Nashik:तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा मंगळवारी अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा

महासंगणक निर्माते ,सुप्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते होणार पंडितजींचा सत्कार

0

नाशिक,दि ,२४ मे २०२४ –पवार तबला अकादमी गेल्या ५५ वर्षांपासून तबलावादन कलेच्या प्रचार व प्रसाराचे काम नाशिक शहरात करीत आहे.या काळात अनेक दिग्गज तबलावादकांच्या मैफिली अकादमीने आयोजित केल्या तसेच शास्त्रीय संगीतातील आश्वासक तरुण कलाकारांसाठी तालाभिषेक बैठकीच्या माध्यमातून व्यासपीठही उपलब्ध केले.या संपूर्ण प्रवासात अकादमीचे मार्गदर्शक असलेले जगप्रसिद्ध तबलावादक आणि ज्येष्ठ गुरु तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पवार तबला अकादमीतर्फे अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार,दि.२८ मे २०२४ रोजी सायं ६ वा .गुरुदक्षिणा सभागृह ,कॉलेजरोड,नाशिक येथे आयोजित केला आहे.

स्वतंत्र तबलावादनासोबतच कंठसंगीत ,वाद्यसंगीत तसेच कथकनृत्याच्या साथीसाठी प्रसिद्ध असलेल्या पं.सुरेश तळवलकर यांनी भारतात तसेच भारताबाहेर अनेक शिष्य घडवले आहेत जे आज यशस्वी तबलावादक तसेच गुरु म्हणून नावारूपास आले आहेत. त्यांची संकल्पना असलेल्या पुणे येथील तालयोगी आश्रमाच्या माध्यमातून आजही गुरुकुल पद्धतीने ते तबलावादक ,पखवाज वादक तसेच कथक नृत्यकारांना ते लय तालाचे मार्गदर्शन करीत आहेत.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी भारताचा प्रथम महासंगणक निर्माते ,सुप्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय भटकर (पुणे) यांच्या हस्ते पंडितजींचा सत्कार होणार आहे. डॉ. विजय भटकर यांना भारत सरकारतर्फे त्यांना पदमभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले असून त्यांनी नालंदा विद्यापीठाचे कुलपती म्हणून कार्यकाळ पूर्ण केला असून सध्या ते विज्ञान भारती या भारतीय शास्त्रज्ञांसाठी आलेल्या संस्थेचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.याप्रसंगी पंडितजींचे सुपुत्र व शिष्य सत्यजित तळवलकर यांचे स्वतंत्र तबलावादन होणार आहे. सत्यजित भारतभर तसेच भारताबाहेर अनेक नामवंत गायक वादकांची कायम साथसंगत करत असतात. स्वतंत्र तबलावादनासोबतच ताल वाद्य कचेरी तसेच फ्युजनचे अनेक प्रयोग ते करीत असतात. त्यांना अभिषेक शिनकर (संवादिनी) साथ करतील.या कार्यक्रमाचे निवेदन स्वानंद बेदरकर ,छायाचित्रण महारुद्र आष्टुरकर , ध्वनी आणि प्रकाशयोजना सचिन तिडके तर व्हिडीओ शुभम जोशी व आदित्य रहाणे करणार आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला असून नाशिककरांनी हा अभूतपूर्व सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन चे संचालक रघुवीर अधिकारी आणि दीपक बिल्डर्स चे दीपक चंदे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.