मला स्वतः एकत्र कुटुंबपद्धती खूप आवडते – अमृता पवार

0

मुंबई -एक मुलगी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये लग्न करून गेल्यावर तिची होणारी तारेवरची कसरत हि सध्या झी मराठी वरील आगामी मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं च्या प्रोमोजमधून सगळ्यांना दिसतेय. या मालिकेत अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिका साकारत आहेत. अमृताची पडद्यावरची तारेवरची कसरत, हि मालिका आणि तिच्या व्यक्तिरेखेविषयी अभिनेत्री अमृता पवार हिच्या बरोबर खास बातचीत

 १. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी थोडक्यात सांग?

– मी अदिती या मुलीची भूमिका साकारतेय. खूप मोठ्या, श्रीमंत घरातील हि मुलगी आहे. तिला गर्दीची खूप भीती वाटते, खूप माणसांची भीती वाटते पण तिचं अशा एका मुलावर प्रेम आहे जो एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढला आहे. त्याच कुटुंब खूप मोठं आहे हे जेव्हा तिला कळेल तेव्हा काय घडेल हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.

२. या भूमिकेसाठी जेव्हा तुला विचारण्यात आलं तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती?

– या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी खूप जास्त एक्सायटेड होती. कारण हि भूमिका मी आधी निभावलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेबद्दल जेव्हा मला सविस्तर सांगण्यात आलं तेव्हा ते ऐकून मला जितकं छान वाटलं तितकंच मला शूटिंग करताना देखील मजा येतेय. माझी खात्री आहे कि प्रेक्षकांना देखील माझी भूमिका खूप आपलीशी वाटेल.

३. या मालिकेतील तुझी भूमिका आणि तुझ्यामध्ये किती साम्य किंवा किती फरक आहे?

– अदितीला माणसांची भीती वाटते त्यामुळे ती एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये किती रुळेल हे सांगता येत नाही पण याउलट मला स्वतः एकत्र कुटुंब पद्धत खूप आवडते. मी खूप एन्जॉय करते, मला सर्व कुटुंबियांसोबत वेळ घालवायला, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. हा एक फरक आहे अदिती आणि अमृता मध्ये. त्याचबरोबर दोघींमध्ये साम्य असं आहे कि दोघी कि जर कोणाला आपलं मानतात तर त्या व्यक्तीला त्या खूप जीव लावतात.

४. या मालिकेच्या प्रोमोज नंतर प्रेक्षकांकडून/ चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतोय?

– प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय. मालिकेचे प्रोमोज खूप उत्तम पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचले त्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता त्यांच्यामध्ये वाढली आहे. प्रोमोज पाहिल्यानंतर मालिकेमध्ये अजून किती मजा आणि धमाल पाहायला मिळणार याची आतुरता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि मालिका सुरु झाल्यावर देखील ते असंच भरभरून आमच्यावर प्रेम करतील अशी मला आशा आहे.

५. एकत्र कुटुंबपद्धती आजकाल खूप कमी पाहायला मिळते, तुला एकत्र कुटुंब आवडतं का?

– आताच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती खूपच कमी पाहायला मिळते. मी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढली नाही आहे पण मी जसं म्हंटल कि मला एकत्र कुटुंबपद्धत खूप आवडते. माझ्या लहानपणी आम्ही गणपतीसाठी सर्व नातेवाईक एकत्र गावी जायचो आणि मिळून तो सण साजरा करायचो. तेव्हा सगळे जण एकत्र मिळून सगळी तयारी करायचे, सगळ्यांचं जेवण एकत्र व्हायचं आणि जेवणानंतर सगळ्यांच्या गप्पा रंगायच्या. आजकाल एकत्र सण साजरं करणं जमत नाही पण तो काळ माझ्या नेहमी लक्षात राहील.

 ६. ऑफ कॅमेरा सेटवरचा काही किस्सा?

– प्रोमोज बघून प्रेक्षकांना कळलंच असेल कि किती मोठी फॅमिली आहे मालिकेत. आमचं आता हे कुटुंबच आहे. त्यामुळे तितकीच धमाल मस्ती देखील चालू असते. वेळ कसा निघून जातो हे कळत देखील नाही. आमच्या जेवण्याच्या वेळा देखील एकच आहेत, आम्ही एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतो. जसं मी आधी म्हंटल कि मी गणपती या सणाची वाट बघायची कारण त्यावेळी सगळं कुटुंब एकत्र यायचं. तो काळ या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात परत आला आहे असं मला वाटतं कारण इथे देखील मला हे एक मोठं कुटुंब भेटलं आहे जे माझ्या खूप जवळचं आणि आपलंस आहे.

७. प्रेक्षकांना काय आवाहन कराल?

– एकत्र कुटुंबपद्धती जी सध्या कुठेतरी विरळ होत चालली आहे असं असताना त्या कुटुंबपद्धतीचं दर्शन घडवणारी हि मालिका ३० ऑगस्ट पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेव्हा सगळ्यांनी नक्की पहा कारण तुम्हाला हि मालिका, त्यातील व्यक्तिरेखा या खूप आपल्याशा आणि आपल्यातल्याच एक वाटतील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.