महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स : उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण राज्यात बिनविरोध निवडणूक

तीन चतुर्थांश बहुमतासह ललित गांधी यांचे निर्विवाद वर्चस्व

0

मुंबई – संपूर्ण राज्याच्या व्यापार-उद्योग क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या व राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून 95 वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या वार्षिक निवडणूक प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष व नाशिक जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिल 21 जागा वगळता संपूर्ण राज्यातील निवडणुका बिनविरोध झाल्या असून, चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबर वर  निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या सहा जागा व गव्हर्निंग कौन्सिल च्या 92 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती, या निवडणूक प्रक्रिया मधील अर्ज माघारी घेण्याच्या वाढीव मुदतीनंतर आज निवडणूक अधिकारी सागर नागरे यांनी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची व निवडणूक होणार्‍या विभागातील वैध उमेदवारांची यादी जाहीर केली.

शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या महाराष्ट्र चेंबर चे 40 वे अध्यक्ष म्हणून ललित गांधी (कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड झाली असून, वरिष्ठ उपाध्यक्षपदी उमेश दाशरथी (औरंगाबाद) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

व्यवस्थापन समितीतील उपाध्यक्ष पदासाठी मुंबई (1) विभागातून करुणाकर शेट्टी, मुंबई (2) विभागातून शुभांगी तिरोडकर, पश्‍चिम महाराष्ट्र विभागातून रवींद्र मानगावे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या असून, उत्तर महाराष्ट्र विभागातील एक उपाध्यक्ष व नाशिक जिल्ह्याच्या 21 जागा वगळता गव्हर्निंग कौन्सिलच्या उर्वरित 71 जागी उमेदवारांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत.

कोल्हापूर विभागातून गव्हर्निंग कौन्सिलवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये वस्त्रोद्योग  क्षेत्रात गेले अनेक वर्षे प्रचंड कार्य उभे केलेले माजी वस्त्रोद्योग मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश  आवाडे, इंजिनिअरिंग उत्पादन क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले उद्योग जगतातून निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव (कोल्हापूर) यांचाही समावेश आहे. जालना विभागातून गव्हर्निंग कौन्सिलवर निवड झालेल्या उमेदवारांमध्ये कालिका स्टील चे घनश्याम गोयल, मेटारोल स्टीलचे द्वारकाप्रसाद सोनी यांचा समावेश आहे. ललित गांधी यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून गव्हर्निंग कौन्सिलवर विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड केली असून, गव्हर्निंग कौन्सिलची रचना सर्वसमावेशक अशा पद्धतीने करण्यात यश मिळवले आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या 95 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या आतापर्यंतच्या व सध्या हयात असलेल्या अध्यक्षांपैकी एखादा अपवाद वगळता सर्वच माजी  अध्यक्षांनी एकत्रित येऊन ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या ‘शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनल’ ला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला, ही या निवडणुकीतील एक महत्त्वपूर्ण घटना ठरली आहे.

निर्विवाद बहुमतासह अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या ललित गांधी यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्याच्या व्यापार-उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणुन काम करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर चे मुख्य  काम हे व्यापार उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करण्याचे आहे. त्यामुळे अशा संस्था निवडणुका बिनविरोधच झाल्या पाहिजेत. परंतु नाशिक विभागात हे घडु शकले नाही व चेंबर ला या विभागासाठीची निवडणुक प्रक्रिया राबविणे भाग पडले आहे. तथापि तीन चतुर्थांश बहुमतासह संपुर्ण राज्यातील सभासदांनी दिलेले भक्कम पाठबळ याच्या जोरावर महाराष्ट्र चेंबर राज्यातील छोट्यात छोट्या उद्योजकासह सर्वच घटकांच्या विकासासाठी अविरत कार्यरत राहुन व महाराष्ट्राला देशात सर्वोच्च स्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.