Nashik Temperature:२०१९ नंतर आज नाशिक मध्ये उच्चांकी तापमानाची नोंद
नाशिकमध्ये असह्य उकाडा,अंगाची अक्षरशः लाहीलाही
नाशिक,दि,२२ मे २०२४ – थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या नाशिकवर सूर्य कोपला असं म्हणावं लागेल ..२०१९ नंतर नाशिक मध्ये आज सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज नाशिकचा पारा ४२ अंश सेल्सिअस झाल्याची नोंद हवामान विभागात नोंदवण्यात आली आहे. तर २६.८ किमान तापमानाची नोंद झाली आहे. तीव्र उकाड्यामुळे नागरिकांकडून वातानुकूलित यंत्रणा, पंखे, कूलर, फ्रीजचा अधिक वापर केला जात आहे. यामुळे विजेची मागणीसुद्धा वाढली आहे. वीजपुरवठा काही तांत्रिक कारणांमुळे अल्पवेळ जरी खंडित झाला तरी देखील नागरिकांना घरात बसणे कठीण होत आहे.
काल मंगळवारी (दि.२१) ४१.८ तापमान नोंदवले गेले आहे.एप्रिलमध्ये ४०.७ तापमान नोंदवले गेले होते. हे तापमान यंदाचे सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु आज ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती पेठरोड वरील हवामान केंद्राने (IMD) दिली आहे.
बुधवारी प्रखर उष्णतेमुळे नागरिक घामाघूम झाले होते.घरातसुद्धा नागरिकांना उष्णता जाणवत होती. किमान तापमानदेखील 24 अंशापुढे सरकल्यामुळे नाशिककरांना रात्रीदेखील उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यंदा एप्रिलअखेर दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना नाशिककरांना करावा लागला. आता मे महिन्यात ही त्यापेक्षा उष्णतेला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नाशिककरांची अक्षरशः लाही-लाही झाल्याचे चित्र आहे
काल मंगळवारी तापमानाचा हा रेकॉर्ड मोडीत निघाला व तापमान थेट ४१.८ पर्यंत गेल्याची नोंद करण्यात आली. या पाठोपाठ आज बुधवारी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.