

पुणे ,दि ३ जानेवारी २०२६– Maharashtra Municipal Elections राज्यात सध्या सत्तेत एकत्र असलेले भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र परस्परांवर उघडपणे टीकेची झोड उठवत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पिंपरी–चिंचवड महापालिकेवरून सुरू झालेला वाद आता थेट इशारे आणि राजकीय धमक्यांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी–चिंचवड महापालिकेत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून भाजपने या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आक्रमक भूमिका घेतली. “आम्ही आरोप करायला सुरुवात केली तर त्यांचीच अडचण होईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. अजित पवार यांनी केलेली विधाने ही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली राजकीय वक्तव्ये असल्याचे सांगत चव्हाण यांनी त्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(Maharashtra Municipal Elections)पिंपरी–चिंचवड महापालिका ही एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यांच्या मते, भाजपच्या कार्यकाळात महापालिका कर्जबाजारी झाली असून शहराच्या आर्थिक शिस्तीला मोठा फटका बसला. याच मुद्द्यावरून अजित पवार यांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, अजित पवार हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर आरोप करत आहेत, याची त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. “आरोप–प्रत्यारोप किती आणि कसे करायचे, याची मर्यादा त्यांनी आधी ठरवावी. आम्ही जर सविस्तर बोलायला लागलो, तर त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल,” असे म्हणत चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
चव्हाण पुढे म्हणाले की, येणारी महापालिका निवडणूक ही केवळ आरोपांच्या राजकारणापुरती मर्यादित नसून, कोण अधिक चांगल्या नागरी सुविधा देऊ शकते आणि विकसित पुणे–पिंपरी-चिंचवडसाठी कोणते नेतृत्व योग्य आहे, हे ठरवणारी ठरेल. भाजपने शहरात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना “पिंपरी–चिंचवडमध्ये भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही” तसेच “शहरात लुटारूंची टोळी दिवसा ढवळ्या फिरते” असे कठोर शब्द वापरले होते. या टीकेलाही चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. “अशा भाषेचा वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या वादात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कथित 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप. यासंदर्भात विचारले असता रवींद्र चव्हाण यांनी थेट उत्तर देणे टाळले. “काल अजित पवार यांनी जे आरोप केले, त्यांना जे उत्तर द्यायचे होते ते आम्ही दिले आहे,” असे सांगत त्यांनी पुढील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
सत्तेत सहभागी असतानाही निवडणुकीच्या तोंडावर घटक पक्षांमध्ये वाढत चाललेली ही शब्दयुद्धाची धार महायुतीतील अंतर्गत तणाव स्पष्टपणे दाखवून देते. महापालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष आपापली ताकद स्वतंत्रपणे दाखवण्याच्या तयारीत असून, याचा थेट परिणाम राज्याच्या राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात हे आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होणार की सामंजस्याची भूमिका घेतली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

