पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांचा नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यानंतर आज पुण्यात आगमन झाले त्यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे.मनसेच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला ‘रामराम’ केला. रुपाली पाटील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार अशी चर्चा असतांनाच त्यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रुपाली पाटलांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली आहे.युवासेनेच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या मुळे रुपाली पाटील आता शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे.
रुपाली पाटील यांनी मनसेतील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज होत्या. त्यामुळे पाटील मनसेला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. यापुढेही आपले आशीर्वाद व राज ठाकरे हे नाव ह्रदयात कायम कोरलेले राहिल, असे राजीनामा पत्रात रुपाली पाटील ठोंबरे यांनी नमूद केले आहे.
माझ्या वैयक्तिक कारणामुळे दिला राजीनामा – रुपाली पाटील ठोंबरे
आपण वैयक्तिक कारणामुळे दिला राजीनामा असून अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे निश्चित केले नाही राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही म्हटलं आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.“मी राजीनामा देताना वरिष्ठांना सांगितले की आहे की राज ठाकरे माझे दैवत होते आणि राहतील. पण मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर मी पुढे काय भूमिका घेणार आहे लवकर जाहीर करेल.
काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यानंतर वरुण देसाई यांच्यासोबतही माझी भेट झाली. ती सदिच्छा भेट होती. त्यानंतर मी राजीनामा दिली आहे,” असे रुपाली पाटील म्हणाल्या.
‘जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे’ मनसे नगरसेवक वसंत मोरेंचे ट्विट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर होतेय. वसंत मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत स्वतः व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी ‘जब हम दो साथ खडे तो सबसे बडे , अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे म्हटले आहे.