नव्या वर्षात कोरोना मुक्तीचा करूया संकल्प – छगन भुजबळ
मुंबई – गेल्या २ वर्षांपासून देशावर आणि राज्यावर कोरोनाचे सावट कायम असून कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंट ने पुन्हा एकदा जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नव वर्षाचे स्वागत करतांना नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कुठल्याही ठिकाणी गर्दी न करता आपल्या घरातूनच स्वागत करावे. सन २०२२ हे नवे वर्ष आपणा सर्वांना सुख, समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे आणि आरोग्याचे जावो अशा शुभेच्छा. तसेच नव्या वर्षात कोरोना पासून मुक्ती मिळण्याचा संकल्प करूया असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
शुभेच्छा संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नवीन वर्षाचा उत्सव आनंद आणि उत्साहाचा उत्सव आहे. नवीन वर्ष आपल्याला केवळ पुढे जाण्याची प्रेरणाच देत नाही तर आपल्यात सकारात्मकतेची भावना देखील वाढवते. यासह, आपण सर्वांनी जुन्या सर्व वाईट गोष्टी आणि मागील काळ विसरून आपले भविष्य सुधारण्याचा विचार केला पाहिजे याची शिकवण आपल्याला देते, तसेच जुन्या चुका आणि अपयशापासून धडा घेतला पाहिजे आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गेल्या दोन वर्षांपासून आपल्यावर कोरोनाचे संकट घोंगावत असून या संकटाचा सामना करत असतांना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहे. येणाऱ्या काळात हे संकट पूर्ण पुणे दूर करण्यासाठी शासन व प्रशासनासोबत नागरिकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. आपण कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाच्या या संकटाला हद्दपार करण्याचा संकल्प करूया. येणारे नवीन वर्ष आपण सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.