Nashik : सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार ना. नितीन गडकरी यांना प्रदान
नाशिक जिल्ह्यातून एक लाख कोटींची कृषी निर्यात शक्य :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नाशिक – नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने शेतमालाचा खर्च वाचेल. तसेच ड्रायपोर्टमधून थेट बांगलादेशमध्ये शेतमाल जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक वाचनालय नाशिक(सावाना)तर्फे दिल्लीत गुरुवारी (दि.10) केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाईन पध्दतीने हा सोहळा पार पडला. शाल, स्मृतीचिन्ह, पुणेरी पगडी, ५० हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. खासदार सुभाष भामरे यांनी गडकरी यांना पुणेरी पगडी परिधान केली. तर खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंत्री गडकरी यांना येवल्याची शाल दिली. केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह भेट दिले. त्यानंतर खासदार गोडसे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी व्हिडीओकिल्पच्या माध्यमातून मंत्री नितीन गडकरींचा परिचय देण्यात आला.
केंद्रिय मंत्री गडकरी म्हणाले की, पुरस्कार दिल्याबद्दल सावानाचे मनापासून आभारी आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी नाशिकला येणार होतो. पण, कोरोना संकंटामुळे इच्छा असतानाही येता आले नाही. पुरस्कार व हार देणे हा न आवडणारा विषय आहे. ४० वर्षांत मंत्री, खासदार असताना स्वागताला कोणीही आलेले आवडले नाही. सत्कार कार्यक्रमाला जात नाही. आयुष्यात दोनदाच मनापासून हार खरेदी केले आहेत. पहिला हार अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरा हार १९६३-६४ साली लता मंगेशकर यांच्यासाठी हार घेतला होता. त्या नागपूरला आल्या असताना त्यांचे गाणं लोकांनी उधळले होते. आता नागपूरला येणार नाही, अशी लता मंगेशकर यांनी प्रतिज्ञा घेतली होती. त्यांना नागपूरला आणत त्यांचा मोठा नागरी सत्कार केला. त्यासाठी स्वत: मोठा गुलाबाचा हार घेतला होता.
सत्कार व सन्मान हे होत असतात. पण सावानाची प्रथा व परंपरा वेगळी आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक नाशिकमध्ये अभ्यासिका आहेत. नाशिक सांस्कृतिकनगरी आहे. सावानाने सांस्कृतिक चळवळ अखंडपणे चालविली आहे. दिग्गजांनी नाशिकला समृद्ध केले आहे. मंत्री डॉ.पवार व खासदार गोडसे यांनी अभ्यास करुन एक पुरस्कार सुरु करावा. नाशिक द्राक्ष व कांदा निर्यात करणार्या नाशिक विभागातील २५ शेतकर्यांचा नागरी सत्कार करावा. कृषी क्षेत्रातले कौशल्य, तंत्रज्ञान व ज्ञान हे महाराष्ट्रात नाशिकमधून फैलावते.
नितीन गडकरी हे फक्त मंत्री नाही तर अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या संसदीय कारकिर्दीत त्यांनी कल्पकपणे आणि संशोधन करुन अनेक उपक्रम सुरु केले आणि ते पूर्ण करून देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे देशातील दळणवळण वाढून देश जोडला गेला आहे. अशा संसद सदस्यांना पुरस्कार ही कामाची पावती आहे असे विचार राज्यसभा सदस्य खा विनय सहस्रबुद्धे यांनी नवी दिल्ली येथे माधवराव लिमये कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमास आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, खा डॉ सुभाष भामरे, खा रक्षा खडसे, भाजपा नेते सुरेश बाबा पाटील, सुश्रुत ग्रुपचे प्रणव वसंतराव पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
सार्वजनिक वाचनालय आणि माझा जुना ऋणानुबंध असून वाचनालयाने माधवराव लिमये कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार देऊन गौरव केल्याने मला आनंद झाला आहे. अनेक वर्षापासून मी सत्काराचा आणि पुरस्कारांचा स्वीकार करत नाही. मात्र वाचनालयाने माझ्या कामाची दखल घेतल्याने त्याचा मी आदरपूर्वक सन्मान करीत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी नाशिकला येणार होतो. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोना आणि अन्य अडचणी वाढत गेल्याने येऊ शकलो नाही. मात्र पुढील तीन महिन्यात मी नाशिक शहरात येऊन विविध लक्षवेधी प्रकल्पांचे भूमिपूजन करीन असे पुरस्कार समारंभात देशाचे रस्ते बांधणी व वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी सांगितले.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले नाशिक हे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक शहर आहे. नाशिक शहरातील काही योजनांचा मी चहाता आहे। नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकांची पाहणी करण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना नाशिकला पाठविले होते. त्यातून नागपूरमध्ये आधुनिक आणि सुसज्ज अभ्यासिका उभी करू शकलो. नाशिक हे शेती उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कांदा आणि द्राक्ष निर्यात करणारे नाशिकचे शेतकरी तापमान बदलामुळे सतत अडचणीत येत असतात. त्यासाठी विशेष उपाययोजना केली पाहिजे असे मला वाटते.
नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात झाली पाहिजे. त्यासाठी संशोधन करून उपाययोजना केली पाहिजे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे कांदा आणि द्राक्षे पिकांचे बावीसशे कोटी रुपयांचे नुकसान होत असते. त्यासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. नाशिकच्या शेतकऱ्यांनी बांबूचे उत्पादन घेऊन आधुनिक पद्धतीच्या कांद्याच्या चाळीची उभारणी केली तर कांद्याचे नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी मी प्रणव वसंतराव पवार यांच्याशी दीर्घ चर्चा केली आहे. शेती उत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी प्रत्येक वर्षी २५ शेतकऱ्यांचा गौरव लोकांनी केला पाहिजे.
आपल्याकडे विदेशी फळे विक्रीसाठी येत आहेत. त्या ऐवजी या फळपिकांचे उत्पादन आपल्या देशात कसे घेता येईल यासाठी कृषी संशोधकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यावेळी गडकरी यांनी विविध रस्तेबांधणी योजनांची माहिती दिली. सुरत चेन्नई महामार्ग लवकरच उभारला जाणार आहे. त्यामुळे नाशिकहुन सुरतला सव्वा तासात पोहोचता येईल आणि प्रदूषणाचा धोकाही कमी होईल, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्गाला जोडणारा पिंपरी सदो ते गोंदे हा रस्ता सहापदरी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. तसेच द्वारका ते नाशिक रोड या रस्त्याचे मजबुतीकरण , उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेणार आहे.
नाशिकची मेट्रो लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी आपले सहकारी डॉ. दौलतराव आहेर, माजी आ. बाळासाहेब सानप यांचा निर्देश करीत नाशिक हे कर्तबगार माणसांचे शहर आहे असेही स्पष्ट केले.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष खा हेमंत गोडसे यांनी गडकरी यांच्या निवडीविषयी निवड समितीची भूमिका उपस्थितांसमोर मांडली. ते म्हणाले, सार्वजनिक वाचनालयाने आपल्या पुरस्काराची कार्यकक्षा वाढविल्याने संसद सदस्यांना हा पुरस्कार देताना एक मुखाने नितीन गडकरी यांच्या नावाची शिफारस सर्वांनी केली. गडकरी हे खरोखर कार्यक्षम मंत्री असल्याने त्यांना हा पुरस्कार देताना सर्वांनाच आनंद झाला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथ सचिव देवदत्त जोशी यांनी केले तर सहाय्यक सचिव डॉ शंकर बोऱ्हाडे यांनी आभार मानले. यावेळी कार्याध्यक्ष संजय करंजकर, डॉ.धर्माजी बोडके, अँड अभिजित बगदे, गिरीश नातू यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम श्री नितिन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाला.
खासदार गोडसे म्हणाले की, सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेस १८१ वर्षांचा इतिहास आहे. या संस्थेस स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, अटलबिहारी वाजपेयी यांनी सावानास भेट दिली आहे. सावानाचा सभासद असणे हा अभिमानाचा विषय आहे. यंदापासून प्रथमच स्व. माधवराव लिमये कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार दिला जात आहे. पुरस्कार निवड समितीने अध्यक्षपदी निवड केली. त्यामुळे सुरुवातील हे काम अवघड वाटत होते. समितीने निकष समोर ठेवल्याने प्रथम केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे सुचले. त्यांनी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना उल्लेखनीय काम केले असून, आजही त्यांच्या कामांचा गवागवा होताना दिसत आहे. नितीन गडकरी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले आहे. केंद्रिय रस्तेविकास मंत्री म्हणून गडकरी यांनी देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
खासदार विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यांचा आयुष्यभर कृतज्ञ आहे. ते धडाडीने व कल्पकतेने काम करत इतरांना प्रोत्साहन देत असतात. आज समाजात अनेक खासदार मंडळी मार्गदर्शक आहेत पण मेन्टॉर्स नाहीत. मंत्री गडकरी हे युवकांचे मेन्टॉर्स आहेत. त्यांना युवकांना मार्गदर्शन करुन आपल्या पायावर उभे केले आहे. ते युवकांना सांगतात की, पैसा जमा करण्यासाठी राजकारणात येऊ नका, हा संदेश युवा पिढीने अंमलात आणला तर राजकारणाचे शुद्धीकरण होईल आणि युवकांचे भले होईल.
यावेळी केंद्रिय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, माजीमंत्री सुभाष भामरे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, निवड समितीचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत गोडसे, खासदार रक्षा खडसे, कार्याध्यक्ष संजय करंजकर, अॅड. अभिजित बगदे, धर्माजी बोडके, गिरीश नातू, डॉ. आर्चिस नेर्लीकर, सुरेश पाटील, प्रणव पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देवदत्त जोशी यांनी केले. प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविक केले.आभार ड. शंकर बोर्हाड़े यांनी केले
पुरस्काराची रक्कम केली परत
कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराचे ५० हजार रुपये आणि स्वत:चे ४.५० लाख रुपये असे एकूण ५ लाख रुपयांचा धनादेश देणार आहे. महाराष्ट्रातील आयआयटीन व इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घ्यावी. वेगळे मॉडेल तयार करा. जो दर्जेदार मॉडेल तयार करेल त्यास ५ लाखांचे बक्षीस द्यावे, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.
क्षणचित्रे –
●नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सतत पाठपुरावा केल्याने मला नाशिक जिल्ह्याकडे सतत लक्ष द्यावे लागते. आजच्या विविध योजनांसाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला होता असे गडकरी म्हणाले.
● चेन्नई सुरत महामार्ग महामार्गामुळे पेठ सुरगाणा या आदिवासी तालुक्यात विकासाच्या नव्या वाटा निर्माण होतील असेही सूतोवाच गडकरी यांनी केले.
● आपल्या पुरस्काराच्या रकमेत स्वतःची भर घालून पाच लक्ष रुपयाचा पुरस्कार महाराष्ट्रातील आय आय टी व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करून कृषी क्षेत्रासाठी श्री दर्जेदार मॉडेल तयार करणाऱ्या युवा संशोधकाचा गौरव करण्यासाठी सुश्रुत ग्रुपचे प्रणव वसंतराव पवार यांच्याकडे त्यांनी ताबडतोब धनादेशाने दिली.