शेतातील उत्पन्न वाढण्यासाठी सद्यस्थितीत बहुतेक शेतकरी, कीड व रोग नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत आहे. परिणामी कीड व रोग नाशकांचा बेसुमार वापरामुळे अनेक दुष्परिणाम होतात. रस शोषणाऱ्या किडींचे प्रमाण अचानक वाढणे निसर्गातील मित्र व उपयोगी कीटकांचे प्रमाण कमी होणे मित्र पक्षी, प्राणी यांची हानी होणे या बरोबरच माणसाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे.असे अनेक निष्कर्षातून सिद्ध झाले आहेत.
कीडनाशक वापरलेला भाजीपाला निर्यातीसाठी स्वीकारला जात नाही. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय कीड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.पिकांवर कीडनाशकांचा वापर करण्यासाठी नैसर्गिक व सहज उपलब्ध होणारा लिंबाचा पाला, निरगुडी, सिताफळ, पपई पाला, तसेच मिरची, लसूण, तंबाखू अशा अनेक वनस्पतींचा वापर कीड नियंत्रणासाठी केला तर खर्च कमी होतो आणि आरोग्यही सदृढ होते.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत कष्टाने तयार केलेला शेतीमाल कुठेही विकता यावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी कमी करून शेतकऱ्याचा माल विकण्यासाठी राज्य शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे आडत आणि दलालां पासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.शासनाने हा निर्णय मात्र चांगला घेतला आहे.त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा फायदा काही शेतकऱ्याना मिळू लागला आहे.
शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी एकत्र येवून भाजीपाल्याचे उत्पन घेण्याबरोबरच विकण्याचेही तंत्र आत्मसात करत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सेंद्रीय भाजीपाल्याचे महत्व लक्षात घेऊन त्या पद्धतीने लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी हा भाजीपाला मुंबईच्या सिनेकलाकारांना विकण्यास सुरूवात केली आहे. स्वत:च उत्पादन व विपनन करणाऱ्या या शेतकऱ्यांनी ‘शेती परवडत नाही’ या कल्पनेला खोटे ठरविले आहे. इच्छा तेथे मार्ग सापडतोच.यात काही दिवस त्रास सहन करावा लागतो.मात्र नंतर काही वाटत नाही.
कष्टाने शेतात तयार केलेला शेती माल कुठल्याही रासायनिक खते, पेस्टिसाईड्सचा वापर न करता देशी गाईचे गोमूत्र, शेणखत, तुळशीचा पाला, कडुलिंबाचा पाला, लिंबोली अर्क आणि नैसर्गिक घटकांचा वापर करुन विषमुक्त भाजीपाला केला तर चार पैसेही अधिक मिळतात. या प्रकारे भाजीपाला ठिकठिकाणी शेतात तयार होऊ लागला आहे.
येवला, नाशिक, दिंडोरी, कळवण, निफाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय भाजीपाल्याचे ‘ मार्केट’ विकसित केले आहे. या ग्रुपमध्ये पदाधिकारी नसून केवळ एकमेकांच्या विश्वासावर हा उपक्रम सुरू आहे. सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, काकडी, मेथी, शेपू, वांगी, कोथंबीर, कांदापात पालक या प्रकारच्या भाजीपाल्याचा यात समावेश आहे.खडक ओझर येथील सदाबहार पेरू,आपपल बोर,काजू, सिताफळ,केशर आंबा,फणस या सेंद्रीय फळांना मागणी वाढली आहे.
सेंद्रीय भाजीपाल्याचा वर्षभराचा भाव काही ठिकाणीं एकाच वेळी निश्चित करण्यात येतो.यात बाजारात कितीही चढ-उतार झाले तरी हा भाजीपाला निश्चित केलेल्या दरानेच विकला जातो.शिवाय ग्राहकाला गरजेनुसार भाजीपाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आहे.एखाद्या ग्राहकाला जर टमाटे एक किंवा अर्धा किलो न घेता त्याला ४ ते ५ वांगेच फक्त घ्यायचे आहे तर तो ते घेऊ शकतो.
शेतकऱ्यांनी आपआपल्या भागातील पाण्याची उपलब्धता बघून हवामान आणि नैसर्गिक जमिनीची पोत बघून पिके वाटून घेतली तर नक्कीच फायदा होतो.या साठी इकोसर्ट हे ऑर्गेनिक प्रमाणपत्र घेऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही उत्पादने विकण्याची परवानगी मिळवली आहे. परंपरागत कांदे, द्राक्ष पीक घेण्यापेक्षा या प्रकारे नैसर्गिक व सेंद्रीय भाजीपाला फळाचे उत्पन्न घेतल्यास शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे आल्याशिवाय राहणार नाही.(क्रमशः)
हरिभाऊ सोनवणे
(पत्रकार तथा प्रयोगशील शेतकरी-९४२२७६९४९१)