पालकांनो जागे व्हा, मुलांना शांत झोपू द्या

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)  


एकाच दिवशी पोटभर बासुंदी प्यायची आणि मग नंतर वर्षभर तिच्याकडे ढुंकुनही बघायचं नाही याला काय अर्थ आहे? बासुंदीची मज्जा थोडी थोडी पिण्यातच आहे ना ? तसंच मला विशेष वाटतं ते कुंभकर्णाचं, कुंभकर्ण म्हणे सहा महिने झोपत होता आणि सहा महिने जागत होता, हा कुंभकर्णाला मिळालेला वर म्हणावा की शाप ? कारण झोप ही गोष्ट सलग सहा महिने घेण्यासारखी नाही तर रोज थोडी थोडी उपभोगण्यासारखी आहे आणि ती तशी थोडी थोडी उपभोगली तरच आपल्या अंगी लागणार आहे. हेच झोपेचे गणित समजून घेण्याची गरज आत्ता नव्याने निर्माण झाली आहे, त्यासाठीच हा लेखन प्रपंच!

“अरे अजून किती वेळ झोपायचं ऊन्हं डोक्यावर आली”
“बघावं तेव्हा झोपा काढत असतो’’
“झोपू दे ग आई थोडा वेळ अजून”
“म्हणून रात्री जास्त वेळ टीव्ही बघायचा नसतो. वेळेत झोपायचं म्हणजे वेळेत जाग येते.”
“आई नको ना… झोपु दे ना मला”
“पुढच्या पाच मिनिटात उठून आला नाहीस तर बादलीभर पाणी ओतेन अंगावर!”
इतक्या प्रेमळ संवादाने दिवसाची सुरुवात झाली तर रात्रभर मिळालेल्या झोपेचं सुख कुठल्याकुठे उडून जातं.
या आयांना. मुलांना झोपेतून उठवण्याचे ट्रेनिंग कुठली तरी एकच संस्था देत असावी.


पहिली पाच मिनिटं “उठ रे बाळा, उठ पिल्लू” नंतरची पाच मिनिटं “उठलीस का ग ? उठा रे आता” त्यानंतर मात्र डायरेक्ट हमरीतुमरीवर येऊन ‘बादली ओतण्याची’ भाषा सुरू होते. कधी कधी वाटतं सगळ्या आया इतका सारखा विचार कसा करतात ? रात्री आम्ही झोपत नसतो तर बळजबरी नेऊन झोपवते आणि सकाळी आम्ही उठत नसतो तेव्हाही बळजबरीने उठवते. झोपेचं आणि आईचं गणित मुलांच्या कधीही लक्षात येणार नाही. हो झोपेचं गणितच !


आज-काल कित्येक पालक हे मुलांच्या अपुऱ्या झोपेबद्दल सांगतात. त्याच बरोबर त्यांच्या वाढलेल्या चिडचिडीबद्दलही बोलतात. मुलं चिडचिड करतात म्हणून ते नीट झोपत नाही की मुलांची झोप नीट होत नाही म्हणून ते चिडचिड करतात हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की आधी अंड ? याच कॅटॅगरीतला आहे.


झोप जशी आपल्याला प्रिय असते तशीच ती बालकांनाही प्रिय असते. मुलं अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून आई वडील आपल्या मुलांची काळजी घेत असतात. बऱ्याचदा बाळ झोपत नाही, त्यामुळे त्यांची चिडचिड होते, रडारड होते आणि मग आई वडिलांची ही झोप पूर्ण होत नाही. या झोपेच्या गणितामध्ये कोणी नक्की किती तास झोप घ्यावी यासाठी काही नियम आहेत.


तुम्ही म्हणाल आम्ही मुलांना झोपू नका, झोपा काढू नका, असं सांगून कंटाळलो आणि मी मात्र तुम्हाला मुलांना झोपू द्या असं सांगते आहे पण मी सांगते आहे त्याचा शास्त्रीय आधार मी या लेखात मांडणार आहे.


जन्मापासून ११ महिन्यांपर्यंत बाळाला १२ ते १५ तासांची झोप आवश्यक असते, तर वयाच्या दोन वर्षापर्यंत ११ ते १४ तास झोपणं मुलांसाठी गरजेचं असतं. पाच वर्षापर्यंतच्या मुलांना १० ते १३ तासांची झोप पुरेशी असते. त्यानंतर १७ वर्षापर्यंतच्या मुलांना किमान ९ ते ११ तासांची झोप मिळायलाच हवी. १८ ते ६४ या वयोगटातील व्यक्तींना किमान ८ ते ९ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो तर ६५ च्या वरील ज्येष्ठ व्यक्तींना ८ तास तरी झोप आवश्यक आहे. याचाच अर्थ सरासरी ८ तासांची झोप ही प्रत्येक मनुष्यप्राण्याला गरजेची आहे.


किमान आठ तास पुरेशी झोप मिळाली तर मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू कार्यक्षम राहू शकतो. मेंदूला आवश्यक असणारी झोप ही शांतपणे लागली तर त्याचा मानवी आरोग्यावर उत्तम परिणाम बघायला मिळतो.


पुरेशी आणि उत्तम झोप मुलांच्या एकूण विकासासाठी खूप आवश्यक आहे. दिवसभर करायला लागणाऱ्या कामांसाठी मेंदू सतत बिझी असतो. जसं व्यायाम करून आपण आपल्या स्नायूंची ताकद वाढवतो तसेच झोपेने आपण मेंदूची ताकद वाढवू शकतो. झोप एकाच वेळी दोन काम करते. पहिले म्हणजे आपल्या शरीराला रिलॅक्स करते आणि दुसरं म्हणजे आपल्या मनाला सजग करते.


आजूबाजूचं वातावरण, झोपायची जागा, झोपेच्या वेळा, आपल्या सोबत असलेल्या घरातल्या व्यक्ती बदलल्या तरी त्याचा झोपेवर परिणाम होतो.कुंभकर्ण म्हणे सहा महिने झोपत होता आणि सहा महिने जागत होता हा कुंभकर्णाला मिळालेला वर म्हणावा की शाप? कारण झोप ही गोष्ट सलग सहा महिने घेण्यासारखी नाही तर रोज थोडी थोडी उपभोगण्यास सारखी आहे आणि ती तशी थोडी थोडी उपभोगली तरच आपल्या अंगी लागणार आहे.


ऑनलाइन लेक्चर, ट्युशन, शाळेचा अभ्यास आणि पालकांची भुणभुण या सगळ्याचा मुलांच्या मनावर अतिरिक्त ताण येतो आहे. तो ताण घालवण्यासाठी मुलांना शरीराने निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप मिळणं अत्यावश्यक आहे. मुलं नीट जेवली का? गरजेइतके पाणी प्यायली का? याबरोबरच त्यांना गरजेची असलेली शांत झोप त्यांना मिळाली का? याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण जर मूल सलग शांत झोप घेत नसेल तर त्याचा परिणाम त्याच्या खाण्या-पिण्यावर, खेळण्यावर आणि एकंदरीतच त्याच्या सक्रियतेवर होत असतो. यातून पुढे मुलाचा मनोसामाजिक, बौद्धिक विकास सुरु होतो आणि त्याचे परिणाम पुढील अनेक वर्ष भोगावे लागतात.


आपल्या मुलांना टीव्ही, मोबाइल न दाखवता जर मुक्त खेळायला उद्युक्त केलं तर मुलांची शारीरिक वाढ तर होईलच त्याच बरोबर थकल्यामुळे झोपही छान लागेल. टीव्ही आणि मोबाईल या सतत डोक्याला खुराक देणाऱ्या दोन्ही गोष्टी मुलांना झोपेपासून लांब ठेवतात आणि त्याचा परिणाम म्हणून मुलं संतापी बनतात, चंचल होतात आणि प्रसंगी त्यांच्या आवेगाला उधाण येतं. सलग पुरेशी झोप न घेतल्याने मुलं सुस्त होतात. अभ्यासाचा कंटाळा करतात. त्यामुळे अभ्यास धड होत नाही, ऑनलाइन लेक्चरमध्ये डुलक्या घेतात, जांभया देतात आणि भरीस भर म्हणून शिक्षकांची आईवडिलांची बोलणी खातात.


शाळकरी मुलांच्या अपुऱ्या झोपेमुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणारे संशोधन अलीकडेच ब्रिटनमध्ये करण्यात आले. कोरोना काळात असंख्य कुटुंबांमध्ये वेळापत्रकाची कमतरता निर्माण झाली. कोरोना आधी पालकांच्या ऑफिसच्या वेळा ठरलेल्या होत्या, जेवणाच्या, मुलांसाठी देण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. मुलांच्याही शाळेच्या, ट्युशनच्या, हॉबी क्लासेसच्या वेळा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या. मात्र कोरोना काळात गंमत म्हणून सकाळी उशिरापर्यंत झोपण्याच सुख आपण सगळ्यांनीच अनुभवलं आणि मग कधीही झोपणं, कधीही उठणं, कधीही खाणं या सवयी आपल्या अंगवळणी पडल्या. आपण पालकच आपल्या सोयीने आपली दिनचर्या बदलतो मग मुलं आपलाच आदर्श ठेवणार यात गैर ते काय?


पुरेशी झोप झोप न झाल्याने अजून एक मोठा धोका संभवतो. रायटर या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुरेशी झोप मिळत नसलेली मुलं लठ्ठ होतात. त्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. मुलांना झोपेचं महत्त्व सांगून कळणार नाही तर आपल्या वागण्यातून आपल्याला मुलांपर्यंत पुरेशा झोपे मुळे होणारे फायदे पोहोचवायला हवेत.


एकंदरीतच कुठली गोष्ट मग ते खाणं असो किंवा झोप प्रमाणातच व्हायला हवी. अनिद्रा, खंडित निद्रा किंवा अतिनिद्रा या तीनही तक्रारी अनेक आजारांचं मूळ असू शकतात. तसंच या तीन तक्रारी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. ताणतणाव, तीव्र वेदना, चिंता, आजार, अति आनंद, कमी जेवण, कोरडे खाणं, पोटात भूक असताना जेवणाची टाळाटाळ करणे, चहा आणि कॉफी अतिप्रमाणात पिणे ही काही झोप कमी होण्याची मुख्य कारणे आहेत. यातूनच पुढे अपचन, अभ्यासात एकाग्रता न झाल्याने अभ्यास लक्षात न राहणे, जांभया, चक्कर, अंगदुखी डोकं जड होणे, वाताचे आजार होण अशा बऱ्याच तक्रारी जन्माला येतात.म्हणूनच आपल्या बाळाने खेळणं, खाणं, अभ्यास करण याबरोबरच पुरेसं झोपणं ही अति आवश्यक आहे.

 


आता झोप ही सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे यावर जर आपले एकमत झालं असेल तर शांत झोप येण्यासाठी काय करता येईल यावर विचार करूया.


शांत झोप लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि चांगला उपाय म्हणजे झोपण्याच्या वेळेचं अचूक नियोजन ! आपल्या मुलाला किती वाजता झोप येते, त्यानंतर मुल किती वाजता झोपतं, किती वाजता उठतं, त्यानंतरही  किती वेळ नुसतचं लोळत पडतं याचा व्यवस्थित अभ्यास करा. त्यातला नको असलेला वेळ बाजूला करून नियमित झोपेची वेळ ठरवून घ्या आणि त्यानुसार मुलांना झोपवा. काही दिवसांनी त्यांना शांत झोप लागायला लागेल.


सध्या बाहेरच्या बदललेल्या वातावरणाचा ताण तणाव मुलांच्या मनावर असतो. तो कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट सांगा किंवा एखादं अंगाई गीत, गाणं म्हणून त्यांना झोपवा. पुस्तकातल्या गोष्टी आवडत असतील तर त्या गोष्टींच वाचन करा. मुलांना रात्री शांत झोप लागण्यासाठी कोमट दुधात एक चमचा मध घालून प्यायला द्या. रात्रीच्या जेवणात चमचमीत, तिखट, तेलकट, पदार्थ टाळा जेणेकरून जळजळ होणार नाही आणि झोप शांत लागेल. झोपताना दिवसभराचे कपडे बदलून मुलांना सैलसर कपडे घाला जेणेकरून मुलं शांत झोपू शकतील.


दुधाप्रमाणे रात्री झोपताना मुलांना चेरी खायला दिली तरीही चांगली झोप लागू शकते. चेरीमध्ये चांगल्या प्रमाणात मेलाटोनिन असतं, जे आपल्या शरीरातील आंतरिक क्रियांना नियमित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं.


चेरी प्रमाणेच रात्री झोपण्याआधी मुलांना केळ खायला देणं उपयुक्त ठरू शकतं. केळामधील मॅग्नेशियम आणि पोट्याशियम शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर असतं.


एकंदरीतच मुलांच्या उठण्या-बसण्यावरून, खाण्यापिण्यावरून, झोपण्याच्या सवयींवरून आपण मुलांना बोलत असतो, हिणवत असतो, ते कमी करून मुलांच्या शरीराची आणि मेंदूची झोपेची गरज ओळखून त्यांना पुरेशी झोप घेऊ द्यायला हवी.


थोडक्यात पालकांनो वेळीच जागे व्हा आणि तुमच्या मुलांना शांत झोपू द्या !
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)


आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.