आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
सरळमार्गी आयुष्य जगतांना आपल्याला प्रत्येक दिवस सरळ, साधा हवा असतो. आयुष्यात सगळं सोपं असावं, कुठलेही चढ-उतार नसावे अशी आपली माफक अपेक्षा असते पण सरळ आयुष्याची अपेक्षा करतांना ‘जर कधी हृदयाच्या ठोक्यांची चढ-उतारांची रेषा सरळ झाली तर सगळंच संपतं’ हे आपण विसरतो. आयुष्यात चढ उतार नसतील, सुखदुःखाचा खेळ नसेल तर आयुष्य जेवणात मीठ नसल्यासारखं बेचव असेल. “आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करायला नको” हे जरी सत्य असलं तरी आपली स्पर्धा ही कायम स्वतःशी असतेच. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला कधी कधी माघार पत्करावी लागते पण ते अपयश जिव्हारी लावून आपण स्वत:शीच हरलो तर जिंकणार कसं?
ए पी जे अब्दुल कलाम यांच छान वाक्य आहे, “जर तुम्ही स्वतःशी हरला नाहीत तर तुमचं जिंकणं निश्चित आहे !” या वाक्याचा विचार केला तर आपली तुलना, आपली स्पर्धा ही इतर कोणाशी नसून फक्त आपल्या स्वतः बरोबर आहे असं लक्षात येतं. आपण मात्र आपल्या मुलांची तुलना कायम दुसऱ्यांशी करत राहतो .मुलांना जोपर्यंत शक्य असतं तोपर्यंत मुलंही या रॅटरेसमध्ये पळत राहतात. नंतर मात्र ती थकतात, ही स्पर्धा जीवघेणी झाली की थांबतात आणि “थांबला तो संपला” या वाक्प्रचाराला खरं ठरवतात. हे टाळायचं असेल तर मुलांना हार न मानता जीवनात येणाऱ्या वाईट प्रसंगातून सहज कसं सावरावं? याची तोंड ओळख व्हायला हवी. त्याचे अनुभव मुलांनी घ्यायला हवेत. मुल चालणं शिकतांना असंख्य वेळा पडतं पण तरीही जितक्या सहजतेने, हसत हसत ते परत चालण्याचा प्रयत्न करतं ती जिद्द, ती निरागसता मुलांमध्ये आयुष्यभर राहायला हवी. मुलाला चालण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती पालक म्हणून आपणच देत असतो. मुल पडलं की टाळ्या वाजवून आपण त्याला उठवण्यासाठी, परत चालण्यासाठी प्रोत्साहित करत असतो, आपली ही खिलाडूवृत्ती मुलं मोठी झाल्यावर कुठे हरवते?
काही मुलांना अपयश येतं. कधीकधी कठीण परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. कोणी टीका केली ते निराश होतात तर कधी पूर्णपणे हार मानतात. ही मानसिकता मुलांना आयुष्यभर त्रास देत राहते. मनात विश्वास असेल तर आपण कधीच हरत नाही पण जर मनात शंका असेल तर आपल्याला कधीही यश मिळत नाही. मुलांमध्ये असणाऱ्या गुणांची ओळख पालक म्हणून आपल्याला व्हायला हवी आणि ती ओळख योग्य वेळी योग्य शब्दात आपण मुलांनाही करून द्यायला हवी. अनेकदा मुलांसमोर घडणाऱ्या घटनांमधून मुलांना ‘आपल्यात काहीतरी कमतरता आहे’ अशी भावना निर्माण होत असते. ती भावना काढण्याचं काम पालक म्हणून आपलं आहे. याविषयी आज परत तुम्हाला एक गोष्ट सांगते.
ही गोष्ट आहे एका माणसाची. स्वत:ला खूप कमजोर समजणारा, ‘माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही’ असं कायम म्हणणारा हा माणूस देवावर मात्र खूप विश्वास ठेवत असतो. देव प्रत्येकासाठी काही ना काही योजना बनवतो असा त्याला ठाम विश्वास असतो.
एकदा एका शेतातून जात असताना फळांनी लगडलेलं झाड त्याला दिसतं. ‘ही फळं माझ्या साठीच झाडावर आली आहेत, माझं पोट भरावं म्हणून देवानेच ही फळं निर्माण केली आहेत’, असा विचार करून तो माणूस झाडावर चढायला लागतो. तेवढ्यात शेताचा मालक धावत येतो आणि त्या मालकाच्या हातात असलेली काठी बघून आधीच कमजोर असणारा हा माणूस घाबरतो. भराभर झाडावरून खाली उतरतो आणि रस्ता सापडेल तिकडे पळत सुटतो.
तो माणूस जेव्हा भानावर येतो तेव्हा तो एका जंगलात पोहोचलेला असतो. नाईलाजाने घाबरत घाबरत इकडे तिकडे जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधत असताना त्याला एक अपंग कोल्हा दिसतो. त्याचे मागचे दोन्ही पाय निकामी झालेले असतात आणि तो कसाबसा पुढच्या दोन पायांवर हळूहळू सरकत असतो. या माणसाला त्या कोल्ह्याची खूप दया येते. ‘अशा अवस्थेत हा कोल्हा जिवंत तरी कसा राहिला?’ याचं त्याला खूप आश्चर्य वाटतं. तेवढ्यात झाडांवर माकडं चित्कारायला लागतात, आजूबाजूचे प्राणी मोठा आवाज करत लांब पळायला लागतात आणि तिथे एक भला मोठा सिंह अवतरतो. त्या सिंहाच्या तोंडात मांसाचा तुकडा असतो. ‘हा सिंह आता या अपंग कोल्ह्याला मारणार’ याची त्या माणसाला खात्री पटते.
तो माणूस भराभर शेजारच्या एका झाडावर चढतो. दमदार पावले टाकत सिंह त्या कोल्ह्याजवळ येतो आणि आपल्या तोंडातला मांसाचा तुकडा त्या कोल्ह्यासमोर टाकतो. ते मांस खाऊन कोल्हा त्याचं पोट भरतो आणि सिंह आपल्या वाटेने निघून जातो. हे दृश्य बघून त्या माणसाचा देवावरचा विश्वास अजूनच घट्ट होतो. “जसं या अपंग कोल्ह्यासाठी देवाने सिंहाची निर्मिती केली आहे , तसंच माझ्यासारख्या कमजोर माणसासाठी कोणी ना कोणी देवाने निर्माण केला असेलच” असा विचार करून तो माणूस जंगलातून बाहेर आल्यानंतर निवांत एका दगडावर बसून राहतो आणि त्याच्या मदतीसाठी देवाने निर्माण केलेल्या “त्या” माणसाची वाट बघत राहतो. काही तास उलटतात. दोन-तीन दिवस जातात. त्या वाटेने कोणीही दुसरा माणूस येत नाही. आधीच कमजोर असणारा हा माणूस आता जास्तच अशक्त झाला होता. मनातली आशा धूसर होत चालली होती आणि अगदी त्याच वेळेस एक म्हातारे साधूबुवा त्या रस्त्याने येतात.
रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या एका माणसाला पाहून सज्जन हृदयी साधूबुवा थांबतात. त्याची विचारपूस करतात. तो माणूस इत्यंभूत सगळी हकीकत सांगतो आणि ‘’मी इथे देवाने माझ्यासाठी निर्माण केलेल्या माणसाची वाट बघतो आहे’’ हेही सांगतो. यावर काहीही न बोलता साधू महाराज आधी त्याला खायला घालतात. पोटभर खाऊन झाल्यावर पाणी प्यायला देतात आणि त्याला थोडीशी तरतरी आल्यानंतर त्याच्याशी बोलायला सुरुवात करतात. तो माणूस जरासा देवावर नाराज होता. ‘एका अपंग कोल्ह्याचं पोट भरण्याची व्यवस्था देवाने केली होती मग माझी व्यवस्था करायला देव कसा विसरला?’ या प्रश्नावर तो अडून बसला होता. साधु महाराज मंद स्मित करत त्याला म्हणतात, “तू म्हणतोस ते खरं आहे. देवाने प्रत्येकासाठी काही ना काही योजना केलेली आहे आणि तु ही त्या योजनेचा एक भाग आहेस. मात्र तुझी बघण्याची दृष्टी चुकते आहे. तू तुझ्यासाठी असलेली योजना विरुद्ध दिशेने बघतो आहेस. देवाने तुला कोल्ह्यासारखा नाही तर त्या सिंहासारखा बनण्यासाठी हा मानवाचा जन्म दिला आहे हे कधीही विसरू नकोस.”
आपल्याला या गोष्टीतल्या ‘साधू महाराजांच्या’ भूमिकेत जाऊन आपल्या मुलांना सिंहाच्या भूमिकेत नेऊन ठेवायचं आहे आणि यासाठी सगळ्यांत पहिले, ‘आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी कठीण परिस्थितीचा सामना करावाच लागतो’ हे मान्य करण्याची मानसिकता मुलांमध्ये यायला हवी.
आपण केलेल्या सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला कायम पहिला नंबर मिळेल किंवा किमान यश मिळेल असं होत नाही. कधीतरी अपयशाचा सामनाही करावा लागतो. तो तेवढ्याच दिलखुलासपणे करता आला पाहिजे आणि अपयशानंतर कुठेही न थांबता, यश मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न चालू ठेवायला हवेत.
बल्बचा शोध लावणाऱ्या एडिसन या शास्त्रज्ञाने त्याच्या आईची एक आठवण सांगितली आहे. एडिसन प्रायमरी शाळेत असतांना त्याच्या शिक्षकांनी त्याच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि ती चिट्ठी ‘आईला दे’ असं सांगितलं. शाळेतून आलेली ती चिठ्ठी वाचता वाचता एडिसनची आई रडू लागली. आईला रडतांना बघून एडिसनने ‘त्या चिठ्ठी’ मध्ये काय लिहिलं आहे? हे विचारले तेव्हा आई म्हणाली, “अरे बाळा हे आनंदाश्रु आहेत, यात असं लिहिलंय की तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि आमची शाळा खुपच साधारण आहे. त्याच्या हुशारीसाठी आमच्या शाळेत योग्य शिक्षक नाहीत, म्हणून तुमच्या मुलांना तुम्ही घरीच शिकवा!” आणि खरोखरच त्या माऊलीने एडिसनचं शिक्षण घरी सुरू केलं. काही वर्षांनी शिकून-सवरून एडिसन वैज्ञानिक बनले तोपर्यंत त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. कधीतरी घर आवरतांना काही जुन्या दस्तऐवजात एडिसनला शिक्षकांनी पाठवलेली ‘ती चिठ्ठी’ सापडली आणि त्याला त्याच्या आईने केलेल्या कार्याची महानता पटली. ती चिठ्ठी वाचून सामान्य बायकांसारखी आपल्याच मुलाला मारहाण करून , त्याला बेअक्कल ठरवुन आणि वर्गातील इतर मुलांशी त्याची तुलना करून त्या मुलाचं खच्चीकरण न करता, शाळेतुन जवळजवळ हाकलून देण्यात आलेल्या सामान्य मुलाला ‘तू असामान्य आहेस’ ही जाणीव त्या माऊलीने करून दिली होती आणि खरोखरच शाळेने मंदबुद्धी ठरवलेले एडीसन असामान्य बनले होते. हा फक्त आणि फक्त त्या आईने तिच्या बाळाला दिलेल्या आत्मविश्वासाचा चमत्कार होता.
जेव्हा अपयश येतं तेव्हा ‘पुढच्यावेळी तू अजून चांगलं करू शकतोस’ हा विश्वास मुलांना दिला तर दुःखी होण्याऐवजी पुढच्या वेळेस ते समस्या सोडवण्याचा अथक प्रयत्न करतात. त्याच्या समस्या त्याला सोडवु द्या, तुम्ही फक्त त्याच्या बरोबर रहा. तुम्ही त्याची समस्या सोडवू नका त्याऐवजी त्याला समस्या सोडवता येईल अशी मदत अप्रत्यक्षपणे करा. मुलांच्या चुका जर वेळीच सुधारल्या नाहीत तर मुलं कधीही शिकणार नाही. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या समस्या वाढतील. मग त्या समस्या पालक म्हणून जर तुम्ही सोडवत राहिलात तर तुम्ही तुमचं आणि मुलांचं दोघांचंही आयुष्यभराचं नुकसानंच कराल. मुलं जेव्हा हार न मानता, न थांबता, त्यांच्या चुकांमधून शिकायला लागतात तेव्हा ते नवनवीन कौशल्य आत्मसात करतात, नवीन वाटा शोधतात आणि काही विषयांमध्ये तरबेज व्हायला लागतात. कालांतराने कठीण वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी सोप्या व्हायला लागतात, म्हणूनच मुलांना थांबवू नका. थांबत असतील तर त्यांना पुढे जायला प्रोत्साहित करा , नवीन नवीन विचार करण्यासाठी त्यांच्यासमोर प्रसंगी नवीन आव्हाने उभी करा. ज्यातून सकारात्मक पद्धतीने मुलं मार्ग काढतील. किमान मार्ग काढण्याचा विचार करतील. मुलांचा विचार करणं थांबू देऊ नका,कारण जेव्हा मुलं विचार करण्याचन थांबतील तेव्हा ते प्रयत्न थांबवतील आणि जेव्हा मुलांचे प्रयत्न थांबतील तेव्हा त्यांचं आयुष्य थांबेल.
“थांबला तो संपला” ही म्हण आपल्या मुलांच्या आयुष्यात येण्याआधीच “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” या म्हणीची ओळख मुलांना करून देण्याची हीच योग्य वेळ आहे. तर लागा मग कामाला !
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह !
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/