दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई – राज्यात आता मोठ्याप्रमाणात लसीकरण होणार असून राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्रीश्री.टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केली. अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.
अभियानाबाबत माहिती देताना श्री. टोपे यांनी सांगितले की, राज्यात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हे मिशन कवच कुंडल अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत देशभरात १०० कोटी नागरिकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून भरीव योगदान दिले जावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.