नाशिक जिल्हा मतदान टक्केवारीचे ७५ प्लस उद्दिष्ट साध्य करू -जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंध:निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश
नाशिक, दि.१९ नोव्हेंबर, २०२४- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत ५० लाख ६१ हजार १८५ मतदरांनी नोंदणी केली असून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्याची मतदान टक्केवारीचे ७५ प्लस हे उद्दिष्ट साध्य करू या,(Nashik District Voting Percentage) असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक जिल्हावासियांना केले आहे.
बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानासाठी शासनाने सुट्टी घोषित केली आहे. त्यामुळे कुटुंबातील ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत मात्र शिक्षण किंवा नोकरी/ व्यवसाय निमित्ताने ते अन्य ठिकाणी राहत असल्यास तिथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. या सदस्यांना लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रोत्साहित करावयाचे आहे. मतदार चिठ्ठीवरून नागरिकांना आपले मतदान केंद्राची माहिती मिळाली असेल. परंतु जर ती प्राप्त झाली नसल्यास आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन ॲपवरून आपले मतदान केंद्र व मतदान यादीतील अनुक्रमांक शोधणे सुलभ आहे.तसेच मतदान केंद्राच्या बाहेर आपले सहायता कक्षात मतदान केंद्र अधिकारी हे मतदारांना त्यांचे अनुक्रमांक शोधून देण्यास मदत करणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक मुलभूत सेवा-सूविधा जसे पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, माहितीदर्शक फलक, टॉयलेट, व्हीलचेअर, पाळणाघर व स्वयंसेवक या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेच्या संनियंत्रणासाठी जिल्ह्यात ३२८० मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात ६४.२१ टक्के मतदान झाले आहे असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नागरिकांनी अधिक उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी होवून ७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रतिबंध::निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मतदानाची गोपनियता राखण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल फोन, सॅटेलाईट फोन तसेच वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध केला आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिल्या आहेत.
मोबाईल किंवा अन्य साधनांचा वापर करून मतदारांवर धाकदपटशा, दडपशाही केली जाऊ नये यासाठीही मतदान केंद्रात मोबाईल वापरास बंदी सक्त मनाई केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी, मतदान यंत्रात बिघाड इत्यादी तातडीच्या कामकाजासाठी संबंधित मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी यांना केवळ मोबाईल वापर अनुज्ञेय आहे.
या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती मतदान केंद्रात मोबाईलचा गैरवापर करतांना आढळल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ व भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी आदेशित केले आहे. मतदारांनी वरील सूचनांचे पालन करून मतदान करावे,असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवारांने वापरावयाच्या वाहनांची संख्या व वाहनातील व्यक्तींच्या संख्येबाबत निवडणूक आयोगाचे सक्त निर्देश
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाने विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना स्वत:साठी एक, निवडणूक प्रतिनिधी साठी त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी प्रत्येकी एक अशी ३ वाहने व एका वाहनात वाहनचालकसह केवळ ५ व्यक्ती असाव्यात, असे निर्देशित केले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवाराकडून वापरण्यात येणा-या वाहनांसाठी आवश्यक परवाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मा.निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिलेल्या मानकांनुसारच देण्यात येणार आहे. उमेदवाराने या वाहनांसाठी दिलेले मूळ परवाने (फोटो कॉपी नाही) वाहनाच्या दर्शनी भागात (पढील भागातील काचेवर लावणे आवश्यक आहे. परमिटवर वाहनाचा क्रमांक, परवाना निर्गमित केल्याची तारीख, उमेदवाराचे नाव आणि क्षेत्र (ज्या क्षेत्रात फिरस्ती करावयाची आहे) इत्यादी बाबी नमूद असाव्यात. अशा वाहनांची विधानसभा मतदारसंघाच्या एफ.एस.टी व एस.एस.टी पथकाकडून करण्यात येईल. संबंधित सहाय्यक खर्च निरीक्षकांकडून उमेदवाराच्या खर्चात या वाहनांचे इंधन, वाहन चालकांचे पगार व वाहन भाडे इत्यादींची नोंद घेण्यात येईल.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जारी केलेल्या अनिकृत परवान्याशिवाय इतर वाहने उमेदवारांना वापरता येणार नाही. असे अनधिकृत वाहन आढळून आल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 व भारतीय संहिता नुसार कारवाई करण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी या सूचनांची दखल घ्यावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी आदेशित केले आहे.