नाशिक,दि,२५ ऑक्टोबर २०२४ – जागर वाचनसंस्कृतीचा! हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक संचालित ग्रंथ तुमच्या दारी… योजनेच्या यूएई विभागाची दशकपूर्ती आणि वाचनप्रेरणा दिवस या निमित्तानेआयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध लेखिका आणि बालमानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. आरती सूर्यवंशी आणि ग्रंथ तुमच्या दारी… योजनेचे प्रवर्तक श्री.विनायक रानडे हे या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गेली दहा वर्षं मराठी आणि ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’च्या माध्यमातून हिंदी पुस्तकं यूएईमधल्या वाचकांपर्यंत पोहचत आहेत. वाचन संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करण्याचा वसा घेतलेले ३०-३५ समन्वयक यासाठी झटून काम करत आहेत, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत.
परदेशात नवीन पिढीला केवळ पुस्तकं देऊन भागणार नाही तर त्यांना मुळात भाषेची गोडी लागली पाहिजे या हेतूने २०२४मध्ये बाल / कुमारवयीन मुलांसाठी ‘माय मराठी मंच’ स्थापन करण्यात आला. मुलांनी, मुलांसाठी चालवलेला हा मंच; ज्यात मुलांची मराठी शब्दसंपदा वाढावी, त्यांना मराठीत उत्तम बोलता यावं यासाठी प्रयत्न केले जातात. दर महिन्याला एका शनिवारी ऑनलाईन माध्यमातून हा मंच काम करतो. डॉ. प्रसाद बारटके, मंजुषा जोशी, संपदा मेहता आणि पल्लवी कबाडे या समन्वयकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रस्तुत कार्यक्रमात पावनी बारटके, दूर्वा कबाडे, स्पृहा जोशी, वीर पाटील, सिध्दी पाटील व स्वजोश पोरवाल या मुलांनी प्रेक्षकांसमोर प्रात्याक्षिक सादर करून त्यांची मने जिंकली.
जैनम आणि जीविका ही १०-१२ वर्षांची बहीणभावाची जोडी ५० दिवसात १२० सत्र घेण्याचा विक्रम करणारी. मारवाडी मातृभाषा आणि हिंदी / इंग्रजी भाषेची सवय असली तरी खास या कार्यक्रमासाठी त्यांनी मराठीतून संवाद साधला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
ग्रंथ तुमच्या दारी ..च्या परिवारात एक नवीन देश जोडला गेला.
सौदी अरेबिया येथून श्री संतोष जाधव यांची कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. त्यांना २ ग्रंथपेट्या देऊन ग्रंथ तुमच्या दारी ..च्या परिवारात एक नवीन देश जोडला गेला.वाचाल तर वाचाल! असं आपण नेहमीच ऐकतो. तरीही वाचन नक्की कशासाठी हा प्रश्न उरतोच. त्याचं उत्तर म्हणून प्रचिती तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सलोनी पोरवाल, श्वेता पोरवाल, अनघा जोशी, निशांत पंडित यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’, ‘इग्नायटेड माईंड्स’, मृणाल कुलकर्णी यांच्या ‘चॉइसेस’, डॉ.आरती सूर्यवंशी यांच्या ‘वानवळ्याच्या गप्पा’ तर रवि वाळेकर यांच्या ‘इजिप्सी’ या पुस्तकातील उताऱ्यांचे वाचन केले. देशप्रेम, नातेसंबंध, निसर्ग, प्रवासवर्णन अशा चौफेर विषयांची वाचनातून मिळणारी अनुभूती यानिमित्ताने प्रेक्षकांना मिळाली .
अशा वेळी संवाद हेच ज्यांचं आवडीचं माध्यम ते नाटकवेडे कसे मागे राहातील? ‘बापजन्म’ आणि ‘अस्तु’ या दोन सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखा एकमेकांस भेटल्या तर… या कल्पनेवर आधारित विशाखा पंडित लिखित/ निखिल जोशी दिग्दर्शित ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ ही संवादकथा सादर केली अभय टिपणीस, स्नेहल देशपांडे, मृदुला रानडे, सौरभ घाडीगावकर यांनी.
प्रसिद्ध लेखिका आणि मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. आरती सूर्यवंशी यांचा लेखनप्रवास उलगडत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या ग्रंथ तुमच्या दारी… यूएई विभागाच्या या वर्षीच्या मुख्य समन्वयिका डॉ. पल्लवी बारटके यांनी.
कोजागर्ति? असं म्हणत; चंद्र, चांदणं आणि रासलीला यांचा सुरेख गोफ विणत डॉ. नितीन उपाध्ये यांनी डॉ. सीमा उपाध्ये, विदुला पुरोहित, अवधेश राणा, चाहूल मळेकर या कवी मंडळींना बोलतं केलं. या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या प्रमुख पाहुण्या डॉ. आरती सूर्यवंशी.
जागर वाचनसंस्कृतीचा!
ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत; हातात पुस्तकांचं-वाचनाचं महत्त्व सांगणारे फलक घेऊन उत्साहाने घोषणा देत जाणारा वाचकवर्ग; अस्स्खलित मराठीत आपल्या वक्तृत्वाने प्रेक्षकांना चकित करणारा बालचमू; अभिवाचन, काव्यवाचन; लेखनवाचन स्पर्धेचा बक्षीस समारंभ अशी साहित्यिक मेजवानी तीही एका लेखकाच्या सहवासात…एखाद्या छोटेखानी संमेलनाची आठवण करून देणारा हा कार्यक्रम सादर झाला तो महाराष्ट्रात नव्हे तर दूरदेशी आखातात… दुबईजवळ असलेल्या आसमान मध्ये हिरव्यागार, प्रशस्त जैनम-जीविका फार्म हाऊसवर…!
दशकपूर्ती निमित्ताने विविध वयोगटांसाठी घेण्यात आलेल्या कथावाचन / कथालेखन / जाहिरात आणि निबंधलेखन या स्पर्धांचा निकाल यावेळी जाहीर करण्यात आला. नेहा अग्निहोत्री यांनी स्पर्धेची माहिती दिली आणि विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मेघना वर्तक, रश्मी लुकतुके, मोहना केळकर व हरि अग्निहोत्री यांनी काम पाहिले.
अशा उत्तम कार्यक्रमांचं आयोजन प्रायोजकांच्या मदतीशिवाय शक्य नाही. नीलम नांदेडकर यांनी या कार्यक्रमासाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या जैनम जिवीका फार्मचे धीरज जैन, ट्रेनिंग बीच्या रचना हिर्लेकर, मनीषा फडके, श्रीमंत ढोलताशा पथक, रिव्हिएर वॉटर कंपनी, अल माया सुपरमार्केट, बॉन्ड बियॉन्डच्या समृद्धी महाजन यांची माहिती दिली आणि पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्रथमेश अडविलकर आणि श्वेता करंदीकर यांनी केलं होतं. ग्रंथ दिंडीची सुरेख पालखी आरती अडके आणि कीर्ती देशपांडे यांनी सजवली तर यूएई विभागाचा दहा वर्षांचा प्रवास दाखवणारे फलक प्रवेशद्वारापासून लावून श्री. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाला वेगळाच आयाम दिला. रंगमचीय व्यवस्था सांभाळणारे विरभद्र कारेगावकर, मनीषा कुलकर्णी, गौरी देवधर तसेच नोंदणीकक्ष सांभाळणारे किरण थोरात, राजन तावडे,विभा लाड या पडद्यामागच्या सहकाऱ्यांचा सुद्धा वाटा मोलाचा होता.
सगळ्यांना एका सूत्रात बांधणारा सूत्रधार सादरकर्त्यां इतकाच महत्त्वाचा असतो आणि ती भूमिका विशाखा पंडित यांनी उत्तम प्रकारे पार पडली. ग्रंथ तुमच्या दारी…चे प्रवर्तक श्री. विनायक रानडे आणि वैदेही रानडे यांच्या उपस्थित रंगलेला हा कार्यक्रम आखाती प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील आणि येथे वाचन संस्कृतीचा जागर असाच दुमदुमत राहील यात शंका नाही.
जुबेल सौदी अरेबिया येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ
जुबेल सौदी अरेबिया येथून श्री संतोष जाधव यांची कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. त्यांना २ ग्रंथपेट्या देऊन ग्रंथ तुमच्या दारी ..च्या परिवारात एक नवीन देश जोडला गेला.
अतिशय सुंदर आयोजिलेल्या कार्यक्रमाचा परिपूर्ण आढावा ओघवत्या शैलीत घेतला आहे त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!!