नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर आज मोठे यश आले आहे.वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या महिन्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय.उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी अगोदर मोदी सरकारची हि मोठी घोषणा आहे. देशभरातून कृषी कायद्याला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मोदी सरकारनी माघार घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात झाली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले. सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. या, नवी सुरुवात करुया,असं म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.
आपल्या संबोधनाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गुरुपर्वाच्या पवित्र निमित्तानं शुभेच्छा दिल्या. भारत – पाकिस्तानच्या सीमेवरील तब्बल दीड वर्षांनंतर कर्तारपूर साहिब कॉरिडोर उघडणं हे देखील सुखद असल्याचं त्यांनी म्हटलं.