जशास तसे‌ (?)

1

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)  


जशास तसं ही टर्म मला फारच हिशोबी वाटते. ज्यांनी जे केलं आणि जेवढं केलं, ते आणि तेवढंच आपण त्याच्यासाठी करावं या हिशोबात प्रेम कुठे आहे? हे म्हणजे एखाद्या लग्नात कोणी काय आहेर दिला हे बघून परतीचा आहेर ठरवल्या सारखं आहे.

“आई, त्या अनयला सांगून ठेव हं, आज त्यानी मला एक बुक्का मारला”
“त्यानी बुक्का मारला आणि तू रडत घरी आला ? अरे तू पण का नाही ठेवून दिला बुक्का ?”
“तुम्हीच सांगता ना कोणाला मारायचं नाही म्हणून!”
“मग काय कायम मार खाऊन घ्यायचा का ? परत त्यानी तुला मारलं तर तू दोन ठेवून दे, जशास तसं वागायला शिकलं पाहिजे”

साधारण प्रत्येक घरांमध्ये किमान एकदा तरी घडलेला हा प्रसंग! यावर आई म्हणून किंवा पालक म्हणून आपली प्रतिक्रिया दोन प्रकारची असू शकते,


. तू असं काय केलं ज्यामुळे त्याने तुला मारलं?


. त्यानी एक मारलं तर तू दोन ठेवून दे.

मुलांना जशास तसं वागायला शिकवताना फक्त वाईट गोष्टी घडण्याची आपण वाट बघतो का ? म्हणजे कोणी आपल्या मुलाची पेन्सिल हिसकावून घेतली तर उद्या तू त्याची पेन्सिल काढून घे, कुणी त्याचं दप्तर लपवलं तर पुढच्या वेळेला तू पण त्याचं दप्तर लपव, त्याने तुझा डब्यातलं खाल्लं तर तू त्याचा डबा खा,असे सल्ले मुलांना देताना आपण क्षणभर थांबून विचार करायला हवा कारण आज दिलेली “जशास तसे”ची शिकवण ही आजपुरती ,त्याप्रसंगा पुरती नसून ही त्या बालमनावर कायम कोरली जाणारी शिकवण असणार आहे ! मग मोठं झाल्यावर मुलांनी आपलं प्रासंगिक वागणं लक्षात ठेवून आपल्याला “जशास तशी” वागणूक द्यायला सुरुवात केली तर कदाचित पंचाईत होऊ शकते.

माझ्याकडे डे केअरला एक नवीन मुलगी आली आहे. दोन छोट्या छोट्या वेण्या, किंचीत अपरा फ्रॉक, गोबरे गोबरे गाल आणि सुस्पष्ट बोलणं असलेली ही चिमुकली परी माझ्या शाळेला “इंटरनॅशनल स्कूल” म्हणते. तिच्या आई बाबांनी तिला माझ्याकडे आणतांना ‘आपण इंटरनॅशनल स्कूल मध्ये चाललो आहे’ असं सांगितलं होतं म्हणूनच तिला आमची शाळा ‘इंटरनॅशनल स्कूल’ वाटते. हा तिचा आई वडिलांवरचा भाबडा विश्वास मला आवडला आणि हे जाणवलं की या वयातल्या सगळ्याच मुलांचा आपल्या आई-वडिलांवर खूप विश्वास असतो. ते जे सांगतील ते करायला मुलं तयार असतात म्हणूनच ‘मूल्याधारित शिक्षण’ देताना पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते.


तिच्या म्हणण्याप्रमाणे ती इंटरनॅशनल स्कूलमध्ये आली आणि तिला “इथे खूप आवडलं कारण इथल्या टीचर मारत नाहीत!”


“इथल्या टीचर मारत नाहीत म्हणजे ?” मी विचारलं.


“मी ट्युशनला जाते ना त्या टीचर खूप मारतात!” ती म्हणाली.


“हो?”


“हो ना, तुम्ही त्या टीचरला मारा ना, मी माझ्या फ्रेंड्सला पण घेऊन येते आणि ट्युशन टीचरला पण इकडे घेऊन येते मग आपण सगळे मिळून तिला मारू.”


“अगं, टीचरला असं मारू नये त्या मोठ्या असतात ना ! ”


“नाही, मम्मानी सांगितलंय की आपण तुझ्या टीचरला चांगलं ठोकून काढू ! ”


“नाही रे बेटा, आम्ही कसं तुम्हाला समजावून सांगतो, प्रेमाने सांगितलं की तुम्हाला कळतं ना ,तसंच आपण तुमच्या ट्युशन टीचरला पण प्रेमाने समजावून सांगू ! ”


मी तिचं मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला पण जशास तसेचा पगडा त्या मुलीवर इतका जास्त होता कि ती ‘ट्युशन टीचरला मारायचं’ या एकाच मुद्द्यावर अडून बसली होती.

खरंतर ज्या वेळेला त्या मुलीने ट्युशन टीचरची तक्रार आईकडे केली त्यावेळी आईने तिची योग्य समजूत घातली असती आणि ट्यूशन टीचरशी संवाद साधून ‘तुम्ही मुलांना का मारतात ?’ हा प्रश्न विचारला असता, तर टीचरने मारणं बंद केलं असतं पण त्या मुलीचं तात्पुरतं समाधान होण्यासाठी ‘तुला टीचरने मारलं ?मग आपण पण तुझ्या टीचरला मारू’ ही शिकवण आई-वडिलांवरच्या भाबड्या विश्वासाने स्वीकारली आणि आता ती मुलगी घटना घडण्याची अर्थात ट्यूशन टीचरला ठोकून काढण्याची वाट बघते आहे.

आपण अगदी नकळत आपल्या मुलांचं प्रोग्रामिंग करत असतो. जे इनपुट, ज्या सूचना आपण मुलांना देऊ, तेच आउटपुट, त्या सूचनांची प्रतिक्रिया आपल्याला त्यांच्या वागण्या-बोलण्यातून बघायला मिळणार आहे हे विसरू नका.

इसापनीती मधली कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट आपणही लहानपणी ऐकली. ज्यामध्ये कोल्हा करकोच्याला मेजवानीसाठी बोलावतो आणि ताटलीमध्ये जेवण वाढून त्याची फजिती करतो. त्याला चोचीने ताटलीतलं खाता येणार नाही हे माहित असूनही कोल्हा त्याची फजिती करून गंमत बघतो. मग करकोचा कोल्ह्याला जेवणाचं निमंत्रण देतो. कोल्हा जेवायला येतो तेव्हा करकोचा लांब मानेच्या सूरईमध्ये कोल्ह्याला खीर देतो. कोल्ह्याची जीभ सुरईमधून खीरीपर्यंत पोहोचत नाही. करकोचा कोल्ह्याला ‘जशास तसे’ उत्तर देतो. ही गोष्ट अशीच्या अशी सांगून मुलांना आपण काय मूल्य शिकवणार आहोत ? त्याऐवजी सुरईमधून कोल्ह्याला खीर  खाता येत नाही, हे लक्षात आल्यावर करकोचा ती खीर एका ताटलीत वाढतो आणि कोल्हा पोटभर खीर खातो. मग कोल्ह्याला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि “मी तुझी फजिती केली तरी तू मात्र मला प्रेमाने जेवू घातलं ? परत मी तुझी खिल्ली उडवणार नाही, फजिती करणार नाही” असं म्हणून तो करकोच्याची माफी मागतो. यानंतर कोल्ह्याची आणि करकोच्याची अगदी पक्की मैत्री झाली. अशी गोष्ट जर मुलांना सांगितली तर ‘झालं गेलं सोडून देऊन आपला चांगुलपणा कायम ठेवून नाती टिकवता येतील’ ही शिकवण आपण मुलांना देऊ शकतो.

नुसतंच जशास तसे वागा हे शिकवलं तर आज कोल्हा करकोच्याची फजिती करेल, उद्या करकोचा कोल्ह्याची फजिती करेल, मग परवा परत कोल्हा करकोच्याची खोडी काढेल आणि तेरवा करकोचा कोल्ह्याच्या खोडीचे उत्तर देईल आणि हे कधीच न संपणारं दुष्टचक्र फिरतच राहील. यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपणच मुलांना दाखवू शकतो. कोणी आपल्याशी वाईट वागलं तरी आपण चांगलं वागून पुढे जाऊ शकतो आणि आपण तेच करायला हवं हे मुलांना शिकवा.

कित्येकदा पळता पळता मुल पडतं आणि आपण जाऊन ज्या जागेवर मुल पडलं त्या जागेला लाथ मारून येतो किंवा एखाद्या भिंतीवर खेळता खेळता मुलांचं डोक आपटत. एका हाताने टेंगुळ येऊ नये म्हणून डोकं दाबतानाच दुसऱ्या हाताने आपण भिंतीला, “वा गं भिंती, लागलं ना माझ्या बाळाला ?’’ असं म्हणून रागावतो. आपण नक्की कुणाला फसवतो ? दगड मातीच्या रस्त्याला, सिमेंटच्या भिंतीला की स्वतःच्या मुलांना ?


या आपल्या वागण्यातून ‘माझी चूक झाली पण त्याला कारण तो रस्ता होता, ती भिंत होती. ते नसते तर मी चुकलो नसतो. म्हणजेच माझ्या चुकीला मी सोडून इतर सगळे जबाबदार आहेत’ हे आपण मुलांना शिकवतो आणि म्हणून मुलं स्वतःची चूक मान्य करायला शिकत नाहीत. मी निट पळत नव्हतो म्हणून मी पडलो,  धावतांना माझं लक्ष नव्हतं म्हणून मी भिंतीवर आपटलो, याची जाणीव मुलांना झाली तर पुढच्या वेळेला कुठलीही कृती करताना मुलं अधिक सावध होतील, अधिक जागरूकतेने वागतील. “तुला इजा होते आहे याचा अर्थ तू कुठेतरी निष्काळजी पणाने वागत आहेस” हे मुलांना समजावून सांगायला हवंय.

बरं जशास तसं शिकवतांना काल तुझ्या मैत्रिणीने तुला डब्यातली पुरणपोळी दिली, मग आज तुझ्या डब्यात काजू बदाम दिलेत त्यातले निम्मे मैत्रिणीला पण दे असं आपण शिकवतो का? काल वेदिकाच्या बाबांनी तुम्हाला कारने शाळेत सोडलं, मग आज आपले बाबा वेदिकाला शाळेत सोडतील अस आपल्या लेकीला सांगतो का ? मी घरी नसताना शेजारच्या आजीने तुला गरम गरम वरण भात दिला होता ना मग घे बरं आज ही गरम गरम खिचडी त्याना नेऊन दे असा विचार आपण करतो का ?


“जशास तसे हे फक्त खट से खट” अशा प्रसंगांमध्ये आपण वापरतो जे एक व्यक्ती म्हणून मला चुकीचं वाटतं. जशास तसं ही टर्म मला फारच हिशोबी वाटते. ज्यांनी जे केलं आणि जेवढं केलं, ते आणि तेवढंच आपण त्याच्यासाठी करावं या हिशोबात प्रेम कुठे आहे? हे म्हणजे एखाद्या लग्नात कोणी काय आहेर दिला हे बघून परतीचा आहेर ठरवल्या सारखं आहे.


प्रेम, आदर, विश्वास, मूल्य, नीतिमत्ता यात कधीच हिशोब नसतो कारण या गोष्टी मोजून मापून करण्याच्या नाहीतच मुळी ! प्रेम निस्सीम असतं म्हणजे त्याला सीमा नसते. आदराला बंधन नसतं. विश्वासाला परिसीमा नसते. मूल्य आणि नीतिमत्तेला मरण नसतं. मग मुळातच ज्या गोष्टींना जगरहाटीचा हिशोब मान्य नाही त्या गोष्टी जशास तसे सारख्या हिशोबी संकल्पनेत अडकवण्याची काय गरज आहे ?


आपल्या मुलांना जशास तसे या शब्दांपासून लांब ठेवा. “मी आहे, मी तुझी मदत करू शकते का ? मला सांग मी तुझं ऐकणार आहे.” अशा वाक्यांनी मुलांचा विश्वास जिंकल्यानंतर मुलं त्यांची गाऱ्हाणी तुम्हाला अगदी सहज सांगतील, त्यांना न थांबता मनमोकळे बोलू द्या आणि मग त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यावर ‘योग्य’ ती प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया ही मुलांसाठी कोर्टाच्या वॉरंटसारखी असते. जसं एकदा तो वॉरंट निघाला कि थांबत नाही, तसंच एकदा तुम्ही मुलांना जे सांगितलं ते पूर्ण केल्याशिवाय मुलं उसंत घेत नाहीत.


आता मी वाट बघते आहे ते डे केअर मध्ये नव्याने आलेल्या मुलीच्या आईने “आपण ट्युशन टीचरला नको मारुयात, त्यापेक्षा त्यांना आपण समजावुन सांगूया !” हे त्या मुलीला सांगण्याची, कारण जोवर त्या मुलीचे पालक मुलीला समजावणार नाहीत तोपर्यंत तिच्या लेखी निघालेला कोर्टाचा वॉरंट रद्द होणार नाही. हे लवकरच घडेल अशी अपेक्षा मनात ठेवून आजच्या लेखाला पूर्णविराम देते आहे.


तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)


आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. विवेक खैरनार says

    खूप छान लिहलय. शिकवण्याची सुरूवात अगोदर घरापासून होते . आई वडीलघरातून मुलांना जो विचार देतात तसाच विचार मुल करतात.

कॉपी करू नका.