नाशिक– नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील नाईस परिसरात प्लॉट नंबर ७१ मधील ललित हायड्रोलिक्स नावाची कंपनीत अचानक भीषण स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली आहे. जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.या कंपनीत अचानक सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की कंपनीतून आगीचे लोळ बाहेर येत होते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनूसार या कंपनीत अचानक सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास नायट्रोजन टाकीचा व्हॉल्व्ह उडाल्याने स्फोट झाला. एकूण ११ कामगार या कंपनीत काम करत होते. दरम्यान, महापालिकेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.जखमी कामगारांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. चंद्रकांत पुंजराम मुंशे, सुरज टेकाळे, लखन, कृष्णा मुरारी, रोशन दास व देविदास पवार अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमी ७० ते ८० टक्के भाजल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जखमी हे ४० ते ४५ वर्ष वयोगटातील असल्याचे समजते आहे.