विनायक रानडे यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा ग्रंथपुरस्कार जाहीर 

प्रा.अनिरुद्ध जाधव,डॉ. केदार काळवणे,रमेश रावळकर,डॉ. सतीश साळुंके,प्रा. मिलिंद कसबे, २०२२ च्या ग्रंथपुरस्काराचे मानकरी

0

औरंगाबाद – मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध होणा-या विविध वाङ्मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेले २०२२ चे ग्रंथपुरस्कार आज मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले.

१) नरहर कुरुंदकर वाङ्मयपुरस्कार: रुपये ३,०००/- हा पुरस्कार फक्त मराठवाड्यातील कवी, लेखक, समीक्षक, अभ्यासक यांच्या कोणत्याही वाङ्मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथाला देण्यात येत असतो. २०२२ च्या पुरस्कारासाठी प्रा. अनिरुद्ध जाधव, लातूर यांच्या ‘मनासी संवाद’ ह्या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे. श्री. जाधव हे लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे दीर्घकाळ उपप्राचार्य आणि काही काळ प्राचार्य होते. आपल्या महाविद्यालयात त्यांनी अनेक प्रयोग केले असून महाराष्ट्रात लौकिक पात्र ठरलेला ‘लातूर पॅटर्न’ ही शिक्षणक्षेत्राला त्यांचीच देण आहे. मनासी संवाद हे आत्मचरित्र त्या दृष्टीने मुद्दाम वाचावे असे आहे.

२) प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मयपुरस्कार: रुपये ३,०००/- हा पुरस्कार मराठीतील समीक्षा किंवा वैचारिक लेखनासाठी देण्यात येत असतो. यंदाच्या २०२२ च्या पुरस्कारासाठी डॉ. केदार काळवणे, कळंब यांच्या ‘कल आणि कस’ या समीक्षाग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. काळवणे हे कळंब येथे मराठीचे प्राध्यापक असून नव्या पिढीतील मराठी वाङ्मयाचे गंभीर अभ्यासक आहेत. श्री. काळवणे हे वक्ते, लेखक, स्तंभलेखक व संपादक म्हणून परिचित आहेत. या ग्रंथाशिवाय त्यांचा ग्रामीण साहित्य : संकल्पना आणि समीक्षा’ हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे.

३) के. कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कार: रुपये ३,०००/- मराठीतील कविता लेखनासाठी दिला जाणारा हा पुरस्कार वर्षभरात प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांतून निवड करून एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला देण्यात येत असतो. या वर्षी या पुरस्कारासाठी श्रीमती कविता मुरुमकर, सोलापूर यांच्या ‘उसवायचाय तुझा पाषाण’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. श्रीमती कविता मुरुमकर ह्या सोलापूरला मराठीच्या प्राध्यापक असून यापूर्वी या संग्रहाला अन्य संस्थांचेही पुरस्कार मिळालेले आहेत.

४) बी. रघुनाथ कथा / कादंबरी पुरस्कार ; रुपये ३,०००/- मराठीतील उत्कृष्ट कथासंग्रहाला किंवा उत्कृष्ट कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षी श्री. रमेश रावळकर, औरंगाबाद यांच्या ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. श्री. रावळकर हे अजिंठा येथे मराठीचे प्राध्यापक असून कवी म्हणूनही सर्वांना ज्ञात आहेत. ‘टिश्यू पेपर’ ही त्यांची पहिलीच कादंबरी असून तीत ‘बारबाला सारख्या दुर्लक्षित विषयावर रावळकरांनी हात घातला आहे.

५) कुमार देशमुख नाट्यपुरस्कार : रुपये ३,०००/- मराठीतील उत्कृष्ट नाटकाला किंवा नाट्यसमीक्षेला हा पुरस्कार देण्यात येत असतो. यंदा ह्या पुरस्कारासाठी डॉ. सतीश साळुंके, बीड यांच्या
‘मराठवाड्यातील नाट्यपरंपरा’ या बृद संशोधनग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. सतीश साळुंके बीड येथे शिक्षक मुख्याध्यापक होते. ते मराठवाड्यातील नाट्य चळवळीत कार्यरत असून बाल रंगभूमीशी जोडलेले आहेत. राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी सादर केलेल्या नाटकांना विविध पारितोषिके मिळालेली असून नाट्यचळवळीसोबतच ते सतत संशोधनपर लेखनात गढलेले असतात. ‘मराठवाड्यातील नाट्यपरंपरा’ या त्यांच्या ग्रंथात साळुंक्यांनी मराठवाड्याच्या रंगभूमीचा समग्र इतिहास लिहिला असून या ग्रंथाने अभ्यासकांची मोठीच सोय झालेली आहे.

६) नरेंद्र मोहरीर वाङ्मयपुरस्कार: रुपये ५,०००/- हा पुरस्कार कला, सौंदर्यशास्त्र, इतिहास आणि संशोधन यातील उत्कृष्ट ग्रंथास देण्यात येते असतो. दोन वर्षातून एकदा दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी मागील दोन वर्षांतील ग्रंथांचा विचार केला जातो. २०२२ चा हा पुरस्कार नारायणगावचे तरुण लोककला अभ्यासक प्रा. मिलिंद कसबे यांच्या ‘साहित्य आणि लोककला : मार्क्स आंबेडकरी दिशा’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. मिलिंद कसबे हे नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून सामाजिक चळवळीत ते सक्रीय असून वंचितांच्या व लोककलावंतांच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असतात.

७) रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार: रुपये २,०००/- मराठी पुस्तक व्यवहारात हयातभर लक्षणीय स्वरूपाचे कार्य करणाच्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येत असतो. २०२२ च्या पुरस्कारासाठी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचक चळवळीशी संबंधित अनोखे प्रयोग करणारे संचालक श्री. विनायक रानडे यांची २०२२ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री. रानडे यांनी, ‘ग्रंथ तुमच्या दारी ही चळवळ जगभर रुजविली असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू, कर्नाटक इतकेच नव्हे तर भारताबाहेर दुबई, नेदरलँड, अटलांटा, फिनलँड, मॉरिशस, ओमान, मस्कत, श्रीलंका, सिंगापूर, लंडन, अमेरिकेत सॅनफ्रांसिस्को, वाशिंग्टन डी. सी., बे एरिया येथील मराठी वाचकांपर्यंत मराठी पुस्तके ते पोचवत असतात व एकाकडून दुसऱ्याकडे अशी फिरवित असतात.

मराठवाडा साहित्य परिषदेने प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथनिवड केली असून या समितीत प्रा. शेषराव मोहिते यांच्याशिवाय कवी बालाजी मदन इंगळे, प्रमोद कमलाकर माने आणि डॉ. सुरेंद्र रावसाहेब पाटील हे अन्य तीन सदस्य होते. रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्काराची निवड ज्येष्ठ प्रकाशक श्री. के. एस. अतकरे, डॉ. दादा गोरे आणि डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्या समितीने केली आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज हे पुरस्कार जाहीर केले. हे पुरस्कार औरंगाबाद येथे रविवार ३ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी देण्यात येतील असेही श्री. ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे व कोषाध्यक्ष श्री. कुंडलिक अतकरे आणि डॉ. रामचंद्र काळुंखे आणि डॉ. कैलास इंगळे हे उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.