पं.नागेश आडगावकरांच्या सुरांनी उजळणार पिंपळपारावरील संस्कृती नाशिकची पाडवा पहाट
शांताराम चव्हाण यांचा'संस्कृती गौरव'पुरस्काराने होणार सन्मान
नाशिक,दि,२७ ऑक्टोबर २०२४ –पिंपळपारावर साकारणारी दीपावली पाडवा पहाट स्वरमैफल’नाशिककर रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ! संस्कृती नाशिक चा हा सुरेल उपक्रम सन १९९८ च्या दीपावली पाडव्या पासून सुरु झाला आहे.संस्थेने नाशिकच्या सांगितीक सांस्कृतीक परंपरेचा वारसा नवोदितांपर्यंत पोहोचावा तसेच भारतातील नामवंत शास्त्रीय गायक कलावंतांच्या गायकीचा नाशिककरांना आस्वाद घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम सुरु केला आहे.
यंदाच्या वर्षी रामपूर सेहसवान घराण्याचे युवा अष्टपैलू गायक तथा पै उस्ताद राशीद खान साहेब यांचे शिष्यपंडित नागेश आडगावकर आपल्या गंधर्व गायकीने हा स्वर मंच प्रकाशमान करणार आहेत! त्यांना तबला साथसंगत पं. नितीनजी वारे, संवादिनी श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, पखवाज श्री दिगंबर सोनवणे आणि तालवाद्य संगत श्री अमित भालेराव हे करणार आहेत.
या मैफलीच्या निमिताने संस्कृती नाशिकच्या परंपरेनुसार या वर्षी ज्येष्ठ समाजसेवक,समाजवादी नेते शांतारामभाऊ पांडुरंग चव्हाण यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याकरीता ‘संस्कृती गौरव’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
आज पावेतो स्वरभास्कर भारतरत्न पंडित भिमसेन जोशी, गानतपस्विनी किशोरीताई अमोणकर, शोभा मुद्गल, पं राजन साजन मिश्रा, पंडिता अश्विनी भिडे-देशपांडे, स्वराधीश पं. भरत बलवल्ली, सुरेश वाडकर, पंडीता स्नीती मिश्रा यासारख्या अनेक मान्यवर गायकांच्या स्वराभिषेकाने पिंपळपार चिंब झाला आहे. देशविदेशात पाडवा पहाटचा स्वराविष्कार नाशिकची सांस्कृतीक ओळख ठरला आहे..गायनाच्या कार्यक्रमां व्यतिरिक्त संस्थेने शिव व्याख्याते श्री. सचिन कानिटकरांची व्याख्यानमाला,हुतात्मा शौर्य शताब्दी सोहळा,ग्रंथयात्रा असे असंख्य सांस्कृतीक कार्यक्रम अत्यंत देखण्या स्वरूपात सादर केले आहेत