चीनमध्ये हाहा:कार उडवणारा HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला
HMPV विषाणूमुळे भारताची चिंता वाढली ?सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
बंगळुरू ,दि, ६ जानेवारी २०२५- ज्याची भीती होती तेच घडले .! चीनमध्ये हाहा:कार उडवणारा HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे ? कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात ८ महिन्यांच्या मुलामध्ये HMPV चे प्रकरण आढळलं आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली आहे.HMPV विषाणूमुळे भारताची चिंता वाढली असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील काही वर्ष संपूर्ण जगासाठी अत्यंत कठीण होती. कारण साधारण २०२० सालापासून कोरोना महामारीने अवघ्या जगभरात उच्छाद मांडला होता. कोरोनामुळे विविध देशात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या प्रभावातून आजही लोक सावरू शकलेले नाहीत की, आता चीनमध्ये आणखी एक विषाणूने उच्छाद मांडली आहे, ज्याचा धोका संपूर्ण जगासाठी निर्माण झाला आहे. या विषाणूचे नाव ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे, ज्यामुळे चीनमध्ये या आजाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
मुलाचा प्रवासाचा इतिहास नाही.रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनी एचएमपीव्हीची पुष्टी केली आहे. कर्नाटक आरोग्य विभाग ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुढील निर्देशाची वाट पाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान हा व्हायरस भारतात येण्याआधी आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ.अतुल गोयल यांनी सांगितलं की, मानवी मेटापन्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात.
२००१ मध्ये नेदरलँडमध्ये हा विषाणू पसरला
DGHS ने डॉ. अतुल गोयल यांना सांगितले की भारतीयांनी संसर्ग टाळण्यासाठी नेहमीची खबरदारी घ्यावी. जर एखाद्याला सर्दी-खोकला असेल तर त्याच्या संपर्कात येणे टाळावे. सर्दी आणि तापासाठी लागणारी नेहमीची औषधे घ्या. सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही. हिवाळ्यात श्वसन व्हायरसच्या संसर्गाची शक्यता जास्त असते. चीनमध्ये पसरलेला विषाणू नेदरलँड्समध्ये २००१ मध्ये पहिल्यांदा पसरला होता. या विषाणूमुळे सामान्यतः सर्दीसारखी लक्षणे उद्भवतात.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात..
यामुळे अनेकदा न्यूमोनिया, दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज होतो. यूएस मधील क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, संशोधकांचा अंदाज आहे की १०% ते १२% मुलांमध्ये श्वसनाचे आजार HMPV मुळे होतात. ५% ते १६% मुलांमध्ये निमोनियासारखी लक्षणे दिसून येतात. डॉ. डांग्स लॅबचे सीईओ डॉ अर्जुन डांग सांगतात की, हा विषाणू नवीन नाही आणि आमच्या प्रयोगशाळांमध्ये त्याची नियमित चाचणी केली जात आहे. काळजी करण्याची गरज नाही, कारण आतापर्यंत काहीही असामान्य आढळले नाही.