महाराष्ट्रावर अवकाळीचं सावट! वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा

IMD कडून येलो-ऑरेंज अलर्ट जारी; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण,

0

मुंबई, दि. ३१ मार्च २०२६ : Maharashtra Rain Alert महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे मोठे संकट घोंगावत असून, राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यामुळे विशेषतः शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, ( Maharashtra Rain Alert) राज्यात अचानक हवामान बदल घडवून आणणारी प्रणाली सक्रिय झाली आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूर येथील हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांमध्ये गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा धोका अधिक असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र आता या अवकाळी पावसामुळे तापमानात घट होणार असली, तरी त्याचवेळी शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. विशेषतः शिवनेरी परिसरातील प्रसिद्ध हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर भाजीपाला, कांदा आणि बटाटा पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.

भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे गारांच्या जोरदार सरींमुळे यात्रेसाठी उभारलेला मंडप कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सात घरांचे नुकसान झाले असून, अनेक घरांचे पत्रे उडाले आणि भिंती कोसळल्याने गावकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. हवामान विभागानेही नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देत पुढील काही दिवस हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!