तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे – उद्धव ठाकरे

0

रत्नागिरी तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे.अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणच्या व्यापाऱ्यांना त्यांची भेट घेऊन धीर दिला.मुख्यमंत्री आज चिपळूण येथील पूर परिस्थीची पाहणी करण्यासाठीआले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली.

राज्यातील पूर परिस्थीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी निर्णय जाहीर करणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.ते पुढे म्हणाले उद्या मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडे-लत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी मंत्री रविंद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.