‘आमचा ट्रेलर बघू नका!’ -“‘गोंधळ’ चित्रपटाचा अनोखा प्रचार
दिग्दर्शक संतोष डावखर यांचे अनोखे आवाहन सोशल मीडियावर चर्चेत"

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२५ – Gondhal Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत नव्या प्रयोगांची परंपरा सुरू आहे. अशातच प्रेक्षकांच्या मनात गोंधळ घालणारे पण तितकेच कुतूहल निर्माण करणारे एक वेगळे आवाहन समोर आले आहे — “आमचा ट्रेलर बघू नका!” हे आवाहन आहे बहुचर्चित आगामी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ चे दिग्दर्शक संतोष डावखर यांचे.
जिथे बहुतेक चित्रपटांच्या प्रमोशनसाठी ट्रेलरवर भर दिला जातो, तिथे ‘गोंधळ’ टीमने उलट दिशेने पाऊल टाकले आहे. संतोष डावखर यांनी प्रेक्षकांना ट्रेलर न पाहता थेट थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचे सुचवले आहे. त्यांच्या मते, “या चित्रपटात अनेक रहस्ये आणि भावनिक वळणं आहेत. ट्रेलर पाहिल्यास त्यातील काही थ्रिल कमी होईल. त्यामुळे हा अनुभव पूर्णपणे ताजा ठेवण्यासाठी ट्रेलरपासून दूर राहा आणि थेट सिनेमागृहात ‘गोंधळ’चा आनंद घ्या.”
हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. नेटिझन्समध्ये यावर जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी या ‘रिव्हर्स प्रमोशन’ स्ट्रॅटेजीला भन्नाट मार्केटिंग कल्पना म्हटले आहे. काही जणांनी ‘ट्रेलर बघू नका’ या वाक्यालाच उत्सुकतेचा केंद्रबिंदू बनवले आहे.
‘गोंधळ’(Gondhal Marathi Movie) हा चित्रपट महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृती, नाती, आणि भावनिक गोंधळ यांचा संगम मांडतो. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी कथा, पटकथा आणि संवाद स्वतः लिहिले असून, सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत.
चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, सुरेश विश्वकर्मा, आणि कैलाश वाघमारे यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. या सर्व कलाकारांच्या अभिनयाने ‘गोंधळ’ हा एक बहुआयामी सिनेमॅटिक अनुभव ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, चित्रपटाच्या मेकिंगचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर न पाहाण्याचे हे अनोखे आवाहन ‘गोंधळ’च्या प्रचाराला अधिक वेग देईल की गोंधळ वाढवेल, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.


