प्रकृती आणि प्रवृत्ती

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
 
जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड शैक्षणिक यश प्राप्त करते तेव्हा त्याला मिळणारे यश हे अनुवंशिकतेने मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो का ? किंवा त्याला मिळालेले यश हे त्याला लाभलेल्या समृद्ध वातावरणाचा परिणाम आहे असं म्हणता येईल का ? जर एखाद्या माणसाने आपल्या बायकोला, मुलांना मारहाण केली, शिव्या दिल्या तर तो हिंसकपणा त्याला अनुवंशिकतेने आला आहे असं म्हणावं की त्याच्या पालकांच्या वर्तनाचं जे निरीक्षण त्यांनी केलं आहे त्यातून हे शिक्षण मिळालं असं म्हणावं ?
 
“प्रकृती” जी आपल्याला अनुवंशिकतेने मिळते, ज्यामध्ये आपली शारीरिक जडण-घडण आपला स्वभाव याचा समावेश होतो.
 
“प्रवृत्ती” म्हणजे आपली वागण्याची, विचार करण्याची पद्धत! आजूबाजूचं वातावरण, लहानपणापासून आलेले अनुभव, आपल्या आईवडिलांनी आपलं केलेलं पालन-पोषण, समाजातील घटक आणि आजूबाजूला असलेली संस्कृती यानुसार आपल्या प्रवृत्ती मध्ये फरक पडत असतो.
 
आजही मानसशास्त्रामध्ये प्रकृती आणि प्रवृत्ती यावर अनेक वेळा वाद-विवाद घडतांना दिसतात, चर्चा घडवून आणल्या जातात. काही मानस शास्त्रज्ञांचं मत असतं की प्रकृती जास्त महत्त्वाची असते तर काही मानसशास्त्रज्ञांच्या मते समाजात वावरतांना प्रवृत्तीचं महत्त्व जास्त आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये मात्र ‘प्रकृती आणि प्रवृत्ती दोन्ही सारख्याच महत्त्वाच्या आहेत’ या विचारावर काही तज्ञांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
 
जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड शैक्षणिक यश प्राप्त करते तेव्हा त्याला मिळणारं यश हे अनुवंशिकतेने मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो का? किंवा त्याला मिळालेले यश हे त्याला लाभलेल्या समृद्ध वातावरणाचा परिणाम आहे असं म्हणता येईल? जर एखाद्या माणसाने आपल्या बायकोला, मुलांना मारहाण केली, शिव्या दिल्या तर तो हिंसकपणा त्याला अनुवंशिकतेने आला आहे असं म्हणावं की त्याच्या पालकांच्या वर्तनाचं जे निरीक्षण त्यांनी केलं आहे त्यातून हे शिक्षण मिळालं असं म्हणावं ?
 
खरंतर अगदी काही ठराविक गोष्टी अनुवंशिकतेने आपल्याला मिळतात. जसं डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, त्वचेचा रंग , शरीराची ठेवण, एखादा अनुवंशिक रोग ,आपल्याला लाभणारं आयुष्य, उंची या गोष्टी अनुवंशिक आहेत. प्रवृत्ती घडवण्यासाठी मात्र अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मानसशास्त्रातील नेटिव्ह सिद्धांतानुसार सर्व मुले एक सहज मानसिक क्षमता घेऊन जन्माला येतात. ज्यामुळे त्यांना भाषा शिकण्याची आणि निर्मिती करण्याची क्षमता जन्मापासूनच लाभते, म्हणूनच लहान मुलं आपल्या घरातली, आपल्या आजूबाजूची माणसं ओळखतात, त्यांची भाषा लवकर आत्मसात करतात आणि त्यानुसार बोलायलाही लागतात. मात्र ती मुलं कशी वागतात हे त्यांच्या पालकांच्या वर्तणुकीची शैली आणि त्यांना आलेले अनुभव, त्या अनुभवाचा प्रभाव या गोष्टींवर अवलंबून असतं.
 
जरा सोपं करून सांगण्यासाठी मी तुम्हाला दोन पोपटांची गोष्ट सांगते‌. तुम्ही ही गोष्ट लहानपणी ऐकली असेलच पण आजच्या लेखाच्या संदर्भात मला ती गोष्ट आठवते आहे. 
एका जंगलात एका उंच झाडावर, दाट पानांमध्ये पोपटाचं घरटं होतं. त्या घरट्यात दोन चिमुकली पिल्ले राहत होती. एक दिवस पोपटी घरट्यातून उडाल्यानंतर तिच्या मागोमाग ही दोन्ही पिल्लं बाहेर आली आणि नेमका त्याच वेळी वाऱ्याचा झोत आला. दोन्ही पिल्लं झाडावरून खाली गवतात पडली. एक पिल्लू थोडं मोकळ्या भागात पडलं तर दुसरं दाट गवतामध्ये पडलं. ती  दोन्ही पिल्लं खूप लहान होती. त्यांना उडताही येत नव्हतं. अशावेळी तिथून जात असलेल्या एका दरोडेखोराची नजर मोकळ्या गवतात पडलेल्या पिल्लावर गेली. त्यानी पटकन ते पिल्लू उचललं आणि त्याच्या मुलांसाठी घरी घेऊन गेला.
 
दाट गवतामध्ये पडलेले पिल्लू सहज दिसत नव्हतं. मात्र हे पिल्लू केविलवाण्या आवाजात हाका मारण्याचा प्रयत्न करत होतं. 
 
एक साधुमहाराज त्या वाटेने जात होते. त्यांनी त्या पिल्लाचा केविलवाणा आवाज ऐकला आणि गवतामध्ये शोध घेतला तेव्हा त्यांना ते पिल्लू सापडलं. साधुमहाराजांनी हे पिल्लू उचललं आणि आपला आश्रम गाठला. आता एक पिल्लू साधू महाराजांकडे वाढत होतं आणि दुसरं पिल्लू दरोडेखोराकडे वाढत होतं. दरोडेखोराकडे वाढणाऱ्या पिल्लाच्या कानावर सतत “मारा, पकडा, हात तोडा! गर्दन छाटा!” अशी वाक्य पडत असल्याने हे पिल्लू पिंजऱ्यात राहून सतत तेच तेच बोलायचं. दरोडेखोराकडे कोणी आलं तर पोपट जोरजोरात पिंजऱ्यात पंख फडफडवून “चोर, चोर ,पकडा ,पकडा” असं जोरात ओरडायचा. साधूच्या आश्रमात राहणाऱ्या पोपटाला मात्र सतत मंत्रपठण, श्लोक , आदरातिथ्याचे संस्कार मिळत होते म्हणूनच आश्रमात कोणीही आलं तरी पोपट त्याच्या गोड आवाजात “यावे , बसावे, थंड पाणी प्यावे!” असं म्हणून त्यांचे स्वागत करत असे.
 
एक दिवस त्या राज्याचा राजा जंगलातून जात होता. दरोडेखोराच्या घरावरून जातांना पोपटाने राजाला पाहिलं आणि पिंजऱ्यातुनच जोरात ओरडू लागला, “पकडा,मारा, गर्दन तोडा!” हे ऐकुन आपल्यामागे दरोडेखोर लागले आहेत असं वाटून राजाने त्याचा घोडा जोरात पळवला. आता राजा त्या साधूच्या आश्रमा समोर आला होता. आश्रमातील पोपटाने मधुर आवाजात “यावे,बसावे, थंड पाणी प्यावे !” असे म्हणताच राजाला फार बरं वाटलं. राजाने  घोडा थांबवला आणि साधूच्या आश्रमात गेला. साधू महाराजांना सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाला, “महाराज, तसं बघायला गेलं तर दोघंही पोपटच! मात्र दरोडेखोराच्या घरचा पोपट अतिशय हिंसक आणि आश्रमातला पोपट अगत्यशील, नम्र, याचं कारण काय?”  यावर साधुमहाराजांनी अगदी सरळ उत्तर दिलं, “राजन, जन्माने जरी त्यांना पोपटाचं रूप मिळालं असेल तरी कर्माने ते ज्या वातावरणात वाढले तसेच बनले आहेत. म्हणूनच दरोडेखोराच्या घरचा पोपट आक्रस्ताळेपणाने वागतो तर आश्रमातला पोपट संयमाने वागतो!”
 
या गोष्टीचा मतितार्थ लक्षात घेतला तर आपल्याला प्रकृती आणि प्रवृत्ती यावर मी जे काय म्हणते आहे ते सहज लक्षात येईल. जसे ते दोन‌ पोपट जन्माने सारखे होते पण कर्माने वेगळे होते तसंच आपण सगळे जन्माने मनुष्य असतो मात्र आजूबाजूच्या अनेक लहान-सहान गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. लहान मुलं याला अपवाद नाहीत. आजुबाजुच्या गोष्टींमधून कसं बोलायचं, कसं वागायचं , प्रतिक्रिया कशी द्यायची हे सगळं लहान मुलं शिकत असतात. एखादं मुल पटकन ‘थँक्यू’ किंवा ‘सॉरी’ म्हणत असेल तर आपल्याला जास्त कौतुक वाटतं आणि एखादं मुल फटके खाल्ल्यानंतरही तोंड उघडत नसेल तर आपल्याला ते मूल बेरड वाटायला लागतं. खरंतर, ही त्यांची अनुवंशिकताही नाही आणि त्यांच्या पालकांनी त्यांना दिलेले संस्कारही नाहीत. कुठलेच पालक आपल्या मुलाला मुद्दामून कोडगं किंवा बेरड बनवत नसतात. तरीही मुलं या सगळ्या गोष्टी समाजातून शिकत असतात. लोकांच्या वर्तनाचं निरीक्षण करून मुलं शिकत असतात. अल्बर्ट बंडूरा या मानसशास्त्रज्ञानी साध्या बाहुलीच्या प्रयोगावरून हे सिद्ध केलं होतं कि, मुलं दुसऱ्या व्यक्तीला आक्रमकपणे वागताना पाहून आक्रमक वागायला शिकतात. या लेखमालेतील माझा पहिलावहिला लेख ‘मोठी तिची बाहुली’ तुम्हाला आठवत असेल. या लेखात अशीच एका मुलीची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. त्या मुलीवर तिच्याही नकळत होणाऱ्या परिणामांचा विचार आपण त्या लेखात केला होता. आजही मानसशास्त्रातील संशोधकांना ‘प्रवृत्ती’ या विषयावर अनेक स्तरांवर अभ्यास करवा लागत आहे. 
 
मुलांच्या प्रवृत्तीवर फक्त आजूबाजूची माणसं नव्हे तर त्यांच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट प्रभाव टाकत असते. गेले दीड वर्ष समाजाकडून मिळणारी शिकवण घेण्यासाठी मुलांना बाहेर जाता येत नाहीये, तरीही मुलांमध्ये आक्रमकता, उद्धटपणा, चिडचिड वाढलेली दिसते आहे यामागचं कारण शोधायला हवं. सर्व स्तरातील आणि सर्व घरातील पालकांकडून मुलांविषयी ही कॉमन तक्रार ऐकू यायला लागली आहे. तसं बघायला गेलं तर हे पालक जरी एकाच समाजाचे भाग असले तरी त्यांच्या घरचं वातावरण, त्यांच्या आजुबाजूची परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे. तरीही त्यांच्या मुलांवर होणारा परिणाम थोड्याफार फरकाने सारखाच कसा काय? घरी राहिल्यामुळे मुलांची प्रकृती ठणठणीत तर राहिली पण त्यांची ‘प्रवृत्ती’ बिघडायला लागली. घरातून बाहेर न पडल्यामुळे समाजाच्या चांगल्या वाईट गोष्टींच्या परिणामांपासून ही मुलं वंचित राहिली. घरामध्ये बदललेल्या वातावरणात, पालकांच्या वाढलेल्या चिंता, पालकांचे चर्चेचे विषय, त्यातून कधी कधी निर्माण होणारे वाद आणि क्वचित कोणीतरी हातापाईवर येण्याचे प्रसंग हेच बालकांचं अनुभवविश्व झालं आहे.
 
एकंदरीत अनुभवच मर्यादित मिळत असल्याने अनुभवविश्व विस्तारायचा प्रश्नच उद्भवत नाही. या सगळ्या मधून आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने ठरवायला हवी आणि ती म्हणजे मुलं हीच आपली प्राथमिकता असायला हवी.
 
मुलांना प्राथमिकता देतांना, आपली भूमिका वात्सल्य, संगोपन याबरोबरच त्यांना भावनिक आधार देण्याचीही असली पाहिजे. त्यांना हवी ती वस्तू पुरवणं, खाऊ देणं, मुलांना वेळ देऊ शकत नाही त्याची भरपाई पैसे देऊन करणं यातच आपण पालक म्हणून धन्यता मानतो पण मुलांच्या भावभावनांचा, त्यांच्या विकासाचा विचार आपण करतच नाही. मुलाची बौद्धिक गुणवत्ता ही अनुवंशिक असेल पण मुलाची सामाजिक गुणवत्ता आपण प्रयत्नपूर्वक वाढवू शकतो‌. मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या भावनिक विकासावर भर द्यायला हवा आणि त्यासाठीच आपल्या वर्तणुकीतून त्यांच्यासमोर आदर्श ठेवायला हवा‌. 
 
आज-काल आजूबाजूच्या जगात कृत्रिमता आली आहे. नात्यांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अशा वेळेला आपल्या आधाराची मुलांना सर्वात जास्त गरज आहे. मुलांना वेळ देण्याची योग्य संधी तुमच्याकडे आत्ता, या क्षणाला आहे. मुलं चुकतात, खोटं बोलतात, गोंधळतात याचा आपल्याला जास्त जास्त राग येत जातो आणि मग आपण रागावलो म्हणून मुलं व्यक्त होणं बंद करतात. त्यांना नैसर्गिकरित्या व्यक्त होऊ द्या. आपल्या मुलांवर कोणी टीका केली तर त्याचा दोष मुलांना देऊ नका. उलट ती टीका स्वीकारून आपल्या मुलांची कुठल्या दृष्टिकोनातून वाढ करण्याची संधी आहे याचा विचार करा‌. मुलांना स्वतःचे मूल्यमापन स्वतः करू द्या कारण त्यानंतरच मुलं खऱ्या अर्थाने अभिव्यक्त होऊ लागतील. 
 
“आपल्या आजूबाजूचे सगळेच बरोबर असतात असं नाही. तेही चुकतात पण त्यांना समजून घेतलं जातं तसंच मलाही समजून घेतलं जाईल” हा विश्वास मुलांना द्या कारण या विश्वासातूनच मुलांचा चांगुलपणावरचा विश्वास वाढणार आहे. 
 
मूल जन्माला येतांना त्याची प्रकृती घेऊन आलं आहे. आता आपल्या हातात त्याची प्रवृत्ती घडवण्याचं मोठं काम आहे. ‘मला जे भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगायला लागू नये’ असं आपण बर्‍याचदा ऐकतो. क्वचितप्रसंगी म्हणतो सुद्धा! 
 
‘जे मला भोगायला लागलं आहे त्यांच्या अनुभवातून मी माझ्या मुलांचं जगणं संपन्न करेल” असा विचार आपण का करत नाही? मला कोणी सपोर्ट केलं नाही, मला कोणी समजून घेतलं नाही तरीही आज मी यशस्वी आहे याचा आपण अभिमान बाळगतो आणि आयुष्यभर आपल्याला सपोर्ट न करणाऱ्या माणसाला आठवत बसतो. एकदा स्वतःला विचारा कि जर आपल्याला कुणीतरी सतत आधार दिला असता, कोणी तरी आपल्या तक्रारी ऐकून घेतल्या असत्या तर आपण जिद्दीने उभं राहिलो असतो  का? नाही, आयुष्य सोपं झालं असतं तर आपण ते कायम निवांत, आरामात घालवायला प्राधान्य दिलं असतं ही गोष्ट विसरून चालणार नाही. त्यामुळेच आपल्या प्रगतीला आपल्याला आधार न देणारी लोकच कारणीभूत आहेत याबद्दल त्यांचे आभार माना. 
 
आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांसाठी जी व्यक्ती जबाबदार आहे तिला मोठ्या मनाने माफ करून टाका. कारण जर त्यांनी आपल्याला वाईट अनुभव दिले नसते तर चांगलं वाईट याची ओळख आपल्याला झालीच नसती‌ आपल्या या सगळ्या अनुभवांच्या शिदोरीतून मुलांच्या प्रवृत्तीला योग्य अशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवा. त्यांच्या प्रवृत्तीला एक योग्य दिशा द्या आणि त्यांच्या भविष्याप्रती निश्चिंत होऊन जा कारण मुलांची प्रवृत्ती एकदा चांगली घडली की त्यांचे भविष्य उत्तम घडेलच याची खात्री बाळगा!
 
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
 
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.