ये आपण आपल्या मुलाला नवीन काय शिकवू शकतो याचा ते पालक सातत्याने विचार करतात आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कृतीचा परिणाम आज त्यांच्या मुलावर दिसतोय. सगळीकडे तो मुलगा नाव काढतोय. जेव्हा जेव्हा त्या मुलाचं कौतुक होतं त्या वेळेला त्याच्या पालकांची पाठ आपोआपच थोपटली जाते, कारण मूल आपोआप घडत नसतं ते घडवावं लागतं.
तुम्ही एखादं रोप लावलं, ते लागल्यानंतर त्याच्या फांद्या छाटून त्याला आकार देण्याचं , त्याला योग्य वेळी खतपाणी घालण्याचं काम हे तुमचं असतं . ते तुम्ही व्यवस्थित केलं तरच ते झाड आकार घेऊन त्याची सावली, फळं दुसऱ्यांना देऊन आनंद देतं. तसंच आपल्या मुलांचं रुजणं, त्यांच शिकणं, त्यांच्या आयुष्याला आकार देणं हे पालक म्हणून पहिले आपलं कर्तव्य आहे. ते ओळखून आजच पालकत्वाची आपली जबाबदारी स्वीकारा नाहीतर तुम्ही जेव्हा जेव्हा मुलांना घडविण्यासाठी या सगळ्या गोष्टी बाहेर शोधायला जाल त्या त्या वेळेला माझ्याकडून तुमच्यासाठी एकच प्रतिक्रिया आहे, ती म्हणजे *”ढूंडते रह जाओगे !”
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524