सुदृढ हृदयासाठी जीवनशैली,व्‍यायाम,तणावमुक्‍त जीवनाचा करा अवलंब

मॅग्‍नम हॉस्‍पिटलतर्फे आयोजित 'व्हा हृदयाचे राखणदार'परिसंवादात मान्‍यवरांचा सूर

0

नाशिक,दि,२७ ऑक्टोबर २०२४ – हृदयाशी निगडीत विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.चुकीची जीवनशैली,व्‍यायामाचा अभाव आणि जीवनात वाढत असलेला ताणतणाव यासाठी कारणीभूत आहे. हृदयविकाराशी निगडीत आधुनिक उपचार अवगत झाले असले तरी, रुग्‍णांनी हृदयविकार होणार नाही, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. व निदान झाल्‍यास योग्‍य ठिकाणी व तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. सुदृढ हृदयासाठी चांगली जीवनशैली, नियमित व्‍यायाम आणि तणावमुक्‍त जीवनाचा अवलंब करावा,असा सूर तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या परिसंवादात उमटला.

मॅग्नम हार्ट इन्स्टिट्युट व मॅग्नम मल्टिस्पेशालिटी हॉस्‍पिटलचे वतीने रविवारी (दि.२७ ऑक्टोबर) कालिदास कलामंदिर सभागृहात ‘व्हा हृदयाचे  राखणदार’ विषयावर परीसंवाद झाला. या परिसंवादात नांदेड येथील मानसोपचार तज्ञ डॉ. नंदु एम.मुलमुले, पुणे येथील कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. रणजित जगताप आणि नाशिक येथील प्रसिध्द हृदयविकार तज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी सहभागी होतांना मार्गदर्शन केले. या परिसंवादाला श्रोत्‍यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्‍ही पद्धतीने श्रोत्‍यांनी सहभागी होतांना उपयुक्‍त अशा टिप्‍स जाणून घेतल्‍या.  नंदन दिक्षित यांनी मुलाखत घेतली. परिसंवादाचे सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.

Follow a healthy lifestyle, exercise, stress-free life for a healthy heart

शास्‍त्रोक्‍त उचाराला द्या प्राधान्‍यः डॉ.जगताप
हृदयविकार टाळायचे असेल तर सकाळी लवकर उठून व्‍यायामापासून दिवस सुरु करणे, पौष्टीक आहार व पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे ठरते. चुकीच्‍या जीवनशैलीमुळे बहुतांश वेळा आजार जडतात. परंतु हृदयविकाराचे निदान झाल्‍यास शास्‍त्रोक्‍त पद्धतीने उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेऊन त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु ठेवावे. हृदयविकाराच्‍या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्‍ला डॉ.रणजित जगताप यांनी दिला. कोलेस्‍टरॉल वाढला असले तरी घाबरुन न जाता काही दिवस जीवनशैलीत बदल करावे. बेकरी उत्‍पादने बंद करावीत. तरी फरक पडला नाही तर औषधांचा पर्याय तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली अवलंब करावा. शक्‍यतो ताजे जेवण घ्यावे. साठविलेले (प्रीझरव्‍हेटिव्‍ह) पदार्थांचे सेवन टाळावे, अशा उपयुक्‍त टिप्‍स त्‍यांनी दिल्‍या.

हृदयाची कुंडली माहिती करुन घ्याः डॉ.चोपडा
सध्याच्‍या तंत्रज्ञानामुळे हृदयविकाराच्‍या संभाव्‍य धोक्‍यांविषयी माहिती मिळविणे सुलभ झाले आहे. चाचण्यांतून हृदयाची कुंडली माहिती करुन घ्यावी. व जोखीम लक्षात घेऊन त्‍यादृष्टीने उपाययोजनांना सुरुवात करावी, असा सल्‍ला डॉ.मनोज चोपडा यांनी दिला. कोलेस्‍टरॉलचा बाऊ करायला नको. अनेक हार्मोनची निर्मिती या घटकांमुळे होत असल्‍याने ते शरीरासाठी आवश्‍यक असते. परंतु ते विशिष्ट पातळीपर्यंत मर्यादित राहाणे महत्त्वाचे असते. कमी वयातील हृदयविकाराबाबत डॉ.चोपडा म्‍हणाले, ३० ते ४५ वर्षात हृदयविकाराचा झटका आल्‍याचे प्रकार वाढले आहेत. विटामिन डीसमवेत इतर विविध घटक मधुमेह, उच्च रक्‍तदाबसह इतर विविध आजारांसाठी धोकादायक ठरतात. याशिवाय वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण धोकादायक आहे. धुम्रपानामुळेही हृदयरोगाचा धोका वाढतो. हेल्‍थ प्लानिंग करुन वैद्यकीय स्‍थितीकडे नागरिकांनी लक्ष ठेवण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. हृदयविकाराचा झटका आला, हे कसे ओळखावे, या अत्‍यावस्‍थ स्‍थितीमध्ये काय उपाययोजना कराव्‍या, याविषयी त्‍यांनी मार्गदर्शन केले.

महिलांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनकः डॉ.मुलमुले
अलीकडे उच्च शिक्षित महिला नोकरी सांभाळून कुटुंबाच्‍या जबाबदार्या पेलता आहेत. दुहेरी जबाबदारी सांभाळतांना येणार्या ताण तणावामुळे महिलामध्ये आजारांचे प्रमाण वाढते आहे. रजोनिवृत्तीनंतर संक्रमणाच्‍या काळात हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. त्‍यामुळे महिलांनी आरोग्‍याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्‍ला डॉ. नंदु एम.मुलमुले यांनी दिला. ताणतणावामुळे वाढत असलेल्‍या हृदयविकारावर त्‍यांनी लक्ष वेधले. तणावापासून दूर राहाण्यासाठी अपरिहार्य चक्रात न अडकण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. तणावाच्‍या व्‍यवस्‍थानाबाबत उपयुक्‍त टिप्‍स त्‍यांनी दिला

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.