पुणे नगर वाचनालयातर्फे ग्रंथमित्र विनायक रानडे यांचा गौरव
ग्रंथालये ही वाङ्मय संस्कृतीची केंद्र झाली पाहिजेत -अरुणा ढेरे
पुणे नगर वाचन मंदिराचा १७४ वा वर्धापन दिन : विनायक रानडे, सुमेधा चिथडे, टी.एन.परदेशी यांना पुरस्कार प्रदान
पुणे – पुण्यामध्ये अशा कितीतरी संस्था अशा आहेत ज्या वाङ्मयमयीन संस्कृतीसाठी आणि वाचकांसाठी काम करतात त्यांच्या साखळी निर्माण व्हायला हवी. ज्ञानवृद्धीसाठी हे गरजेचे आहे. ग्रंथालये ही वाङ्मय संस्कृतीची केंद्र झाली पाहिजेत. सृजनशीलतेची गजबज हे आपल्या संस्कृतीच्या समृद्धीचे लक्षण आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिराचा १७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सिटी पोस्ट चौकातील संस्थेच्या इमारतीत करण्यात आले होते. यावेळी अरुणा ढेरे यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, सहकार्यवाह प्रसाद जोशी, चिंतामणी तावरे, अनघा फडणीस, गायत्री सावंत,केदार पटवर्धन, अरविंद रानडे, गुरुदास नूलकर, अनिल देऊरकर, गौरी कुलकर्णी, रवींद्र चौधरी, विनायक माने, हर्षदा ठाकर, प्रशांत कुलकर्णी, रोहित जोगळेकर, राजीव मराठे, केतनकुमार पाटील, संगीता पुराणिक, स्वाती ताडफळे उपस्थित होते.
अरुणा ढेरे यांच्या हस्ते सुमेधा चिथडे यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, विनायक रानडे यांना वाचन चळवळ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि टी.एन.परदेशी यांना संत वाङ्मय लेखन पुरस्कार देण्यात आला.

अरुणा ढेरे म्हणाल्या, पूर्वी समाजाच्या विकासामध्ये धर्मसंस्था ही पायाभूत होती. मंदिर हे समाज विकासाचे साधन होते. नृत्य, संगीत, वादन अशा अनेक कलांचा विकास मंदिरातूनच झाला. बदलत्या काळानुसार वाचनालये ही समाज विकासाची मंदिरे झाली पाहिजेत. वाचनालयाचा विकास झाला पाहिजे.
पुणे नगर वाचन मंदिर हे प्रबोधनपर्वाच्या इतिहासातला महत्त्वाचा दस्तावेज आहे. समाजाच्या हिताला पोषक असे नव्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचविणारी जाणती मंडळी वाचन मंदिरात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, पुरस्कार व्यक्तीला नाही तर सेवाकार्याला आहे. हा पुरस्कार प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या त्यागाला मी अर्पण करते. थोर पुरुष केवळ वाचायचे नसतात, तर आपापल्या परीने कृतीमध्ये उतरवायचे असतात.
सैन्यदल हे केवळ एकच असे क्षेत्र आहे, जिथे मागणी नसते, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संप नसतो. स्वातंत्र्य मिळवण्यात आपले काही योगदान नव्हते, परंतु स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. टी.एन.परदेशी आणि विनायक रानडे, मधुमिलिंद मेहेंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. विनायक माने यांनी आभार मानले.
विनायक रानडे यांनी परितोषिकांची रक्कम दिली “सिर्फ” संस्थेसाठी
जगभरात वाचकांसाठी सुमारे अडीच कोटींची पुस्तके ग्रंथ तुमच्या दारी या माध्यमातून पोहचवली..वाचनाच्या माध्यमातून नवीन पिढी वाचन संस्कृतीने अनुभवाचा श्वास घायला लागली..वाचन संस्कृती वाढवण्याचे काम विनायक रानडे यांच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. आणि चांगल्या कामासाठी रानडे नियमित पुढाकार घेत असतात.
सुमेधा चिथडे यांनी सिर्फ या संस्थेच्या माध्यमातून जवानांसाठी सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा केला. त्याचप्रमाणे १९७१ च्या युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ऑक्सिजनचा नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले त्यासाठी ग्रंथमित्र विनायक रानडे यांनी त्यांना मिळालेली परितोषिकांची रक्कम सिर्फ या संस्थेला दिली ही रक्कम अरुणा ढेरे यांच्या हस्ते सुमेधा चिथडे यांना सुपूर्त केली.