नाशिकच्या हवाई वाहतुकीला मिळणार जागतिक गती : प्रवासी क्षमता तिपटीने वाढणार

नाशिक विमानतळ विस्तारीकरणाला कुंभमेळा प्राधिकरणाचा हिरवा कंदील !

0

नाशिक, दि. 19 नोव्हेंबर 2025 Nashik Airport Expansion आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये होत असलेल्या व्यापक तयारीत आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळाच्या भव्य विस्तारीकरणाला प्रशासकीय मान्यता दिली असून, हे काम मार्च 2027 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विस्तारीकरण आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण), एचएएलचे वरीष्ठ अधिकारी आदी सहभागी झाले होते.

🔹 ५५६ कोटींचा प्रकल्प: नवीन टर्मिनल, ॲप्रन, पार्किंग आणि जागतिक दर्जाच्या सुविधा(Nashik Airport Expansion)

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून संचालित ओझर विमानतळावर खालील सुविधा उभारल्या जाणार आहेत:

17,800 चौ.मी. क्षेत्रातील नवीन इंटिग्रेटेड प्रवासी टर्मिनल

1,15,220 चौ.मी. क्षेत्रातील अत्याधुनिक ॲप्रन

25,000 चौ.मी. पार्किंग परिसर

एरो ब्रिज, पॅसेंजर बोर्डिंग गेट्स, अत्याधुनिक स्कॅनर उपकरणे

प्रवासी चढ-उतार व्यवस्थेमध्ये सुधारणा

विमानतळ सुरक्षेसाठी उंचीवरील तंत्रज्ञान अवलंब

या सगळ्या कामांसाठी एकूण ५५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.राज्य शासन व HAL यांच्यातील सामंजस्य करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच DGCA, BCAS आणि Aerodrome Emergency Committee यांच्या मंजुरी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठीही निर्देश देण्यात आले.

🔹 कुंभमेळ्यासाठी वाढणारी हवाई मागणी विस्तारीकरण ठरणार अत्यंत महत्त्वाचे

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून लाखो भाविकांची आणि मान्यवरांची आगमन-निर्गमन व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी विमानतळ विस्तारीकरण अत्यंत आवश्यक मानले जात आहे.सध्या नाशिक विमानतळावरून दिल्ल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर अशा महानगरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच नाईट लँडिंगची सुविधा आधीच उपलब्ध आहे.

🔹 क्षमता तिपटीने वाढणार: ताशी 300 वरून 1000 प्रवाशी!

सध्या ओझर विमानतळावर ताशी 300 प्रवाशांची क्षमता आहे. विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता ताशी 1000 प्रवाशांपर्यंत वाढणार असून हे नाशिकच्या हवाई वाहतुकीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

प्रवासी सुविधा आधुनिक

विमान पार्किंग वाढणार

लगेज लोडिंग-अनलोडिंग वेगवान

सुरक्षा व्यवस्था अत्याधिक मजबूत

या सर्व सुधारणांमुळे नाशिकला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

🔹 जिल्ह्यातील विकास आणि रोजगाराला नवी चालना

विमानतळ विस्तारीकरणामुळे:पर्यटन क्षेत्राला गती,गुंतवणूक वाढ,स्थानिक रोजगारनिर्मिती,औद्योगिक क्षेत्रात वाढ,कुंभमेळ्यातील व्यवस्थापन अधिक सुकर असा बहुआयामी फायदा होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!