नाशिक – युवा सप्ताह निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमातील मान्यवरांच्या भेटी प्रसंगी ओबीसी नेते आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील वजनदार नेते छगन भुजबळ यांना जवळ घेत “सबसे जवान तो आप हो!” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भुजबळांसोबत हास्यविनोद केल्याने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला असला तरी राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणाऱ्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात आगामी राजकारणाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.
राज्यातील मराठा – ओबीसी आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या बचावासाठी मैदानात उघडपणे उतरलेल्या भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात वेगळे महत्व प्राप्त झाले आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच की काय पंतप्रधानांनी भुजबळांना चूचकारले तर नाही ना? तसाही भुजबळ आणि मोदी यांच्यातील जिव्हाळा तसा नवीन नाही. मागील काही वर्षापूर्वी देखील एका कार्यक्रमात देखील बुद्धिबल और भुजबल का मेल जमाव..! असे सूचक आवाहन केले होते. मात्र त्यावेळी थोरल्या पवारांच्या प्रेमापोटी भुजबळ यांनी निष्ठा कायम ठेवल्या होत्या. ओबीसींचे देशातील महत्व लक्षात घेता शिर्सस्थ नेते म्हणून भुजबळांच्या भूमिकेकडे राजकीय तज्ञांचे लक्ष लागून आहे.