नाशिक दि, १० नोव्हेंबर २०२३ – महारेरा हा नवा प्रभावी कायदा असून दोन्ही बाजूंना अडचणी येण्यापूर्वी दक्षता घेतली जाते. महाराष्ट्र महारेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आघाडीवर आहे. ग्राहकांनी वास्तू खरेदी करतांना सुरक्षित गुंतवणूक करावी हा महारेराचा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येकाने डोळे उघडून प्रमोटर्स, बिल्डर्सची काळजीपूर्वक माहिती घ्यावी व जनजागृती व्हावी असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे महारेरा सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी केले. नरेडको नाशिक या संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नरेडको – नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंटची काल ताज हॉटेलमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. डॉ. वसंत प्रभू पुढे म्हणाले, महारेराला नरेडको, क्रेडाई यांचा प्रतिसाद मिळतो व कायमच सहकार्य असते. आम्ही सुसंवादातून कार्यवाही करतो. महाराष्ट्रात महारेरा अंतर्गत ४३ हजार जणांनी नोंदणी केली असून त्यात नाशिकमध्ये १० टक्के म्हणजे ४१०० पेक्षा अधिक नोंदणी झालेली आहे. रेडफ्लॅग प्रकल्प केवळ ५ असून गेल्या ५ वर्षात केवळ ३७ तक्रारी दाखल झाल्या. त्यांचाही वेगवान निपटारा केला जातो. सर्वाधिक कमी तक्रारी आहेत याचाच अर्थ रिअल इस्टेट क्षेत्रात नाशिकला सचोटीचा व्यवहार होतो. असे त्यांनी नमूद केले.
यावेळी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. उपाध्यक्ष मनोज टिबडेवाल, ललित रुंग्टा, सचिव सुनील गवादे , खजिनदार अमित रोहमारे समन्वयक जयेश ठक्कर, सह समन्वयक शंतनू देशपांडे, कार्यकारिणी सदस्य अविनाश शिरोडे, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील,भूषण महाजन उपस्थित होते. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या होमेथॉन प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी भाग्यवान विजेत्यांची सोडत काढण्यात आली. त्यात जनजागृतीसाठी महारेराचा विशेष स्टॉल असेल. पर्यावरण मंजुरी व प्रकल्पांमुळे हवेची घसरणारी गुणवत्ता याबाबत शहर विकास विभागाने काढलेल्या परिपत्रकाविषयी मार्गदर्शन पर्यावरण तज्ज्ञ, कार्यकारी संचालक रोहन देसाई, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले.