नाशिक– नाशिक शहरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत नाशिक महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप कडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक शहरातील बिटको चौकात रस्त्यावरील खड्यात श्राद्ध घालत या अभिनव उपक्रमातून सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त केला.
यावेळी अंबादास खैरे म्हणाले की, नाशिक महानगरपालिका हद्दीतील बहुतांश रस्ते विविध कामांच्या नावाखाली खोदण्यात आले तसेच इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले. या रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम महानगरपालिके मार्फत ठेकेदारांना देण्यात आले. सदरचे ठेकेदार खड्ड्यांमध्ये माती-मुरूम टाकून बुजवित असून पावसाच्या पाण्यामुळे माती व मुरूममुळे चिखल साचून अपघात घडत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामांसंदर्भात आपण नाशिक महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले असून नाशिक खड्डे मुक्त करण्यासाठी युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. आज नाशिक शहरातील बिटको चौकात खड्यात श्राद्ध घालून प्रशासनाचे आम्ही लक्ष वेधले आहे. आम्ही आज पितृपक्षात खड्यात सत्ताधारी भाजपच्या विरोधात श्राद्ध घातले आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांचे श्राद्ध घालण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशारा अंबादास खैरे यांनी दिला आहे.