नाशिकमध्ये अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोनद्वारे होणार पंचनामे
नाशिक-सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करतांना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नरेंद्र दराडे, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पंचनामे हे बिनचूक करण्यात येवून केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यासाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
सुक्ष्म व तांत्रिक बाबींसह करावेत पंचनामे : कृषीमंत्री दादाजी भुसे
कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, पिक विम्याचा लाभ हा ई-पीक पाहणीच्या अहवालावर अवलंबुन असल्याने यासारख्या सुक्ष्म तांत्रिक बाबींचा विचार करून पंचनामे करण्यात यावेत, जेणे करून एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच पिकविमा कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांची तालुकानिहाय यादी सर्व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येवून पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच एसडीआरएफ च्या धर्तीवर पंचनामे पूर्ण शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात यावे, असेही कृषि मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
पावसाअभावी नुकसान झालेल्या क्षेत्राचाही विचार करावा : नरहरी झिरवाळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, जिल्ह्यातील ज्या भागात पावसाअभावी पिकांची हानी झाली आहे. त्या क्षेत्राचे देखील पंचनामे करण्यात यावेत. जेणे करून तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल, असेही विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्ह्याला एकूण 28 कोटी 69 लक्ष अनुदान प्राप्त : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्ह्यात 2020-21 या वर्षात तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जून 2021 मध्ये शेतीपिके, घरे, मनुष्यहानी अशा विविध बाबींसाठी जिल्ह्याला एकूण 28 कोटी 69 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील 400 गावे बाधित झाले असून या सर्व बाबी क्षेत्राचे पंचनामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याकरता क्षेत्रीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करतील असे श्री मांढरे यांनी सांगितले. याचप्रमाणे 7 व 8 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून त्याबाबतचा अंतिम अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या भागातील दुधाळ जनावरांमधील लम्पी स्कीन डिसीज या रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सहाय्याने जनावरांसाठी लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील पंचनाम्यांच्या सद्यस्थितीत बाबत बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भगवत डोईफोडे यांनी सादरीकरण केले. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित आमदार नरेंद्र दराडे, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सुहास कांदे, सरोज अहिरे यांनी सहभाग घेतला.